Sunday, January 21, 2007

कुड्यावाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लसूण पाकळ्या १० ते १२
हिरव्या मिरच्या ४ ते ५
ख़ोवलेला ओला नारळ २ ते ३ वाट्या
तेल मोहोरी,हिंग,हळद,मीठ ,साखर


क्रमवार मार्गदर्शन: कढाईत थोडेसे तेल घालुन त्यात मोहोरी,हिंग, हळद टाकुन फ़ोड्णी करणे, त्यात मिरर्च्यांचे तुकडे,लसुण पाकळ्या टाकुन थोडे परतणे. नंतर त्यात ख़ोवलेले ओले खोबरे घालुन परत थोडे परतणे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणी साखर घालणे. gas बंद करणे. लसुण पाकळ्या आणी मिरच्या जास्त शिजवायच्या नाहीत.

पीठले भाताबरोबर ह्या कुड्या छान लागतात.

रोहिणी

माहितीचा स्रोत:आई कडून

Saturday, January 20, 2007

डाळ कोबी


वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

बारीक चिरलेला कोबी ४-५ वाट्या
हरबरा डाळ अर्धी वाटी,
हिरव्या मिरच्या १-२, लाल तिखट १ चमचा
मीठ, गूळ सुपारीएवढा
ओला नारळ अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे

क्रमवार मार्गदर्शन: हरबरा डाळ ३ तास पाण्यात भिजत घालणे. फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे व हरबरा डाळ घालून १-२ वेळा वाफेवर शिजवणे. नंतर त्यात चिरलेला कोबी घालून मध्यम आचेवर शिजवणे. थोडे पाणी घालून पातेलीवर झाकण ठेवणे. ५ मिनिटांनी झाकण काढून परतणे. असे थोडे थोडे पाणी घालून ५-६ वाफा देवून शिजवणे. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व गूळ घालून परत २-३ वेळा वाफेवर शिजवणे. सगळ्यात शेवटी ओला नारळ व कोथिंबीर घालणे. या भाजीत शिजवण्यापुरतेच पाणी घालणे नाहीतर पांचट होते. ही पातळ भाजी नाही.

नुसती खायला पण छान लागते.

माहितीचा स्रोत:मामेबहीण सौ विनया गोडसे.

Thursday, January 18, 2007

आमटी

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तुरीची डाळ अर्धी वाटी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा,
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
२ मिरच्या, ३-४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू
लाल तिखट १ चमचा, धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन: अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मोहरी, जिरे हिंग, हळद व अर्धा चमचा लाल तिखट व चिरलेल्या मिरच्या घालून लगेचच चिरलेला कांदा व टोमॅटो घालणे. थोडी तीव्र आच ठेवून परतणे. परतून झाल्यावर त्यात अगदी थोडे पाणी घालून मध्यम आचेवर शिजवणे. कांदा व टोमॅटो व्यवस्थित शिजले की मग त्यात अर्धा चमचा धनेजिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, अर्धे लिंबू पिळून अजून थोडे पाणी घालून थोडी उकळी आणणे. नंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ डावेने घोटून घेऊन त्यात घालणे. परत १-२ वाट्या पाणी घालून तीव्र आच ठेवून उकळी आणणे. अधुम मधून ढवळणे.


उकळी आली की परत त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पूड व थोडे मीठ घालून अजून थोडी आमटी उकळणे व ढवळणे. वरून थोडे लाल तिखट व धनेजिरे पूड घातल्याने आमटीला रंग छान येतो. आमटी थोडी दाट असू दे. खूप पातळ नको. लिंबू आवडीनुसार कमीजास्त पिळणे.


रोहिणी

Wednesday, January 17, 2007

पालक थालिपीठवाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पालकाची छोटी पाने २५-३०
लहान अर्धा कांदा
२-३ हिरव्या मिरच्या
लाल तिखट, हळद, हिंग, मीठ
हरबरा डाळीचे पीठ
तेल

क्रमवार मार्गदर्शन: पालकाची पाने पाण्याने धुवुन घेवून बारीक चिरणे, कांदा व मिरच्या बारीक चिरुन घेणे, त्यात चविप्रमाणे लाल तिखट, मीठ व थोडेसे हळद,हिंग घालणे. या मिश्रणामधे डाळीचे पीठ व थोडे (५-६ चमचे) तेल घालणे. पीठ जास्त नको, मिळुन येण्याइतपतच घालणे.

वरील मिश्रण कालवताना पाणी वापरायचे नाही, कारण पालकाची पाने ओली असतात, शिवाय कांदा, तिखट-मीठामुळे पाणी सुटतेच. निरलेप तव्यावर थोडे तेल घालून ह्या मिश्रणाचा छोटा गोळा घेवून पातळ थालिपीठ थापा. थालिपीठ थापताना हातावर थोडे तेल घेवून थापावे.

असे हे खरपूस व चविष्ट थालिपीठ दह्याबरोबर खाणे.

रोहिणी

Tuesday, January 16, 2007

श्रीखंड (१)

वाढणी:दोन/तीन जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस :

केफ़िर चीज (लेबनी) नावाचे दही १ डबा/Sour Cream
वेलची जायफ़ळ पूड पाव चमचा
बदाम काजु पिस्ते काप ५ चमचे
केशर चिमुट्भर
साखर १:१ प्रमाण

क्रमवार मार्गदर्शन: केफ़ीर चीज (लेबनी) दह्यामधे १:१ याप्रमाणे साखर घालून चमच्याने ढवळणे. त्यामधे बदाम काजु पिस्ते काप, वेलची जायफ़ळ पूड, केशर घालून परत ढवळ्णे. झाले श्रीखंड तयार.
दह्याला रात्री बांधुन ठेवायची गरज नाही. केफ़ीर चीज लेबनी या दह्यामधे अजीबात पाणी नसते.
हे दही अमेरीकेत कोणत्या दुकानामधे मिळते माहीत नाही. हे श्रीखंड मी एका student कडुन शिकली आहे. तो हे दही एका international shop मधुन आणायचा (denton,texas)
Sour Cream ची कल्पना माझी आहे. हे कोणत्याही अमेरिकन दुकानात मिळते.
साखरेच प्रमाण एकास एक जरी दिले असले तरी अर्धे प्रमाण आधी घालून चव पाहवी व आवडीनुसार नंतर परत घालावी. नाहीतर खूपच गोड होईल.

शेवयांचा उपमावाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कुस्करलेल्या शेवया १ वाटी
साजुक तुप अथवा तेल
मोहोरी, हिंग, चिमूटभर हळद, आणि लाल तिखट
मीठ, साखर, लिंबू १/२
चिरलेला कांदा १ वाटी, हिरव्या मिरच्या ३ ते ४
भाजलेले शेंगदाणे १०/१२

क्रमवार मार्गदर्शन: १ चमचा साजुक तूप अथवा तेलामधे शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घ्या. शेवया भाजताना गॅस मंद ठेवा. ४ ते ५ चमचे साजुक तूप अथवा तेलामधे मोहोरी,  हिंग,  हळद, आणि लाल तिखट घालुन त्यात मिरच्या, कांदा, भाजलेले दाणे घालुन परता. कांदा शिजायला पाहिजे. नंतर त्यात २ वाट्या पाणी ,चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन लिंबू पिळून ढवळा. पाण्याला उकळी आली कि त्यात भाजलेल्या शेवया घालुन ढवळा. नंतर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा.

शेवयांचा उपमा गरम गरम खायला द्या.

मसाला पापड

वाढणी:जितकी माणसे तितके पापड

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उडदाचा पापड
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
लाल तिखट, मीठ

क्रमवार मार्गदर्शन: प्रथम उडदाचा पापड तळून घेणे. नंतर त्यावर खूप बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सम प्रमाणात पूर्ण पापडभर पसरुन घालणे. नंतर त्यावर चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ पेरणे.
रोहिणी

भाज्यांची भजी

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोबी, गाजर, मटार, सिमला मिरची, श्रावणघेवडा
हिरव्या तिखट मिरच्या
लिंबू अर्धे, मीठ
डाळीचे पीठ
तांदुळाचे पीठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: वरील सर्व भाज्या खूप बारीक चिरणे. प्रत्येक बारीक चिरलेली भाजी १ वाटी घेणे व मटारचे दाणे १ वाटी. ५-६ हिरव्या मिरच्या आधी उभ्या व नंतर आडव्या बारीक चिरणे. हे सर्व एका पातेलीमधे घालून त्यात चवीप्रमाणे लिंबू व मीठ घालणे. नंतर त्यात डाळीचे पीठ जास्त आणि तांदुळाचे पीठ थोडेसे घालून पीठ भिजवणे. हे पीठ नेहमीच्या भज्यांप्रमाणे पाणी घालुन भिजवायचे नाही. हे पीठ भिजवताना मिळून आले नाही तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही.

भिजवलेले हे पीठ मुठीत घेउन २-३ वेळा दाबून (लाडू वळतो तसे) तेलात सोडून तळावेत. लांबटगोल आकार द्यावा.

रोहिणी

भरली कारलीवाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हिरवीगार कारली पाव किलो (बुटकी असल्यास जाती चांगली)
ओल्या नारळाचा खव दोन वाट्या
दाण्याचे कूट दोन वाट्या
तिखट, मीठ, गोडा/गरम मसाला, गूळ, हळद, हिंग, धने-जिरे पूड
कोथिंबीर
फोडणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: पहिल्याप्रथम बुटकी हिरवीगार कारल्याचे दोन भाग करणे. कारली उंच असल्यास ३-४ भाग करणे. त्यातील बिया काढणे. नारळाचा खव व दाण्याचे कूट यामधे प्रत्येकी ३-४ चमचे तिखट,धने-जिरे पूड, गोडा किंवा गरम मसाला घालणे. अजुन १ चमचा हळद व अर्धा चमचा हिंग घालणे. कोथींबीर बारिक चिरुन घालणे. लिंबा एवढ्या आकाराचा गूळ व चवीपुरते मीठ घालुन हे सर्व मिश्रण कालवणे. नंतर कारल्यामधे हे मिश्रण दाबून भरणे. हे मिश्रण जास्ती प्रमाणात झाले तरी चालेल, पण कमी पडता कामा नये.


परसट भांड्यात तेल घालुन फोडणी करणे व त्यात ही कारली घालुन मंद आचेवर ५-६ वाफा देवून शिजवणे. सर्व कारली बुडतील एवढे तेल घालणे. कारल्यावर कोणतेही सोपस्कार करु नयेत.
कारल्याच्या कडू चवीमधेच खरी गोडी आहे. अमेरीकेतील तो दसरा मी कधीच विसरणार नाही. कधी नव्हे ते इंडीयन स्टोअर्समधे कारली दिसली, म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भरली कारली केली होती. दोन भारतीय विद्यार्थ्यांना जेवायला बोलावले होते, कारण तेही कारलेप्रेमी होते.


रोहिणीमाहितीचा स्त्रोत : सौ दिप्ती जोशी

पाव-भजीवाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पावाचे स्लाइस ६
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, हिरव्या तिखट मिरच्या ४
लाल तिखट, मीठ, हिंग, हळद
हरबरा डाळीचे पीठ १ वाटी,
तांदुळाचे पीठ ४ -५चमचे
तळायला तेल

क्रमवार मार्गदर्शन: पहिल्याप्रथम पावाच्या स्लाइसच्या सर्व कडा काढणे. नंतर त्याचे सुरीने चार तुकडे करणे. हरबरा डाळ व तांदुळाच्या पिठामधे चविप्रमाणे तिखट,मीठ व थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालणे. चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेल्या मिरच्या घालून बटाटयाच्या भज्यांना भिजवतो तसे पिठ भिजवणे. (खूप पातळ पिठ भिजवू नये) पावाचे केलेले तुकडे पिठात भिजवून तांबुस रंग येईपर्यंत तळणे. ६ स्लाइसमधे २४ भजी होतील.

तांदुळाचे पिठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात आणि कोथिंबीर व मिरच्या घातल्याने भज्यांना वरुन हिरवा रंग येतो म्हणून दिसायला छान दिसतात व चविला चांगली लागतात.

रोहिणी

निवगरी
वाढणी:जितकी माणसे तितक्या निवगऱ्या

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उकडीच्या मोदकांना करतो तशी उकड करणे
कोथिंबीर, मिरच्या, जिरे किंवा जिऱ्याची पावडर
मीठ
उकड मळण्यासाठी तेल,पाणी

क्रमवार मार्गदर्शन:

ही पाककृती सोपी आहे. ज्यांना उकडीचे मोदक करता येतात, त्यांना निवगरी करणे काही अवघड नाही. तांदुळाच्या पीठाची केलेली उकड तेल-पाण्यामधे मळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मिरच्या वाटून घालणे, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर व जिरे/जिरे पावडर घालुन परत मळून घेउन वड्याच्या गोल आकाराप्रमाणे पातळ थापणे. मोदक जसे वाफेवर उकडतो त्याचप्रमाणे केळीच्या पानावर ठेवून उकडणे. गोड मोदक खाताना मधुन मधुन तिखट निवगरी खायला छानच लागते.
मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


रोहिणी

डाळवांगे

वाढणी:चार जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तुरीची डाळ १ वाटी
वांग्याच्या मध्यम आकाराच्या फोडी १०-१२
अर्धी वाटी दाट चिंचेचे पाणी, गूळ छोट्या लिंबाएवढा, मीठ चवीपुरते
धने-जीरे पूड १ चमचा, लाल तिखट १ चमचा, गरम/गोडा मसाला १ चमचा
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कढीपत्ता थोडासा
तेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद,


क्रमवार मार्गदर्शन: तुरीची डाळ कुकरमधे एकजीव शिजवून घेणे. तेलाच्या फोडणीमधे कढीपत्ता, कोथिंबीर व नारळाचा खव घालून वांग्याच्या फोडी १-२ वाफेवर शिजवून घेणे. नंतर त्यामधे लाल तिखट, धने-जीरे पूड, गोडा अथवा गरम मसाला, चिंच-गुळ व चवीप्रमाणे मीठ घालुन हे सर्व मिश्रण थोडे पाणी घालुन व्यवस्थित ढवळावे व सगळे रस (आंबट-गोड-तिखट) उतरण्याकरता मध्यम आचेवर थोडे उकळून घेणे.
नंतर त्यामधे एकजीव शिजवलेली तुरीची डाळ घालुन परत थोडे पाणी घालुन ढवळणे. ५ मिनिटांनी गॅस बंद करणे. झाले तयार डाळवांगे. हे डाळवांगे दाट असु दे. पातळ नको. पोळी-भाकरीशी खूप छान लागते.


रोहिणी

सिमला भजी
वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

सिमला उर्फ ढब्बू मिरची २ (लांब आकाराच्या)
डाळीचे पीठ १ वाटी, अधपाव वाटी तांदुळाचे पीठ
लाल तिखट १ चमचा, हळद अर्धपाव चमचा, हिंग चिमुटभर, मीठ
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: सिमला मिरची लांबट म्हणजेच उभी व बारीक चिरणे. डाळीच्या पीठात तांदुळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून भजी करायला पीठ लागते (थोडे सैलसर) त्याप्रमाणे भिजवावे व त्यामधे सिमला मिरचीचे उभे चिरलेले काप घालून भजी करणे. (ज्याप्रमाणे बटाटा भजी करतो तशी) तादुंळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत होतात. खूप मस्त लागतात. उभी चिरल्यामुळे दिसायला पण छान दिसतात.


रोहिणी

रॅडीश टर्निप कोशिंबीर

वाढणी:ज्या प्रमाणात घ्याल ते प्रमाण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

radish
turnip
zucchini
मीठ, साखर, दाण्याचे कूट, मिरची, दही

क्रमवार मार्गदर्शन: radish, turnip किसणे. त्यात थोडे दाण्याचे कूट, चवीप्रमाणे मीठ, साखर घालून चव येण्यापुरती मिरची चुरडून घालणे. सर्व मिश्रण एकसारखे करणे. ही झाली एक कोशिंबीर.

zucchini किसून त्यात दही व चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सर्व मिश्रण एकसारखे करणे. ही झाली दुसरी कोशिंबीर.

Monday, January 15, 2007

डाळवडा

वाढणी:४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हरबरा डाळ १ वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी
मुगाची डाळ पाव वाटी, तुरीची डाळ अर्धे पाव वाटी (मुगाच्या निम्मी)
लसुण पाकळ्या ८-१०, तिखट हिरव्या मिरच्या ५-६ ,
कोथिंबीर अर्धी वाटी, कढीपत्ता १०-१२ पाने
कांदा छोटा १
मीठ, तळणीसाठी तेल


क्रमवार मार्गदर्शन: प्रथम सर्व डाळी पाण्यामधे ७-८ तास भिजत घाला. नंतर त्या मिक्सरवर वाटुन घेणे. (थोड्या भरड वाटाव्या). वाटलेल्या डाळींमधे लसुण , मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरुन घालणे. कांदा मात्र जाड चिरुन घालावा. कढिपत्ता न चिरता तसाच व चविप्रमाणे मीठ घालुन हे सर्व मिश्रण हाताने कालवावे.

तेलामधे मध्यम आचेवर व लालसर रंग येईपर्यंत वडे तळावेत. वडे पसरट असावेत. आंबट चटणीबरोबर खावेत, जास्त चांगले लागतात. चटण्या (चिंचेची चटणी , अथवा खोबऱ्याची किंवा दाण्याची, पण ह्या चटण्या आंबट दह्यामधे कालवुन घेणे.)

रोहिणी

माहितीचा स्रोत:बहिण सौ रंजना

काचऱ्या


वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

मध्यम आकाराचे २ बटाटे ,
कांदा अर्धा
लाल तिखट १ चमचा, मीठ, चिमुटभर साखर
तेल, मोहोरी, हिंग, हळद


क्रमवार मार्गदर्शन: बटाट्याचे साल न काढता त्याचे चार भाग करुन त्या चार भागाच्या पातळ आकाराच्या चकत्या करणे ,कांदा चिरणे. थोड्याश्या तेलात फोडणी करुन त्यात बटाट्याच्या केलेल्या पातळ चकत्या व कांदा घालुन परतणे. झाकण ठेवून मध्यम आचेवर ३-४ वाफा देउन परतणे. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व चिमुटभर साखर घालुन परत १-२ वाफेवर परतणे.


या खमंग काचऱ्या गरम आमटी भात, मऊ भात याबरोबर चांगल्या लागतात. शिवाय पोळी, डोसा, उत्तप्पा, ब्रेड याबरोबर पण छान लागतात.


अशाच प्रकारे कार्ल्याच्या व तोंडल्याच्या काचऱ्या पण करता येतात. या काचऱ्यांमध्ये दाण्याचे कूट व खवलेला ओला नारळ घालतात.


रोहिणी

सामोसा

वाढणी:४-५ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१२० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

मटारचे दाणे अर्धा किलो
१ मोठा बटाटा, १ छोटा कांदा, ७-८ मिरच्या, ७-८ लसुण पाकळ्या,
प्लॉवर ची फुले ३-४, लिंबू अर्धे छोटे, चिरलेली कोथिंबीर १ वाटी, तीळ ३-४ चमचे
धने-जिरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, हळद, हिंग थोडे, मीठ, साखर.
मैदा २ वाट्या
तळणीसाठी तेल


क्रमवार मार्गदर्शन: कूकरमधे मटारचे दाणे व बटाटा शिजवणे. शिजलेले मटार रोवळीमधे पाणी निथळण्यासाठी काढून ठेवणे. नंतर मैदा भिजवणे. मैदामध्ये लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करुन त्यावर ओतणे. हे सर्व मिश्रण चमच्याने कालवून घेणे, म्हणजे सर्व पीठाला तिखट-मीठाची चव लागेल. मैदा घट्ट भिजवणे. मैदा २ तास मुरवत ठेवणे.


आता लसुण, मिरच्या व कांदा खूप बारीक चिरणे. बटाटे कुस्करुन घेणे. फ्लॉवरची फुले बारीक चिरणे. नंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेले कांदा, लसुण, व मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेला फ्लॉवर यामधे थोडे लाल तिखट, हळद, हिंग, धनेजीरे पूड , चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण चमच्याने एकसारखे कालवून घेणे.


आता भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळा घेउन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटणे. लाटताना तांदुळाच्या पिठीचा वापर करावा. नंतर या पोळीचे कालथ्याने अथवा कातण्याने तीन भाग करणे. हे तीन भाग म्हणजे सामोसाच्या पट्ट्या, या तीन पट्टयांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करणे. याप्रमाणे सर्व सामोसे करुन घेतल्यावर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तळणे व गरम गरम खाणे. चटणी नसली तरी चालते.


पोळी जितकी पातळ तितके सामोश्याचे आवरण कुरकुरीत होईल. मैद्यामधे थोडा बारीक रवा घातल्यास सामोसा खूप कुरकुरीत होतो. पण मैदा कुटून घ्यावा लागतो, व लाटताना खूप त्रास होतो. गव्हाच्या पीठाचे पण सामोसे करतात. २ वाट्यांमधे लहान २०-२५ सामोसे होतात.


रोहिणी

सँडविच

वाढणी:२ जणांना भरपूर

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पावाचे स्लाइस १२
बटर किंवा साजुक तूप
मटारचे दाणे २ वाट्या, बटाटा १ मध्यम,
कांदा अर्धा, टोमॅटो १, बारीक चिरलेला कोबी १ वाटी,
बारीक चिरलेली सिमला मिरची १ वाटी, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
लसुण पाकळ्या ७-८, हिरव्यागार तिखट मिरच्या ५-६


क्रमवार मार्गदर्शन: मटारचे दाणे व बटाटा उकडून घ्यावेत. नंतर रोवळीमधे ठेवावेत, म्हणजे त्यातील पाणी निथळून जाईल. नंतर कुस्करलेला बटाटा, कुस्करलेले मटारचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, लसुण, हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, सिमला मिरची व कोथिंबीर हे सर्व चमच्याने एकत्रित करुन घेणे. चवीप्रमाणे मीठ घालणे. परत एकदा मिश्रण एकत्रित करणे.

नंतर एका स्लाइसवर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण पसरणे (जाड थर) व एका स्लाइसवर बटर किंवा साजुक तूप पसरणे. हे दोन्ही स्लाइस एकमेकांवर ठेवुन ब्रेड टोस्टर मधे भाजून घेणे. व गरम गरम खाणे.


रोहिणी

पीठ पेरलेल्या भाज्या

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पालेभाजी (पालक, मेथी, शेपू, कांदेपात), सिमला मिरची, कांदा
पालेभाजी १ जुडी, सिमला मिरची, कांदा प्रत्येकी २
तिखट, मीठ, साखर,
तेल,
हरबरा डाळीचे पीठ

क्रमवार मार्गदर्शन: वरील दिलेल्या भाज्यांपैकी जी करणार असाल ती भाजी बारीक चिरणे. फोडणीला तेल नेहमीपेक्षा थोडे जास्ती घालणे. फोडणीमधे भाजी घालून परतणे. मंद आचेवर २-३ वेळा वाफ देवून शिजवणे. नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून थोडीशी साखर घालणे. परत परतून त्यात वरुन थोडे डाळीचे पीठ घालुन परतणे व एक वाफ देवून परत परतणे. झाली भाजी तयार. भाजी मिळून येण्याइतकेच पीठ पेरावे. पीठ पेरलेल्या भाज्या चवीला चांगल्या लागतात. पीठ जास्त नको, थोडेसेच पेरायचे. नुसती खायला पण चांगली लागते.


रोहिणी

श्रावणघेवडा

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

श्रावणघेवडा (बीन्स) बारीक चिरलेला २ वाटी
अर्धा चमचा बारीक चिरलेले आले,
१ मिरची बारीक चिरलेली, चिरलेली कोथिंबीर ३-४ चमचे
दाण्याचे कूट ३-४ चमचे, ३-४ चमचे ओला नारळ
मीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे


क्रमवार मार्गदर्शन: तेलाच्या फोडणीमध्ये मिरची, आले, घालून परतावे. नंतर त्यात चिरलेला श्रावणघेवडा (बीन्स) घालून परतावे. झाकण ठेवून २-३ मिनिटांनी ते काढून परत परतावे. असे ३-४ वेळेला करावे. म्हणजे भाजी वाफेवर चांगली शिजेल. भाजी शिजण्यापुरतेच अगदी थोडे पाणी घालावे. पाणी जास्त नको, कारण ही कोरडी भाजी आहे. नंतर त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून ३-४ वेळा परतणे. श्रावणघेवडा पटकन शिजण्याकरता खूप बारीक चिरावा.


रोहिणी

जाड पोह्यांचा चिवडा
वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

जाड पोहे ३ मूठी
भाजलेले शेंगदाणे १ मूठ
लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धपाव चमचा
मीठ, तेल, चिमूटभर साखर, चिमूटभर हिंग


क्रमवार मार्गदर्शन: प्रथम पोहे चाळून घेणे. नंतर कढईत तीव्र आचेवर तेल तापले की मग गॅस बारीक करून पोहे तळून घेणे. हे पोहे चांगले फुलून येतात. पोहे कढईतून काढताना झाऱ्याने व्यवस्थित निथळून घेणे. हे पोहे तेल खूप पितात म्हणून तळून झालेले व झाऱ्याने पूर्णपणे निथळलेले पोहे पेपरटॉवेलवर पसरून ठेवणे, म्हणजे सर्व तेल कागदाला शोषले जाईल. नंतर हे पोहे एका पातेल्यात घालून त्यात तिखट, हळद, हिंग, साखर, भाजलेले शेंगदाणे (साले काढून) व चवीनुसार मीठ घालून चमच्याने एकसारखे करणे.

हा चिवडा करायला सोपा आहे. कुरकुरीत व चविष्ट लागतो.

माहितीचा स्रोत:सिंपल डिंपलची आई

अधिक टीपा:कार्यालयातून आल्यावर गरमागरम चहा बरोबर हा चिवडा खाल्ला तर रात्रीचा स्वयंपाक करण्यास उत्साह येतो.


» you can't post comments
प्रे. प्रशासक (शुक्र, ०८/०९/२००६ - १६:५८) हार्दिक अभिनंदन
ह्या पाककृतीबरोबर रोहिणी ह्यांनी मनोगतावर ५० पाककृती लिहून पूर्ण केल्याचे कळते.
हार्दिक अभिनंदन!

वऱ्याचे तांदुळ

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

१ वाटी वऱ्याचे तांदुळ
मूठभर दाण्याचे कूट,
मूठभर चिरलेली कोथिंबीर, मूठभर खवलेला ओला नारळ
१ तिखट मिरची, साजुक तूप २-३ चमचे
जिरे १ चमचा, ५ वाट्या पाणी
मीठ

क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी वऱ्याचे तांदुळ धुवून घेणे आपण भाताला धुवून घेतो तसे. साजुक तूपामध्ये जिरे, मिरचीचे तुकडे, व वऱ्याचे तांदुळ घालून थोडे परतणे मध्यम आचेवर. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून शिजवणे. थोडे शिजत आले की त्यात कोथिंबीर, नारळ, दाण्याचे कूट, चवीपुरते मीठ व अजून २ वाट्या पाणी घालून सर्व मिश्रण कालथ्याने ढवळणे. पाणी आटत आले की गॅस मंद करून झाकण ठेवणे. १० मिनिटांनी गॅस बंद करणे. वऱ्याचे तांदुळ लवकर शिजतात, पण गार झाले की खूप घट्ट होतात म्हणून जास्त पाणी घालावे लागते.


रोहिणी

दाण्याची आमटी

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

१ वाटी भाजलेले दाणे
१ चमचा साजूक तूप, १ तिखट मिरची
२ चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे खवलेला ओला नारळ
१ चमचा जिरे, अर्धी वाटी चिंचेचे दाट पाणी
गूळ छोट्या सुपारीइतका
चवीपुरते मीठ


क्रमवार मार्गदर्शन: १ वाटी भाजलेल्या दाण्याची साले काढून मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेणे. नंतर त्यात पाणी घालून मिक्सरमधेच गंधासारखे बारीक वाटून घेणे. तूपजिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये मिरचीचे तुकडे व गंधासारखे बारीक झालेले दाण्याचे मिश्रण घालून त्यात चिंचेचे पाणी, गूळ, कोथिंबीर, ओला नारळ व चवीपुरते मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालणे व उकळी आणणे. पातळ/दाट ज्याप्रमाणे आमटी आवडते त्यानुसार पाणी घालणे.


अमेरिकेत dry roasted peanuts मिळतात ते वापरले तरी चालेल म्हणजे दाणे भाजण्याचा व सोलण्याचा त्रास वाचेल. ही आमटी वऱ्याच्या तांदुळाबरोबर खातात जसे की आमटी भात.


रोहिणी

भाकरी

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

ज्वारीचे पीठ ३-४ मुठी
चवीपुरते मीठ
कोमट पाणी

क्रमवार मार्गदर्शन: ज्वारीचे पीठ ३-४ मुठी एका परातीत घेऊन कोमट पाण्याने मळून घेणे. सैलसर गोळा होईल इतपत मळून घेणे. घट्ट नको. पीठ मळून झाल्यावर एका पातेल्यात ठेवून देणे. नंतर परातीत ज्वारीचे थोडे पीठ पूर्ण परातभर पसरून घेणे. नंतर भिजवलेल्या पीठाचा हवा तसा एक गोळा एकसारखा करून थोडा चपटा करून घेऊन परसलेल्या पीठावर ठेवून त्यावरून अजून थोडे ज्वारीचे पीठ पसरून घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे फिरतात त्याच्या विरूद्ध दिशेने थापणे. थापताना अधुन मधुन गोळा घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने सरकवणे. याप्रमाणे गोळा मोठा व गोल होतो. थापताना हाताचा भार कडेकडेने जास्त द्या. म्हणजे कडेने पातळ व मधे जाड होईल. थापताना आपण थापट्या मारतो त्याप्रमाणेच थापा. भाकरीचे पीठ मळून व एक भाकरी थापून होईपर्यंत मंद आचेवर तवा तापत ठेवणे.

नंतर ही भाकरी तव्यावर उपडी करून घालणे. तव्यावर भाकरी उपडी घातली रे घातली की लगेचच ओंजळीत थोडे पाणी घेऊन पूर्णपणे भाकरीवर पसरवणे. हे पाणी फक्त पसरवण्यापुरतेच घेणे. जास्त नको. ही क्रिया पटकन झाली पाहिजे. नंतर ५-६ सेकंदाने कालथ्याने भाकरी उलटी करणे. भाकरी उलटल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवणे. आता ही उलटी केलेली भाकरी दुसऱ्या बाजूने भाजुन निघेल. ही भाकरी भाजली आहे की नाही ते कालथ्याने भाकरी वर उचलून पहा. पूर्णपणे भाजली गेली की मग तवा दुसरीकडे ठेवून भाकरीचा न भाजलेला भाग गॅस मोठा करून त्यावर ठेवणे. भाकरी लगेचच फुगेल. फुगल्यावर लगेच गॅसवरून काढणे.


३-४ मुठी भाकरीच्या पीठात २ मोठ्या भाकऱ्या होतील. अशाच पद्धतीने बाजरीच्या व तांदुळाच्या पीठाच्या भाकऱ्या होतात.


रोहिणी

पोळी


वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कणीक १ वाटी (मध्यम)
मीठ चिमुटभर
तेल २ चमचे
पाणी
१ मध्यम वाटी कणकेच्या ४ पोळ्या होतात

क्रमवार मार्गदर्शन:

कणीक भिजवणे

कणिक भिजवताना त्यात थोडे चविपुरते मीठ व तेल घालावे. थोडे थोडे पाणी घालुन कणिक भिजवावी, सैल अथवा घट्ट नसावी. थोडे तेल घालुन कणिक खूप मळावी, म्हणजे एकसारखी भिजेल. भिजल्यावर १५ मिनिटांनी पोळ्या कराव्या.


पोळी लाटणे

पोळी लाटताना परत थोडी कणिक मळुन घेणे. कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेउन तो गव्हाच्या पिठात बुडवुन लाटावा, थोडासा लाटुन त्यावर तेल लावुन त्रिकोणी अथवा गोल घडी करावी. परत गव्हाचे पीठ लावून ती गोल अथवा त्रिकोणी पोळी लाटावी. लाटताना पिठाचा वापर जास्त करावा म्हणजे पोळी पोळपाटाला कधिही चिकटत नाही. पोळी कडेकडेनी लाटावी, म्हणजे लाटण्याचा दाब पोळीच्या सर्व कडेच्या बाजुंवर एकसारखा पडला पाहिजे. लाटण्याचा दाब पोळीच्या मध्यभागी जास्त झाला तर मध्यभागी पोळी पातळ व बाजुने जाड होईल, त्यामुळे भाजताना पोळी मध्यभागी जास्त भाजली जाइल व कडा जाड राहिल्याने कच्या रहातील.


पोळी भाजणे


पहिली पोळी लाटायच्या आधी गॅसवर मध्यम आचेवर तवा ठेवावा,म्हणजे पोळी लाटेपर्यंत तवा चांगला तापेल. तवा नेहमी मध्यम आचेवर ठेवावा. कमी आचेवर तापलेल्या तव्यावर पोळी भाजली तर कडक होईल, जास्त आचेवर भाजली तर कच्ची राहील. पोळी भाजताना कमितकमी वेळा उलटावी. पोळी भाजताना जेथुन वाफ बाहेर येत असेल तेथे वाटीने दाबुन ठेवावी म्हणजे दुसरीकडून पोळी फुगते. असे केल्याने पोळी सर्व बाजुने भाजली जाते, फुगते. पोळी तव्यावरुन खाली काढल्यावर ती पोलपाटावर आपटावी, म्हणजे चक्क मोडावी, म्हणजे आतील वाफ निघुन जाते व पोळी कडक होत नाही. नंतर पोळीला २ ते ३ थेंब तेल लावून पोळीच्या डब्यात ठेवणे.

कणिक भिजवल्यापासुन भाजेपर्यंत सर्व काळजी घेतली तर पोळ्या चांगल्या होणारच.

टीपः पोळ्या जास्तीत जास्त आपल्याकडून लाटल्या गेल्या की आपोआपच जास्तीत जास्त चांगली पोळी होण्याचे कौशल्य प्राप्त होते, आणि म्हणूनच रोज दुपारी जेवायला पोळी भाजी हा मेनू असावा.

रोहिणी

टोमॅटो सार

वाढणी:दोन जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लाल मध्यम आकाराचे टोमॅटो ४ ते ५
लाल तिखट, धने-जीरे पूड, साखर प्रत्येकी अदपाव चमचा
मीठ, जीरे, मोहरी, हिंग, तेल १ चमचा
१ कमी तिखट असलेली हिरवी मिरची
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ प्रत्येकी २-३ चमचे

क्रमवार मार्गदर्शन: टोमॅटो अर्धे चिरुन कूकरमधे शिजवणे. गार झाल्यावर शिजलेल्या टोमॅटोची साले काढून टाकणे. नंतर शिजलेले टोमॅटो २-३ चमचे ओला नारळ व १ मिरची मिक्सरमधून एकजीव करून घेणे. नंतर हे एकजीव झालेले मिश्रण एका पातेलीत काढून त्यात तिखट, धनेजीरे पूड, मीठ व साखर घालणे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालणे. नंतर कढल्यात तेल घालून त्यात मोहरी, जिरे व हिंग टाकून फोडणी करून टोमॅटोच्या मिश्रणामधे घालणे व एक उकळी येईपर्यंत गरम करणे.
लाल तिखट, धने जीरे पूड व साखर चवीप्रमाणे कमी/जास्त घालावी. जास्त नको, स्वाद येण्यापुरतीच. जास्त तिखट चव नको. गरम गरम पिणे. ओला नारळ पण दाटपणा येण्यापुरताच, जास्त नको.


रोहिणी

रताळ्याची खीर

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

रताळी २
दूध, साखर
वेलची पूड

क्रमवार मार्गदर्शन: २ रताळी कूकरमधे उकडून घ्यावीत, २-३ शिट्या जास्ती कराव्यात, म्हणजे जास्ती शिजतील. रताळ्यांची साले काढून त्याच्या खूप बारीक फोडी कराव्यात. ह्या फोडी पूर्णपणे भिजतील इतके दूध घालावे. चवीप्रमाणे साखर घालावी. थोडी वेलची पूड घालावी. हे सर्व मिश्रण ३-४ तार मूरु द्यावे. नंतर ही खीर शीतकपाटात ठेवावी. उपवासाचा फराळ केल्यावर नंतर खावी. शीतकपाटात ठेवल्यामुळे ही खीर जास्ती मुरते आणि दाट होते व चवीला चांगली लागते. खीर पातळ हवी असल्यास त्याप्रमाणात दूध घालावे.

दूसरा एक गोड प्रकारः राजगिऱ्याचा लाडू वाटीमधे ठेवून त्यावर खूप गरम झालेले दूध हळूहळू ओतावे, त्यामुळे राजगिऱ्याचा लाडू फुटून दुधामधे विरघळतो. ही झाली झटपट राजगिऱ्याची खीर. बाजारात राजगिऱ्याचे लाडू मिळतात.


रोहिणी

Sunday, January 14, 2007

सांबार

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

शिजलेली तुरीची डाळ १ वाटी, तेल, फोडणीचे साहित्य(मोहरी,हिंग,हळद)
फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची, मटार दाणे, वांगे, श्रावणघेवडा, बटाटा
बारीक चिरलेला कांदा मूठभर, २ बारीक चिरलेले टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या
चिंचेचे दाट पाणी लहान १ वाटी, गुळ थोडासा,मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ अर्धी वाटी,
लाल तिखट, गरम मसाला, MDH सांबार मसाला, धने-जीरे पूड प्रत्येकी १ चमचा

क्रमवार मार्गदर्शन: नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घालून फोडणी करावी. फोडणीमधे लाल तिखट, धने-जिरेपूड, गरम मसाला, सांबार मसाला, (आवडीप्रमाणे कमीजास्त प्रमाणात) कोथिंबीर, ओला नारळ, चिंचेचे पाणी, थोडा गूळ, चवीपुरते मीठ, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो व वरील सर्व भाज्या जाड चिरुन (२-३ वाट्या) अथवा आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालून व थोडे पाणी घालून शिजवणे. चांगली दणदणीत उकळी आली पाहिजे इतके शिजवणे.

भाज्या जाड चिरणे हे महत्वाचे. फक्त कांदा व टोमॅटो बारीक चिरणे. नंतर शिजलेली तुरीची डाळ डावेने एकजीव करून उकळलेल्या भाज्यांच्या मिश्रणात घालून व चवीपुरते मीठ व पाणी घालून (सांबार ज्या प्रमाणात दाट/पातळ हवे त्याप्रमाणात पाणी घालावे) परत एक चांगली उकळी आणावी.

असे हे तिखट, आंबटगोड भाज्यांचे सांबार इडली, डोसे किंवा गरम भाताबरोबर गरम गरम खावे.

इडलीवाढणी:४ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस
तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राइस)
उडदाची डाळ १ वाटी
चवीपुरते मीठ

क्रमवार मार्गदर्शन: २ वाट्या तांदुळ व १ वाटी डाळ दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात दुपारी १२ ला भिजत घालणे. रात्री १० ला मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक वाटून घेणे. वाटून झालेले पीठ एका पातेल्यात झाकून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहरीला किंवा दुपारी १२ वाजता जेवायला इडली करणे. दुसऱ्यादिवशी हे झाकून ठेवलेले पीठ फसफसून वर येते. आंबट होते.

इडली करायच्या वेळेला एका पातेल्यात फसफसलेले पीठ काढून घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालून व थोडे पाणी घालून डावेने चांगले घोटून घेणे. हे पीठ आपण भज्यांना पीठ भिजवतो इतके पातळ झाले पाहिजे. (पळीवाढे) गंधासारखे एकजीव दिसायला हवे. नंतर इडली स्टँडला तेलाचा हात लावून त्यात हे पीठ घालणे. नंतर कूकरमध्ये थोडे पाणी घालून इडली स्टँड त्यामध्ये ठेवून कूकरची शिटी काढून गॅसवर (मध्यम आचेच्या थोडी वर आच ठेवून) १५ मिनिटे ठेवणे. गॅस बंद केल्यावर १५ मिनिटांनी कूकरचे झाकण काढून सुरीने सर्व इडल्या सोडवून घेणे.

चटणी किंवा सांबारासोबत गरमागरम इडली खाणे. डोश्याला वरील दिलेलेच डाळ तांदुळाचे प्रमाण वापरणे. वरील मिश्रणात एकदा इडली व एकदा डोसे होतात.

खोलगट डीशमध्ये गरम इडली सांबार घालून त्यावर ओल्या नारळाची पातळ चटणी व बारीक शेव घालून खावयास देणे.

Monday, January 08, 2007

कांदा उत्तप्पा


वाढणी:२ जण


पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस


तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राईस)
उडीद डाळ अर्धी वाटी
अर्धा मोठा कांदा
चिरलेली कोथिंबीर १ वाटी
तिखट हिरव्या मिरच्या ३-४
चवीपुरते मीठ, व तेल


क्रमवार मार्गदर्शन: तांदुळ व उडीद डाळ दुपारी १ ला पाण्यात भिजत घालणे वेगवेगळ्या पातेल्यात. रात्री १० ला मिक्सर/ग्राइंडर मधे बारीक वाटून घेणे. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ला उत्तप्पा करणे. उत्तप्पा करताना त्यामध्ये कांदा थोडा जाड चिरून घालणे. शिवाय मिरच्यांचे बारीक तुकडे , चिरलेली कोथिंबीर, व चवीप्रमाणे मीठ घालून तवा चांगला तापल्यावर थोडे तेल घालून कालथ्याने पसरवणे व नंतर तव्यावर जाड उत्तप्पे घालणे. उत्तप्पा घालून झाल्यावर ५-६ सेकंदाने थोडे तेल उत्तप्पाभर पसरवून नंतर ५-६ सेकंदाने उलटणे. म्हणजे दोन्हीकडून खरपूस भाजला जाईल.


ओल्या नारळाची दह्यातली पातळ चटणी व तिखट सांबाराबरोबर खाणे.

रोहिणी गोरे