Wednesday, April 11, 2007

शंकरपाळे


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अर्धी वाटी साजुक तूप,
अर्धी वाटी साखर,
अर्धी वाटी दूध
तळणीसाठी तेल किंवा तूप
२ वाट्या मैदा अथवा
unbleached all purpose flour (king arthur)


क्रमवार मार्गदर्शन:

दूध, साखर व तूप एका पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवणे. उकळी आली की गॅस बंद करून त्या गरम मिश्रणात मैदा किंवा (all purpose flour) घालून कालथ्याने ढवळणे. मैदा घालत असतानाच एकीकडे पीठ लगेच ढवळणे, नाहीतर गुठळी होते. सैलसर एकजीव गोळा तयार झाला की तेलाचा हात घेऊन पीठ कणकेप्रमाणे मळून दोन तास मुरवत ठेवणे. हा तयार झालेला पीठाचा गोळा घट्ट नको.

दोन तासानंतर एक मोठा गोळा घेऊन पोलपाटभर एक मोठी पोळी लाटणे. लाटताना थोडी कणीक किंवा मैदा वापरणे. मोठी पातळ पोळी लाटली की त्याचे कालथ्याने किंवा कातण्याने तिरके चोकोन कापून मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळणे. हे शंकरपाळे कुरकुरीत व खुसखुशीत होतात. तळताना ते फुगतात.


२ वाट्यांमध्ये साधारण ५-६ मोठ्या पोळ्या होतात त्याचे तिरके चोकोनी तुकडे करून तळणे.
साधारण २ वाट्या मैद्याचे पीठ (दुध,साखर,तूप) या मिश्रणात मावते. थोडे कमी जास्त प्रमाण करावे लागेल. पीठ घालून ढवळताना एकसारखा गोळा होईपर्यंत पीठ घालणे. साजूक तूप नसेल तर तेल किंवा डालडा तूप वापरले तरी चालेल. पण मी अजून तसे करून पाहिले नाहीत.

रोहिणी

कणीस कीस

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोवळी मक्याची लहान आकाराची कणसे ३-४
मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
दाण्याचे कूट २ चमचे, मीठ, चिमुटभर साखर
तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन:

मक्याची कोवळी कणसे किसून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घालणे. २-३ वाफा देवून शिजवणे व परतणे. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परतणे. गरम गरम खाणे.

याच पद्धतीप्रमाणे बटाट्याचा कीस करतात. प्रमाण १ मोठा बटाटा एकासाठी. बटाट्याची साले न काढता किसणे. मोहरी, हिंग, हळदीच्या ऐवजी फक्त जीरे घालणे. तेलाच्या ऐवजी साजुक तुपातला खूपच छान लागतो. मिरच्या तिखट नसतील तर थोडे लाल तिखट घालणे.


रोहिणी