Friday, September 14, 2007

आंबोळी



वाढणी:ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तांदुळ ३ वाट्या
हरबरा डाळ पाउण वाटी, उडीद डाळ पाऊण वाटी
गहू अदपाव वाटी, मेथी अर्धी वाटी
जिरे २ चमचे
धने १ चमचा
आंबट ताक, लाल तिखट, मीठ, लसूण
हळद, हिंग, तेल

क्रमवार मार्गदर्शन:

तांदुळ, हरबरा डाळ, उडीद डाळ, गहू, मेथी,जिरे व धने हे सर्व एकत्र करून गिरणीतून दळून आणणे. ज्या प्रमाणात आंबोळी घालायची असेल तेवढे पीठ घेऊन त्यात आंबट ताक घाला. ३ वाट्या पीठ असेल तर अर्धी वाटी आंबट ताक घालून जरूरीपुरते पाणी घालून थोडेसे पातळ भिजवा. ४-५ तासानंतर या पीठात अजून थोडे पाणी घालून पीठ एकसारखे करून घ्या. नंतर त्यात आवडीप्रमाणे लसूण अर्धवट ठेचून (पेस्ट नको) घाला. चवीपुरते लाल तिखट, मीठ, किंचित हळद व हिंग घालून परत एकदा डावेने पीठ एकसारखे करा. तापलेल्या तव्यावर तेल पसरून त्यावर पीठ पसरून त्यावर झाकण ठेवा. काही वेळाने ही आंबोळी उलटा. परत थोडे तेल त्यावर सर्वबाजूने घाला. झाली आंबोळी तयार. (धिरडे/घावन/डोसे घालतो तसेच घालायचे आहे)

खायला देताना सोबत लसणाची झणझणीत चटणी किंवा कैरीचे लोणचे द्या. ताटलीमध्ये खायला देताना आंबोळीवर साजूक तूप घालावे.

माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:आंबोळी बाळंतिणीला खायला देतात. जास्त करून पावसाळ्याच्या दिवसात खातात. पौष्टीक आहे. मेथीची कडवट चव चांगली लागते.

शेव



वाढणी:ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हरबरा डाळीचे पीठ
मीठ, पीठ भिजवण्यासाठी लागणारे पाणी
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:

डाळीच्या पीठात चवीपुरते मीठ घालून पीठ सैल भिजवावे. भिजवताना पीठाची गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी. पीठ भिजले की त्याला थोडा तेलाचा हात लावावा. पीठ नितळ झाले पाहिजे. नंतर कढईत तेल गरम करावे. चकली करण्याच्या सोऱ्यामधे शेव पाडायची चकती घालून आपण जशी कुरडई घालतो त्याप्रमाणे गोलाकार शेव थेट कढईत घालावी. मध्यम आच ठेवावी. शेव कडक झाली का नाही ते झाऱ्याने पडताळून पहावे. शेव कडक झाली की मगच ती झाऱ्याने उलटावी. नंतर २-४ मिनिटांनी ताटलीत काढावी. गार झाली की बारीक करून डब्यात भरून ठेवणे. ही शेव थोडी कडक व कुरकुरीत होते.