
वाढणी : २ जण
जिन्नस :
फ्लॉवरची फुले ४ ते ५ वाट्या
मटार १ वाटी
टोमॅटो १
पाव कांदा
१ लहान बटाटा
हिरवी मिरची १
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पावडर अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
साखर अर्धा चमचा
थोडी चिरलेली कोथिंबीर
तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळद
क्रमवार मार्गदर्शन : फ्लॉवरची फुले काढा. मटार सोलून घ्या किंवा फ्रोजन असतील तर पाण्याने धुवून घ्या. फ्लॉवरची फुले पण पाण्याने धुवून घ्या. कांदा, बटाटा, टोमॅटो मध्यम आकाराचे चिरून घ्या. मिरच्यांचे तुकडे करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करा. फोडणीत मिरच्यांचे तुकडे आधी घाला. नंतर फ्लॉवर, टोमॅटो, कांदा, बटाटा व मटार घालून चांगले परतून घ्या. परतल्यावर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत परता. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ, साखर घाला व परत एकदा भाजी चांगली ढवळून घ्या. परत झाकण ठेवा व वाफेवर भाजी शिजवा. ही भाजी पटकन शिजते. आता परत झाकण काढून ढवळून घ्या व काही सेकंद ही भाजी परता. कालथ्याने फ्लॉवर नीट शिजला आहे का नाही ते पहा. शिजला नसेल तर परत एक वाफ द्या. सगळ्यात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून परता. एका वेगळ्या चवीची भाजी छान लागते. पटकन होते. मला ही भाजी पोळीपेक्षाही भाताबरोबर खायला आवडते.