
"काजूपिस्ता वडी" ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २००९ इथे प्रकाशित झाली आहे. खाली लिंक दिली आहे.
http://www.manogat.com/diwali/2009/node/47.html
जिन्नस :
काजू पूड १ वाटी
पिस्ता पूड १ वाटी
साखर सव्वा वाटी
रिकोटा चीझ २ चमचे
साजुक तूप ५-६ चमचे
मार्गदर्शन : मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा. त्यात सव्वा वाटी साखर व साखर पूर्णपणे बुडून थोडे वर पाणी घाला. थोडी आंच वाढवा. मिश्रण चांगले उकळू दे. अधूनमधून कालथ्याने ढवळत रहा आणि एकीकडे त्यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कितपत घट्ट होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक झाला की आंच मध्यम करून त्यात साजुक तूप, रिकोटा चीझ व काजू-पिस्त्याची पूड घालून ढवळा. हे मिश्रण सारखे ढवळत रहा. काही वेळाने हे सर्व मिश्रण एकत्रित होऊन एकसंध होते. थोडे घट्ट लागायला लागते. गंधासारखे पूर्ण एकजीव झाले की गॅस बंद करा. नंतर काही वेळ कालथ्याने हे मिश्रण ढवळत राहा.
ताटलीला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. ओतले की हे मिश्रण पसरायला लागेल. थोडे जास्त पसरण्यासाठी ताटली हाताने थोडी सर्व बाजूने वाकडी करा म्हणजे मिश्रण ताटलीभर पसरून त्याची पातळी एकसारखी होईल. हे मिश्रण पटकन कोरडे होते म्हणून लगेच ताटली फिरवून घ्यावी. हे जमले नाही तर एका प्लस्टिकच्या कागदाला साजुक तुपाचा हात लावून, साजुक तूप लावलेला भाग मिश्रणाच्या वर येईल असा ठेवून पटापट एकसारखे थापावे. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडाव्या.
या वड्या पटकन होतात. मी या वड्यामध्ये रोस्टेड काजू-पिस्ते वापरले आहेत त्यामुळे रंग थोडा फिका आला आहे.