
जिन्नस :
बारीक चिरलेला गूळ २ वाट्या
दाण्याचे कूट पाव वाटी
२ मोठे चमचे तीळ
१ मोठा चमचा खसखस
पाव वाटी हरबरा डाळीचे पीठ
साधारण ५-६ चमचे तेल
कणीक १ वाटी
कणकेसाठी तेल ५-६ चमचे
तांदुळाची पिठी
मीठ
क्रमवार मार्गदर्शन : बारीक चिरलेला गूळ, दाण्याचे कूट, तीळ व खसखस यांची बारीक पूड व भाजलेले डाळीचे पीठ सर्व एकत्र हाताने कालवून घ्या. तीळ व खसखस पूड करण्याच्या आधी भाजून घ्या. डाळीचे पीठ तेल घालून भाजून घ्या. कणकेमध्ये तेल व मीठ घालून घट्ट कणीक भिजवा.
१ ते २ तासाने पोळ्या करायला घ्या. कणकेची छोटी गोळी घ्या व थोडी गोल लाटा पुरीप्रमाणे. दुसरी एक छोटी गोळी घ्या व ती पण पुरीप्रमाणे अगदी थोडी गोल लाटा. आता तयार केलेला गूळ आहे तो घ्या. तो ह्या दोन पुरीसारख्या लाटलेल्या गोळ्यामध्ये मावेल इतपत घ्या. याचा गोळा घेताना त्याचा गोल करून हाताने थोडा चपटा करा. हा चपटा केलेला गूळ त्या दोन छोट्या पुऱ्यांमध्ये घाला व पुरीच्या सर्व कडा हाताने बंद करा. त्यावर तांदुळाची पिठी घालून नेहमीसारखी पोळी लाटा. तव्यावर भाजा. भाजताना आच खूप मंद ठेवा. ही पोळी उलटताना कालथा वापरा. हाताने उलटू नका. कारण भाजताना गूळ बाहेर येतो व गरम गूळाने हात भाजतो. पोळीबरोबर भरपूर साजूक तूप घ्या.
पोळी लाटताना गूळ पोळीच्या सर्व कडांपर्यंत पोहचला पाहिजे. तसे झाले नाही तर एक युक्ती आहे. कातण्याने किंवा कालथ्याने पोळीच्या कडा काढा. गूळ शेवटपर्यंत पोहचला नाही तरी काही बिघडत नाही. गूळ जर चिकट नसेल तर गूळ बनवताना मिळून येत नाही. त्याचा गोळा बनवता येत नाही. यासाठी तयार केलेला गूळ कढईत ठेवून अगदी मंद आचेवर थोडा ढवळून घ्यावा. हा गूळ अगदी थोडा गरम होऊ देत. नंतर त्यात तूप/तेल घालून परत एकदा एकत्र कालवून घ्या म्हणजे गोळा बनवता येईल व तो दोन छोट्या पुऱ्यांमध्ये घालता येईल. या गुळाच्या सारणात अगदी थोडा चुना घालतात. त्याने पोळ्या जास्त खुसखुशीत होतात.