Thursday, August 27, 2009

फ्लॉवर-मटार-बटाटा-कांदा-टोमॅटो



वाढणी : २ जण

जिन्नस :

फ्लॉवरची फुले ४ ते ५ वाट्या
मटार १ वाटी
टोमॅटो १
पाव कांदा
१ लहान बटाटा
हिरवी मिरची १
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पावडर अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
साखर अर्धा चमचा
थोडी चिरलेली कोथिंबीर
तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : फ्लॉवरची फुले काढा. मटार सोलून घ्या किंवा फ्रोजन असतील तर पाण्याने धुवून घ्या. फ्लॉवरची फुले पण पाण्याने धुवून घ्या. कांदा, बटाटा, टोमॅटो मध्यम आकाराचे चिरून घ्या. मिरच्यांचे तुकडे करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करा. फोडणीत मिरच्यांचे तुकडे आधी घाला. नंतर फ्लॉवर, टोमॅटो, कांदा, बटाटा व मटार घालून चांगले परतून घ्या. परतल्यावर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत परता. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ, साखर घाला व परत एकदा भाजी चांगली ढवळून घ्या. परत झाकण ठेवा व वाफेवर भाजी शिजवा. ही भाजी पटकन शिजते. आता परत झाकण काढून ढवळून घ्या व काही सेकंद ही भाजी परता. कालथ्याने फ्लॉवर नीट शिजला आहे का नाही ते पहा. शिजला नसेल तर परत एक वाफ द्या. सगळ्यात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालून परता. एका वेगळ्या चवीची भाजी छान लागते. पटकन होते. मला ही भाजी पोळीपेक्षाही भाताबरोबर खायला आवडते.

Tuesday, August 18, 2009

पालक भजी




वाढणी : २ जण

जिन्नस :

बारीक चिरलेला पालक ३ वाट्या
हरबरा डाळीचे पीठ दीड वाटी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
मीठ चवीपुरते
तळणीसाठी तेल


सजावटीसाठी :
बारीक चिरलेला पांढरा कांदा
शेंदरी गाजराच्या पातळ चकत्या (गाजराची साले काढा)
कोथिंबीरीची पाने

क्रमवार मार्गदर्शन : बारीक चिरलेला पालक पाण्याने धूउन चाळणीमध्ये पाणी निथळ्यासाठी ठेवा. चाळणीखाली एक ताटली ठेवा म्हणजे पाणी निथळून ताटली जमा होईल. पाणी निथळले की काही वेळाने चिरलेला पालक एका भांड्यामध्ये घाला. त्यात हरबरा डाळीचे पीठ, लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घाला. पाण्याने हे पीठ सैलसर भिजवा. भजी चमच्याने सहज कढईमध्ये घालता आली पाहिजेत इतके पातळ पीठ भिजवा. आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात भजी तळली जातील इतके तेल घाला. काही सेकंदाने तेल तापेल. भजी तळण्यासाठी तेल जास्त तापावे लागते. ते पुरेसे तापले आहे की नाही याकरता अगदी थोडे भिजवलेले पीठ तेलात घाला. ते जर लगेच वर आले तर तेल पुरेसे तापले असे समजावे. आता या तापलेल्या तेलातले २ मोठे चमचे तेल हे भज्यांच्या पीठात घाला. चुर्र असा आवाज येईल. मग हे भज्यांचे मिश्रण चमच्याने एकसारखे करून घ्या. तापलेल्या तेलात चमच्याने भजी घालून तळा. ही भजी कुरकुरीत व हलकी फुलकी होतात. भजी तळून झाली की ती एका पेपर टॉवेल वर घाला म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल.

एका डीशमध्ये ही भजी मधोमध ठेवा. व बाजूने गाजराचे काप, कोथिंबीरीची पाने, व चिरलेला कांदा याची चित्रात दाखवल्याप्रमाणे सजावट करा. याचप्रमाणे मेथीची भजीही करतात.

Monday, August 10, 2009

पुरण



वाढणी : २ जण

जिन्नसः

हरबरा डाळ १ वाटी
गूळ पाऊण वाटी
साखर पाव वाटी

क्रमवार मार्गदर्शन : कूकरच्या एका भांड्यात हरबरा डाळ पाण्याने धूऊन घ्या. त्यात ३ वाट्या पाणी घालून कूकर मध्ये शिजवून घ्या. ही डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे कूकरला ४-५ शिट्ट्या कराव्यात म्हणजे डाळ एकजीव होते व चांगली शिजते. कूकर गार झाला की शिजलेली डाळ एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घ्या. चाळणीखाली राहील असे एखादे पातेले चाळणीखाली ठेवा म्हणजे डाळीमधले निथळलेले पाणी त्यात जमा होईल. हे पाणी तुम्ही कटाच्या आमटीकरता वापरू शकता. डाळीतले पाणी व्यवस्थित निथळून गेले की मग ही डाळ फूड प्रोसेसर/पुरणयंत्रात बारीक करून घ्या. आता मध्यम आचेवर कढई/पातेले ठेवा व त्यात बारीक केलेली डाळ, साखर-गूळ घालून शिजवत ठेवा. अधून मधून कालथ्याने ढवळत राहा म्हणजे पुरण करपणार नाही. आता हे मिश्रण पातळ होईल कारण साखर व गूळ विरघळेल. थोड्यावेळाने मिश्रण घट्ट होईल. मिश्रण घट्ट झाले व पूर्ण एका जागी जमा होऊ लागले की समजावे की पुरण झालेले आहे. आता गॅस बंद करा.

वर जे साखर गुळाचे प्रमाण दिले आहे ते तुम्ही आपापल्या आवडीनुसार घेऊ शकता.

अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी गूळ
१ वाटी साखर
१ वाटी गूळ,
पाऊण वाटी साखर व पाव वाटी गूळ
१ वाटी साखर व अगदी थोडा गूळ चवीकरता
१ वाटी गूळ व अगदी थोडी साखर चवीकरता

मी पुरणपोळीसाठी अर्धी वाटी साखर व अर्धी वाटी गूळ हे प्रमाण घेते १ वाटीच्या हरबरा डाळीसाठी. गुळाचा खमंगपणा व साखरेची गोडी अशी दुहेरी चव खूप छान लागते.

पुरणाची पोळी, दिंड, कडबू करतात. किंवा श्रावणात नैवेद्यासाठी करतात.