Wednesday, July 08, 2009
पुरी
जिन्नस :
कणीक २ वाट्या
चवीपुरते मीठ
तेल ६ चमचे
कोमट पाणी
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन : कणकेमध्ये चवीपुरते मीठ व तेल घालून कोमट पाण्याने घट्ट भिजवा व तेलाचा हात घेऊन थोडी मळा.
कणकेवर झाकण ठेवा. २० मिनिटे कणीक मूरू द्यावी. नंतर कढईत तेल घाला. तेल जरा जास्त घ्या म्हणजे साधारण अर्धी कढई होईल इतपत घ्या व मंद आचेवर कढई तापत ठेवा. पुऱ्या फुगायला तेल थोडे जास्त लागते. जास्त असलेल्या तेलात पुऱ्या तळल्या की त्या छान होतात. तेलाचा हात घेऊन मुरलेली कणीक चांगली मळून घ्या. एकसंध व नितळ दिसली पाहिजे. आता कणकेचा अर्धा भाग घ्या व त्याची जाड सुरनळी बनवा. नंतर त्याचे छोटे एकसारखे गोळे बनवून घ्या. नंतर परत अर्ध्या कणकेचे असेच छोटे गोळे बनवा. हे गोळे झाकून ठेवा.आता तापत ठेवलेल्या कढईची आच थोडी वाढवा. आणि पुऱ्या लाटायला घ्या. २ ते ३ पुऱ्या लाटून झाल्या की त्या आधी तळून घ्या. मग परत २-३ लाटा. लाटताना गरज पडली तर बोटाला थोडे तेल घेऊन पुरीच्या गोळ्याला लावा. पुरी लाटताना गोळा परत हाताच्या तळव्यावर ठेवून परत गोल गोल वळा व किंचित चपटा करा. पुरी सर्व बाजूने एकसारखी लाटा. पातळ लाटा, पण खूप पातळ नको.
तेल व्यवस्थित तापले आहे का नाही याची चाचणी करा म्हणजे कणकेचा एक छोटा कण तापलेल्या तेलात घाला. तो जर लगेच पटकन वर आला तर तेल पुरेसे तापले असे समजावे. तेल जर का पुरेसे तापले नसेल तर तो सोडलेला छोटा कणकेचा कण तसाच तळाशी बसतो. आता आच मध्यम करा. २ पुऱ्या लाटल्या की एकेक करून तळा. तेल तापल्यामुळे पुरी फुगून वर येईल व तेलात तरंगायला लागेल. मग पुरी उलटा व झाऱ्याने कढईच्या बाजूला पुरीला धरा म्हणजे तेल निथळेल. पटकन फुगली नाही तर झाऱ्यानेच पुरीवर थोडे थोडे कढईतले तेल घाला. पुरी लगेच फुगेल. पुरी ब्राऊन रंगावर तळून काढा म्हणजे ती कच्ची राहणार नाही. तळून झाली की टीप कागदावर पुऱ्या काढून ठेवाव्या म्हणजे तेल निथळून जाईल व पुऱ्या तेलकट होणार नाहीत.
काहींना कडक पुऱ्या आवडतात. कडक पुऱ्या करण्यासाठी आच मध्यम आचेपेक्षा थोडी कमी ठेवावी म्हणजे पुरी फुगणार नाही व ब्राऊन रंग यायला थोडा वेळ लागेल व पुरी तेलात जास्त वेळ राहिल्याने कडक होईल.
पुरी चांगली लागते याबरोबर : श्रीखंडपुरी, आमरसपुरी, खीरपुरी, पुरीभाजी (उकडून बटाट्याची)
पुरी सणासुदीला करतात, शिवाय लग्नकार्यात, व घरातल्या कोणत्याही शुभकार्यात करतात. आम्ही दोघी बहिणी लहानपणी फुगलेल्या पुरीला "टम्म" पुरी म्हणायचो. एकदा आईने थोड्या पुऱ्या साजुक तुपात तळल्या होत्या आणि आम्ही त्या आमरसाबरोबर खाल्या. खूपच छान लागल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment