Thursday, November 01, 2007

भाज्यांचे लोणचे






वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

गाजराच्या फोडी २ वाट्या
फ्लॉवरची फुले २ वाट्या
लाल/काळी मोहरी ५-६ चमचे, लाल तिखट २ चमचे
हळद २ चमचे, हिंग पावडर अर्धा चमचा
मेथीचे दाणे २५-३०, मीठ चवीपुरते,
लिंबू अर्धे
फोडणीकरता मोहरी,हिंग, हळद, व अर्धी वाटी तेल

क्रमवार मार्गदर्शन: आदल्या दिवशी संध्याकाळी गाजराच्या व फ्लॉवरच्या फोडी मीठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पाणी काढून रोवळीमधे भाज्या निथळत ठेवा. नंतर २ तासाने कॉटनवर सर्व चिरलेल्या भाज्या पसरून ठेवा म्हणजे सर्व पाणी शोषून घेतले जाईल. कढल्यात मोहरी व मेथीचे दाणे थोडे भाजून घ्या व ते मिक्सरमधून बारीक करून एका ताटलीत ठेवा. नंतर परत थोडे कढल्यात तेल घालून ते तापले की त्यामध्ये लाल तिखट, हळद, व हिंग पावडर घालून अगदी थोडे परतून ज्या ताटलीत मोहरीपावडर ठेवलेली आहे त्यात बाजुला घाला. हे मिश्रण गार झाले की मग त्यामधे कोरड्या झालेल्या भाज्या घालून त्यात चवीपुरते मीठ व लिंबू पिळून एकत्र कालवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे तेलात फोडणी करून ती एकदम गार झाली की तयार झालेल्या लोणच्यामधे ओता. त्याआधी तयार झालेले लोणचे काचेच्या बाटलीत भरून ठेवा.


या लोणच्यात मी फक्त गाजर व फ्लॉवर घेतले आहेत. बाकीच्या भाज्या पण घालायच्या आहेत. मटार, ओले हरबरे, ओली हळद, मुळा. ज्याप्रमाणे भाज्या आवडत असतील त्याप्रमाणे घ्याव्यात. हे लोणचे मी पहिल्यांदाच केले आहे त्यामुळे अंदाजाने लोणच्याचा मसाला घेतला आहे. अजून थोडा चालू शकेल असे वाटते.

माहितीचा स्रोत:सौ आई

अधिक टीपा:
हे लोणचे हिवाळ्यात जेव्हा भरपूर भाज्या असतात तेव्हा घालावे म्हणजे उन्हाळ्यात उपयोगी पडते.

No comments: