

जिन्नस :
छोटी वांगी १४ ते १६ नग
दाण्याचे कूट १ वाटी
ओल्या नारळाचा खव १ वाटी
लाल तिखट २ चमचे
धनेजिरे पूड २ चमचे
गरम मसाला/गोडा मसाला २ चमचे
मीठ चवीपुरते
गूळ पाव वाटी
तेल
मोहरी
हिंग
हळद
क्रमवार मार्गदर्शन : वांगी धूऊन व पुसून घ्या. नंतर त्यावर मधोमध एक चिर पाडा सारण भरण्यासाठी. वरील जिन्नस जे दिले आहेत ते सर्व एकत्र करा. नंतर हे सारण प्रत्येक वांग्याच्या चिरेमध्ये भरून घ्या. सारण दाबून भरा. जितके भरता येईल तितके भरा म्हणजे भाजी चांगली मिळून येते. अजून थोडे सारण उरले तर ते नंतर भाजी फोडणीला दिल्यावर घाला. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा.फोडणीमध्ये सारण भरलेली वांगी घाला.
तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त घाला म्हणजे भाजी चवीला जास्त छान होते. नंतर त्यावर झाकण ठेवा व आच थोडी कमी करा. काही सेकंदानी झाकण काढून वांगी उलट सुलट करा. म्हणजे सर्व बाजूने शिजतील. आता थोडे पाणी घालून परत एकदा झाकण ठेवा. व काही सेकंदानी झाकण काढून परत भाजी ढवळा व पाणी आटले असेल तर परत थोडे पाणी घाला. वांगी शिजेपर्यंत थोडे थोडे पाणी घालून व झाकण ठेवून शिजवा. वांगी चांगली शिजली पाहिजेत. आता गॅस बंद करा.
पोळी भाकरी बरोबर भरली वांगी छान लागतात. शिवाय गरम भाताबरोबर पण मस्त लागतात. सोबत लसणीची चटणी असल्यास उत्तम.