Tuesday, November 03, 2009

रवा-बेसन लाडू





रवा बेसन लाडू ही माझी पाककृती मनोगत दिवाळी अंक २००९ मध्ये प्रकाशित झाली आहे.


जिन्नस :
रवा १ वाटी
हरबरा डाळीचे पीठ अर्धी वाटी
साखर १ वाटी
साजूक तूप (रवा व बेसन भाजण्यापुरते)
बेदाणे

मार्गदर्शन :


मध्यम आंचेवर कढई/पातेले तापत ठेवा व त्यात रवा व ८-१० चमचे साजूक तूप घालून व्यवस्थित भाजून घ्या. रव्याचा खमंग वास आला की भाजलेला रवा एका ताटलीमध्ये काढून घ्या. त्याच कढई/पातेल्यात हरबरा डाळीचे पीठ व ८-१० चमचे तूप घालून भाजून घ्या. यावेळी गॅस मध्यम आंचेपेक्षा थोडा कमी ठेवावा. डाळीच्या पिठाचा रंग थोडा बदलेल व खमंग वासही येईल. आता हे भाजलेले डाळीचे पीठ एका ताटलीमध्ये काढा. भाजलेला रवा व डाळीचे पीठ एकत्र करून हाताने नीट एकजीव कालवून घ्या.


आता मध्यम आंचेवर एक पातेले ठेवा व त्यात एक वाटी साखर घाला. साखर पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी घाला व चमच्याने ढवळायला सुरवात करा. काही वेळाने साखर व पाणी उकळून बुडबुडे यायला लागतील व काही सेकंदातच एक तारी पाक होईल. गॅस बंद करा. आता या पाकात भाजलेला रवा व डाळीचे पीठ घाला. कालथ्याने व्यवस्थित ढवळा. कोमट असताना लाडू वळा. लाडू वळताना त्यात एका लाडवाला एक बेदाणा घ्या. मिश्रण जर कोरडे वाटले तर त्यात थोडे साजुक तूप घाला.

2 comments:

Unknown said...

Pudhali Pakru (upkrameey) dhammak ladu ani besan ladu havi.

Anonymous said...

hi mam, your all recipies are very nice.i was take some prints from this reciepies.thank you so much..