Saturday, February 27, 2010
गवार बटाटा
जिन्नसः
गवारीच्या शेंगांचे तुकडे ३-४ वाट्या
१ बटाटा (फोडी करून)
लाल तिखट १ चमचा
धनेजिरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
मीठ
गूळ ५-६ चमचे
दाण्याचे कूट मूठभर
ओल्या नारळाचा खव ४-५ चमचे
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
क्रमवार मार्गदर्शन : कूकरमध्ये गवारीच्या शेंगांचे तुकडे शिजवून घ्यावे. शिजवताना त्यात थोडे पाणी घालावे. कूकर गार झाला की शिजलेल्या गवारीच्या शेंगा बाहेर काढा. त्यातले पाणी एका वाटीत काढून ठेवा. गॅसवर कढई मध्यम आचेवर तापत ठेवा. ती तापली की जरूरीपुरते तेल घालून ते तापवा व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात शिजलेल्या गवारीचे तुकडे, बटाट्याच्या फोडी, लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व गूळ घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व खवलेला ओला नारळ घाला. शिजलेल्या गवारीच्या शेंगेतले पाणी काढलेले आहे ते त्यात घाला. जरूर वाटल्यास अजूनही थोडे पाणी घालून भाजी थोडी उकळू दे. जास्त पाणी नको. ही भाजी थोडी ओलसर असावी. आवडत असल्यास थोडासा रस ठेवायला हरकत नाही. गवार ही चवीला खूप उग्र असते त्यामुळे त्याला गूळही बराच घालावा लागतो. तिखट गूळ व बाकीचा मसाला थोडा जास्तच घालावा लागतो तरच ही भाजी चविष्ट लागते.या भाजीत बटाट्यासारखे लाल भोपळ्याचे तुकडेही छान लागतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
गवारीची भाजी खाणं एक त्रासदायक अनुभव आहे. पण ही पाककृती चांगली दिसतेय. मी नक्कीच करून बघेन.
http://kandarkar.blogspot.com
तुम्ही ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. गवारीच्या शेंगा जून असतील तर त्या चांगल्या लागत नाहीत, शिवाय शेंगा निवडताना त्याची केसतुटे पूर्ण काढावी लागतात नाहीतर खाताना दातात येतात. ही भाजी चवीला उग्र असल्याने त्यात गूळ पुरेसा घातला की चव छान येते आणि बटाटा किंवा लाल भोपळा घातला तर दाटपणाही येतो. अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद!
Post a Comment