Saturday, July 03, 2010

गुलाबजाम

गुलाबजाम माझ्या स्वप्नात आला असे कधीच झाले नाही आणि होणारही नाही कारण की तो माझ्या अजिबातच आवडीचा नाही. आणि असेही गुलाबजाम हा काय स्वप्नात येण्यासारखा पदार्थ आहे का!? स्वप्नात येणारे पदार्थ म्हणजे आमरस, पुरणपोळी, श्रीखंडपुरी!! सासरीमाहेरी पण वरचेवर गुलाबजाम कधीच कुणी केले नाहीत.
मध्यंतरी डॉ कपूर यांच्याकडे एका मित्राला भेटण्यासाठी म्हणून जाण्याचा योग आला. तिथे त्यांनी बनवलेले गुलाबजाम खाल्ले आणि ते मला खूपच आवडून गेले. ५-६ गुलाबजाम आवडीने खाल्ले. माझ्या खाण्यात जर दुसऱ्याने बनवलेला पदार्थ आला आणि जर का तो मला खूपच आवडला तर मी लगेचच त्याची कृती विचारून घेते. डॉ कपूरांनी मला सविस्तर कृती सांगितली आणि मी पण त्यातल्या खाचाखोचा विचारून घेतल्या. गुलाबजाम बनवण्याकरता जे जिन्नस त्यांनी सांगितले होते ते आणले व आत्मविश्वासाने करायला घेतले. त्यांनी जे प्रमाण सांगितले होते त्याच्या अर्धे प्रमाण घेतले. पाकाबद्दल खात्री होतीच. सांगितलेले जिन्नस एकत्र करून गुलाबजामचे गोळे बनवले. मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात तेलही घातले. गुलाबजाम तळताना मंद आचेवर सावकाशीने तळावेत असे सांगितले होते म्हणून मी मुद्दाम जाड तळ असलेली कढई घेतली म्हणजे तेलही पटकन तापत नाही. तेल तापले आहे का नाही ते बघायला बनवलेल्या पिठाचा छोटा कण घातला तो हळूहळू करत तेलाच्या वर आला. आता हे अगदी बरोबर तापमान आहे. सावकाशपणे छान गुलाबजाम तळले जातील म्हणून तीन चार तेलामध्ये घातले. थोड्यावेळाने उलटले पाहते तो काय! कमी कमी होत जाऊन पार विरघळून गेले! अरेच्या हे कसे काय झाले? बहुतेक तेल नीट तापले नसावे म्हणून असे झाले असेल म्हणून अजून २-३ घातले तरी असेच परत. कढई दुसरीकडे ठेवून पटकन नेहमीची पटकन तापणारी पातळ तळ असणारी कढई ठेवली. यावेळी तेल थोडे जास्त घातले कारण गुलाबजाम तळायला थोडा वाव कमी पडला असेल आधी म्हणून असे झाले असेल असे वाटले. यावेळी मोजून दोनच गुलाबजाम तेलात सोडले. यावेळी तर घातल्या घातल्या पटकन विरघळले. होत्याचे नव्हते झाले! पूर्ण मूड ऑफ झाला. गॅस बंद केला. इतके सगळे व्यवस्थित अर्थात अंदाजानुसार निम्मे केलेले जिन्नस घेतले तरी हे असे व्हावे! एका कढईच्या तळाशी काळपट थर तर दुसऱ्या कढईच्या तळाशी काळपट चॉकलेटी थर! सर्व काही फेकून देण्याच्या लायकीचे झाले होते.


दुसऱ्या दिवशी आईशी फोनवर बोलताना सांगितले की मी एका पद्धतीने गुलाबजाम करून बघितले पण सर्व विरघळले. तू सांग ना मला गुलाबजामची कृती. रवामैद्याचे होतात का गं गुलाबजाम? आईने सांगितले की गुलाबजामाला खवा लागतो. खव्यात थोडा मैदा घालून तो दुधात भिजवायचा. पण इथे खवा नाही ना मिळत! खव्यावरून मला रिकोटा चीझची आठवण झाली. मी खव्याला पर्याय म्हणून रिकोटा चीझ वापरते व माझ्या पद्धतीने तशा काही पाककृतीही केल्या आहेत. नाहीतरी मला गुलाबजामचा प्रयोग करायचा होताच.


सकाळी फोन झाल्यावर जेवणानंतर शांत चित्ताने आईने सांगितलेल्या कृतीनुसार सुरवात केली. रिकोटा चीझ मैदा व दूध एकत्र केले. खरं तर दूध खूप काही घातले नाही कारण रिकोटा चीझ ओलसर असते त्यात आईने सांगितलेल्या प्रमाणानुसारच मैदा घातला व अगदी थोडे दूध घातले. एकत्र केल्यावर पीठ बरेच सैलसर वाटले म्हणून अजून थोडा मैदा घातला कारण की गुलाबजामचे गोळे व्यवस्थित बनायला पाहिजेत. आदल्यादिवशीचा विरघळण्याचा अनुभव होता. मला वाटले की पीठ वळण्या इतपत तरी घट्ट झाले पाहिजे. पाक केला. मध्यम आच ठेवून कढई व त्यात तेल घालून गोल वळलेले गुलाबजामही घातले. विरघळणे तर सोडाच पण जरासुद्धा इकडचे तिकडे हालले नाहीत. मला खूप आनंद झाला. चॉकलेटी रंगाचे गुलाबजाम खूप छान दिसत होते. पाकातही सोडले. डावेने ढवळले. थोडे मुरू देत मग चव घेऊ! थोड्यावेळाने बघितले तर पाक गरमच होता. विचार केला की चव बघायला काय हरकत आहे. पाक गुलाबजाम मध्ये शिरत आहे का नाही हे तरी कळेल. वाटीत घालून चमचा गुलाबजाम मध्ये घातला तर थोडा कडक लागला. खाल्ला तर पाक अजिबातच आत शिरला नव्हता. गरम पाकातच गुलाबजाम आणि तेही गरम असतानाच घालायचे असे सांगितल्यासारखेच केले तरीही पाक गुलाबजाम मध्ये शिरत नाही म्हणजे कमाल झाली! बहुतेक हे सर्व प्रकरण बिघडले आहे याचा अंदाज आलाच. पाक गार झाल्यावर चव घेतली तर पहिल्यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती. खूप चिवट व कडक झाले होते. बाहेरून पाक होता तितकेच गोड.


आता कधीही या गुलाबजामच्या फंदात पडायचे नाही असे ठरवले पण चैन कुठे पडते! काही दिवसांनी परत एकदा गुलाबजामच्या जय्यत तयारीत. यावेळी पूर्णपणे माझा अंदाज वापरला. मूळ पाककृतीमधला एक जिन्नस बदलून दुसरा घेतला. बटर व दूधही थोडे कमीच घेतले. यावेळी मात्र एकदम छान!! अजूनही एक दोन प्रयोग केले की "खूपच "छान या सदरात मोडतील. त्यादिवशीचे गुलाबजाम किती छान झालेत ना! असे म्हणून एकेक करत लगेचच संपले. मूळ पाककृतीनुसारही एक दोन वेळा बनवणार आहे. किंचित सोडा घालतात असे ऐकीवात आहे. माझ्या अंदाजानुसार बनवले त्यात सोडा घातला नव्हता. तसेही मूळ कृतीमध्येही सोडा सांगितलेला नाही. दूध व बटरही अंदाजाने घेतले आहे त्यामुळे नेमके प्रमाण पाककृती लिहीन तेव्हाच. मूळ पाककृतीमध्ये दुधाची पावडर, बिस्व्किक, बटर व दूध सांगितले आहे. गुलाबजाम जमल्याचा आनंद आहे. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून ही पाककृती तर अगदी उत्तम आहे याबद्दल वाद नाही!!

2 comments:

Shravani said...

paathav tujhi gulabjam chi recipe mag..mi hi karun baghen...

Unknown said...

रोहिणी ताई.. अगं अगदी सेम अनुभव माझ्याही गाठीशी आहे.. मला गुलाबजाम खूप आवडतात. म्हणून मी स्वतःलाच करता यायला पाहिजे म्हणून करायचे मनात ठरवले. माझी एक मामी खूपच सुगरण आहे. तिच्याकडे एकदा गुलाबजाम खाण्याचा योग आला. तिने अतिशय सुरेख केले होते गु.जा(तिनेच टोपण नावही सांगितले मला). मी तिच्याकडून नीट रेसिपी विचारून घेतली आणि आईला सांगून एकदा गु.जा चा पहिला प्रयोग केला. पार सपशेल तो आपटला. गुलाबजाम नीट तळल्या गेले, पाकात सोडले पण दुसऱ्या दिवशी भांडे पाहिले तर सगळेच्या सगळे गु.जा पाकात विरघळून गेले होते. ते गोड मिश्रण झाले होते. मी आणि बाबांनी त्याला हिरमुसून आपलेसे केले. मग आणखीच जिद्दीने पेटून मामीकडून अक्षरशः बारकाव्यासहित कृती लिहून आणली. तीत रवा मैदा होता. अगदी तुझीच हिस्टरी इथेही रिपीट. पण तीही फसली. मग आईचे ऐकून खवा वगैरे विकत आणून गु.जा बनवले. पण त्यात पाक घुसेना.. सगळे रागावले. आता पुन्हा प्रयोग नाही म्हणून ठरवून टाकले. आता लग्न-नंतर परत तो प्रयोग करून पाहावा म्हणून मनात आले. मग बाजारातून गिट्स चे पाकीट आणून एक प्रयोग केला. तो जमला कि नाही सांगत येणार नाही. कारण गुलाबजामांनी इतका पाक पिला कि गुलाबजाम बसल्या जागी झोपून गेले होते ! नवरा पोट धरून हसला. पण आता तर हद्दच झाली. आता ठरवले आहे. गुलाबजाम मी आता कधीच करून पाहणार नाही. मला यश आले नाही. पण तुझी हि पोस्ट वाचून निदान तुला तरी यश आले, यातच मला समाधान वाटते आहे.

- सौ. अवनी