Monday, October 04, 2010

बटाटा भाजी



जिन्नस :

बटाटे ३-४
पाऊण कांदा
३-४ मिरच्या
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धनेजिरे पावडर
मीठ
साखर
तेल
मोहरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)

क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. गार झाले की त्याची साले काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. कांदाही मध्यम आकाराच्या फोडी करून चिरा. मिरच्यांचे तुकडे करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा घाला. परतून घ्या. त्यावर झाकण ठेवा. नंतर काही सेकंदाने झाकण काढा व परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. कांदा कच्चा राहता कामा नये. कांदा शिजला का नाही हे पाहण्यासाठी कालथ्याने शिजलेल्या कांद्यावर थोडे टोचून पहा. कांदा कालथ्याने तुटला की तो शिजला असे समजावे. नंतर त्यात चिरलेले बटाटे घाला व परतून घ्या. ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घाला. थोडी साखर घाला. नंतर परत हे सर्व मिश्रण नीट सर्व बाजूने ढवळा. आता परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत थोडे परता. असे दोन तीन वेळा करा. गॅस बंद करा. भाजीवर झाकण ठेवा. वाफेवर ही भाजी चांगली शिजली की चविष्ट लागते.

या भाजीत कांदा जास्त घालावा म्हणजे डोशाबरोबर बटाट्याची भाजी देतात तशी लागते. वाढताना त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर व ताजा खवलेला नारळ घाला. या भाजीत कडीपत्त्ता घातल्यास जास्त चांगली चव येते. कडीपत्ता फोडणीत घालावा.

2 comments:

Unknown said...

ही भाजी करताना आम्ही फोडणीत मोहरीनंतर उडिद डाळ पण घालतो. किंबहुना सर्वच फोडणीत उडिद डाळ
घालतो. म्हणून उडिद डाळ मसाल्याच्या डब्यात एका
वाटीत असतेच असते. असो.

पाकृ लिहिलेत ते चांगले केलेत. बटाट्याची भाजी आणि फोडणीचे पोहे सुद्धा भीषण बनविणारी मंडळी पाहिलेली आहेत.

rohini gore said...

dhanyawaad mrudula! navoditansthi hi bhaji lihili jast karun.