Friday, June 24, 2011

पापड, पापड्या व इतर उन्हाळी पदार्थ

उन्हाळा सुरू होण्याच्या आत आईची तयारी सुरू व्हायची ती म्हणजे प्लॅस्टिकचे जाड कागद स्वच्छ करून ते वाळवून ठेवणे, सुती कापड धुऊन वाळवणे व आम्हालाही सांगायची मोठमोठाले दगड साठवून ठेवा. दगड अशाकरता की वाळवणे प्लॅस्टिक कागदावर घातली की चार सहा बाजूने वजन म्हणून दगड ठेवायचे. आम्ही राखणदाराचे काम अगदी व्यवस्थित पार पाडायचो. आमच्याकडे इतर भावंडांचाही अड्डा असायचा. सर्वांनाच उन्हाळी पदार्थ कच्चे खाण्याची आवड! वर्षभर पुरतील इतकी वाळवणे घरात व्हायची. पोह्याचे पापड, उडदाचे पापड, बटाट्याचे पापड, कुरडया, फेण्या, बटाट्याचा चिवडा, साबुदाण्याच्या चिकवड्या. सकाळी उजाडल्यापासून सूर्य मावळेपर्यंत ही कामे चालायची. आई पहाटे उठून सर्वांचा स्वयंपाक करून ठेवायची.





सर्वांत आधी अंगण स्वच्छ झाडून सडा घालून घ्यायचा. नंतर अंगणात एक दोन पलंग ठेवायचे. दोन आडवे लोखंडी स्टँड एकमेकांसमोर काही अंतरावर ठेवून त्यावर ३-४ सपाट मोठमोठाली फळकुटे जोडून ठेवून त्यावर सुती कापड व नंतर प्लॅस्टिकचा जाड कागद घालायचो. शिवाय खाली अंगणात वेगळी सतरंजी अंथरून त्यांवरही सुती कापड व नंतर प्लॅस्टिकचा कागद घायालचो. आम्ही भावंडे आळीपाळीने पायऱ्यांवर राखणदार म्हणून बसायचो. डोक्यावर पंचा गुंडाळलेला असायचा कारण की ऊन म्हणजे अगदी तळपते असायचे. काही जण पापड लाटायला, काही जण राखण करायला असे आलटून पालटून. काही जण सर्वांना चहाची तलफ आली की चहा करून द्यायला सज्ज असायचे.





पापडांमध्ये आम्हाला जास्त रस पोह्यांच्या पापडात असायचा. पोह्यांचा पापड अर्धवट लाटून त्यावर तेल घालून घडी करून परत थोडा लाटायचा आणि मग तो तेलात बुडवून खायचा. असा पापड खायला खूपच छान लागतो! नुसती लाटी खाण्यापेक्षा असा पापड खूप मस्त लागतो. पापड करण्यासाठी जे डांगर लागते त्याला खूप म्हणजे खूप कुटावे लागते. आईकडे खूप जड असे दोन खलबत्ते होते. जाड तरट ठेवून मग त्यावर खल ठेवायचा आणि दणादणा घाव घालायचो आम्ही आळीपाळीने त्या डांगरावर. बत्ता तर इतका काही जड होता की तो हातात धरून कुटले ही तळहात लाल व्हायचे! पोह्याच्या व बटाट्याच्या पापडाला खूप कुटावे लागते. कुटून डांगर हलके होते व पापड वाळून तळायला घेतला की हलकाफुलका होतो आणि छान फुलतो. बटाट्याच्या पापडाला साजुक तूप लागते. पोह्याच्या डांगराचे कोरडे पीठ, बटाट्याच्या डांगराला घालण्यासाठी साबुदाण्याचे पीठ अशी पिठे आई आधीच तयार करून ठेवायची. बरेच पापड लाटून झाले की मध्ये थोडासा ब्रेक असायचा. गरम गरम चहा प्यायल्यावर लाटण्यासाठी किंवा राखणदारीसाठी ताजेतवाने व्हायचो. पापड होत आले की डांगर कुटले जायचे ते खास खाण्यासाठी. गोळेच्या गोळे डांगर खायचो. तिखट तिखट डांगर खाल्ल्यावर खूप उत्साह आणि ताकद यायची. पापड पण सर्व मोजायचे. ४००/५०० पापड होत असत. आम्ही आतेमामे भावंड असायचोच शिवाय आईच्या मैत्रिणीही पापड लाटण्यासाठी यायच्या. आम्ही पण आईच्या मैत्रिणींच्या घरी मदत म्हणून पापड लाटायला जायचो. आम्ही सगळ्या मुली व मुले पापड लाटण्यासाठी म्हणून कमी तर खाण्यासाठी म्हणून जास्त असायचो.





उडदाच्या डांगराला खूप मागणी नसायची. आम्हाला कोणालाही उडदाचे डांगर जास्त आवडायचे नाही. आम्हाला सर्वांना पोह्याचे व बटाट्याचे डांगर जास्त आवडायचे. पापड वाळत घातले की कडक उन्हामुळे ते वेडेवाकडे होत असत. असे वेडेवाकडे झालेले पापड मग मोठ्या परातीत , पातेल्यात काढून ठेवायचो. त्यालाही ऊन असायचे. हे वेडेवाकडे झालेले पापड ताज्या पापडांना वाळण्यासाठी जागा करून द्यायचे. पापड पूर्णपणे कडक उन्हात वाळवून झाले की मग ते मोठमोठ्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवले जात. या पत्र्याच्या डब्यांनाही ऊन दाखवले जाई. बाहेरून कधी रंगकाम केले जाई डबे जास्त टिकण्यासाठी. उन्हाळा संपून रपारप पाऊस सुरू झाला की मग पोह्याचे पापड तळून गरम आमटी भाताबरोबर खायचो. मोठ्या कढईत पापड पूर्णपणे भरून जायचा इतका तो फुलायचा. हे पापड वर्षभरात खूप कामाला येत असत. कधी भूक लागली की भाजून किंवा तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खायचो.





कुरडया करण्यामध्ये आमची लुडबुड नसायची. कारण कुरडईचा चीक आईच करायची व सोऱ्यातून कुरडयाही तीच पाडायची. काही वेळा मोठ्या बहिणी आईला कुरडया पाडायला मदत करायच्या. गरम चिकाच्या कुरडया पटापट घातल्या जात. कुरडई करण्याच्या दिवशी आई चीक करते कधी आणि आम्ही तो खातो कधी इतकी त्या चिकाची आम्ही वाट पाहायचो. गरम गरम चीक मोठ्या वाडग्यात घेऊन त्यात गोडंतेल घालून मस्त लागतो! नंतर दिवसभर राखण. कुरडया वाळत घातल्या की काही वेळाने काही बऱ्याच वाळलेल्या कुरडया उलट्या करून ठेवायचो. वाळलेल्या कुरडया तळून कुरुम कुरुम आवाज करत भाजक्या शेंगदाण्याबरोबर मस्त लागतात. कुरडया घालून झाल्या की काही भावंडे सर्वात तळाशी उरललेला चीक खात असत. तळाशी उरलेल्या चिकाची वाळलेली खरपुडी काहींना आवडायची.




बटाट्याचा वाळलेला कीस म्हणजे १० ते १५ किलो बटाट्यांचा असे. बटाटे खूप मोठाले! आम्ही आईला सर्व बटाटे सोलून द्यायचो. बटाटे सोलून सोलून हात दुखायला लागायचे. वर्षभरातले जितके म्हणून उपवास येतील त्यावेळेला आई आदल्या दिवशी डबे भरून वाळलेल्या किसाचा चिवडा करून ठेवायची. कच्चा वाळलेला कीस यांच्या जाळ्या कढईत तळल्या जायच्या. मोठी परातभर तळलेल्या जाळ्या. त्यावर तळलेले शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, साखर, जिऱ्याची पूड घालून त्या जाळ्या मोडल्या जाऊन बारीक झालेला चिवडा खूप मस्त लागायचा! एकदम चविष्ट, हलकाफुलका सहज चावता येईल असा.





साबुदाण्याच्या चिकवड्या घालण्यासाठी साबुदाणा मोठमोठ्या पातेल्यात शिजवला जाई. साबुदाण्याच्या चिकवड्या मात्र आम्ही सगळ्या बहिणी मिळून घालायचो. आईला अजिबात हात लावून द्यायचो नाही. आई प्रत्येकीला एका वाडग्यात शिजवलेले साबुदाण्याचे मिश्रण घालून द्यायची. मग आम्ही मोठ्या चमच्याने छोट्या गोल चिकवड्या घालायचो. खूप मोठ्या प्लॅस्टिकच्या कागदावर गोल चिकवड्यांची नक्षी तयार व्हायची. चिकवड्या पूर्णपणे वाळून झाल्या की अलगद हाताने सोडवायच्या. सोडवलेल्या चिकवड्या मग मोठमोठ्या परातीत, पातेल्यात परत कडक उन्हात पूर्णपणे वाळू द्यायच्या. उपवासाला मग फुललेला बटाट्याचा पापड, चिवडा व साबुदाण्याची चिकवडी. सोबत भाजलेले शेंगदाणे!




फेण्या उर्फ तांदुळाची पापडी उर्फ सोलपापडी ही सर्वात आमच्या सर्वांच्याच आवडीची . याला तर भरपूर तयारी. मिक्सर यायच्या आधी या पापड्यांना लागणारे तांदुळाचे पीठ आई जात्यावर दळायची. ३ दिवस तांदूळ भिजत घालून नंतर ते दळायला घ्यायचे. जात्याखाली पांढरे शुभ्र मऊसर सुती कापड. जात्यातून पांढरे शुभ्र पीठ बाहेर पडायचे. जात्यात आधी थोडे तांदूळ मग थोडे पाणी, परत थोडे तांदूळ परत थोडे पाणी असे करत करत दळून झाल्यावर पांढरे शुभ्र पीठ तयार व्हायचे. या पिठात थोडे पाणी, खसखस, मीठ घालून ते पापड्यांसाठी तयार व्हायचे. आम्ही त्याला पांढरीशुभ्र बासुंदी म्हणायचो. एकावेळी ६ पापड्या तयार होत. एका पाटावर ६ पत्र्यांवर या तांदुळाच्या पापड्या पसरवायच्या. या पसरवण्याच्या क्रियेला पापड्या लिहिणे असे म्हणतात. त्यावेळी लाकडी पाट होते. एक पाट उलटा करून त्यावर ६ पत्रे तयार असत शिजण्यासाठी. आधीचे शिजलेले पत्रे बाहेर काढून थोडी वाफ जाऊ द्यायची मग ते सुती कापडावर पालथे पाडायचे. त्याच वेळी पिठाने पसरवलेले ६ गोल पत्रे शिजवण्यासाठी पातेल्यात जायचे. पापड्यांना शिजवण्यासाठी व सोलण्यासाठी पाणी खूप लागते. संबंध दिवस स्टोव्ह चालू असायचा. पापड्या सोलणासाठी आमची खूप घाई! पापड्या सोलल्या की त्या सुपावर घालायच्या मग ते सूप घेऊन अंगणात यायचे व एकेक पापडी प्लॅस्टिकच्या कागदावर वाळत घालायचो. सुपावरच्या पापड्या मोजायच्या. त्या आम्ही कमी मोजायचो म्हणजे मग खायला मोकळीक! सोलताना पापडी तुटली की ती खायची हा नियम. या पापड्या पण वाळल्या की वेड्यावाकड्या व्हायच्या. पापड्या वाळवण्याचा कोटा पूर्ण झाला की मग नुसत्या खायच्या! एकेकाची टर्न खाण्यासाठी. एका वेळेला एकेकाने १२ ओल्या पापड्या खायच्या. मग दुसऱ्याची टर्न. ओल्या पापड्या खायला मर्यादा नाहीत. भरपूर खा! आई म्हणायची खा भरपूर मग करपट ढेकरा सुरू झाल्या की कळेल! बाबा तर आमच्या या खाण्याला म्हणायचे किती खाताय! अशाने पोटे दुखतील तुमची. पण आमचे कोणाचेही पोट दुखायचे नाही की खाल्लेले बाधायचे नाही. या ओल्या पापड्यांबरोबर खाण्याकरता सायीचे आंबट दही तयार असे! ओली पापडी घ्यायची त्यात सायीचे आंबट दही घालायचे. पापडीची चौकोनी घडी घालून पापडी तोंडात!




कोण म्हणते अमेरिकेत ऊन नाही! भरपूर रणरणते ऊन आहे इथे! या उन्हाचा फायदा घेण्याचा विचार येत आहे. भारतात असताना काही सोपे पदार्थ करायचे जसे की बटाट्याचा चिवडा, बटाट्याचे पापड, उडदाचे पापड, चिकवड्या. पण तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच नाही! आता सर्व एकेक करायचा विचार आहे. फेण्या झाल्या, बटाट्याचा कीस वाळवून झाला. पण प्रमाण किती तर एक वाटी तांदूळ, २ बटाटे. या प्रमाणाकडे पाहिल्यावर हसू येते! इतके छोटे प्रमाण घेऊनही खूप दमायला होते. पूर्वीच्या बायका म्हणजे आपल्या सर्वांच्याच आया, मावश्या, आज्या कसे काय एवढे पदार्थ करायच्या आणि तेही भरपूर प्रमाणात!

5 comments:

Anonymous said...

Rohini Tai, agdi kharaye! Kasa kaay jamaycha tyaana evdhya mothya pramannat karayla hyacha kautuk va ashcharya vatta.

Tumhi kitti sundar varnaan karun lihita ho! Khup avadla hey saara vachayla.

Nisha said...

mast !! aamchyakade pan udadache papad aani sabudanyachya chotya fenya karaychi aai :) tya saglya valvananchi aathwan zali rohinitai ha lekh vachun :)

rohini gore said...

Thanks Nisha, mast vatate na ase purviche kahi aathvale tar.

Anonymous said...

lahanpanchya smruti jagya kelya baddal dhanyawad !!!

Vivek Kelkar

rohini gore said...

ha lekh aavdalyabaddal anek dhanyawaad !!