
जिन्नस :
वऱ्याचे तांदुळ अर्धी वाटी
चिरलेला गूळ पाऊण वाटी
साखर २-३ चमचे
साजूक तूप २-३ चमचे
पाणी पावणे दोन वाट्या
खवलेला ओला नारळ अर्धी वाटी
क्रमवार मार्गदर्शन : वऱ्याचे तांदुळ पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. पाणी निथळून गेले की मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात साजूक तूप घालून धुतलेले वऱ्याचे तांदुळ घाला व भाजा. रवा भाजतो त्याप्रमाणे भाजा ब्राऊन रंग येईपर्यंत. त्याच वेळेला एका पातेल्यात पाणी घ्या व त्यात चिरलेला गूळ व साखर घाला व ते पातेले गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. रवा भाजून होईपर्यंत पाण्याला उकळी येईल. नंतर भाजलेल्या वऱ्याच्या तांदुळात गूळ व साखर घालून उकळलेले पाणी घाला व ढवळा. आता हे सर्व मिश्रण उकळायला लागेल आणि वऱ्याचे तांदुळ शिजायला लागतील. एकीकडे ढवळत रहा. नंतर आच कमी करून त्यावर झाकण ठेवा व वाफ द्या. झाकण काढून परत थोडे ढवळा. अशा ४-५ वाफा येऊ द्यात म्हणजे वऱ्याचे तांदुळ चांगले शिजतील व त्याचा गोळा बनायला लागेल. वऱ्याचे तांदुळ व्यवस्थित शिजायला हवेत. नीट शिजले नाहीत तर थोडे पाणी घालून अजून थोडी वाफ द्या. एकत्र झालेला गोळा तूप लावलेल्या एका ताटलीत पसरवून एकसारखा थापून घ्या. थोड्यावेळाने जाडसर वड्या पाडा. त्यावर खवलेला नारळ सर्व वड्यांवर घाला. खांडवी खाताना त्यावर साजूक तूप घेऊन खा. ही खांडवी पूर्ण साखर घालून पण करता येते किंवा निम्मे साखर व निम्मे गूळ घालून पण करता येते. कमी गोड हवी असल्यास गूळ अर्धा वाटी घ्या.
ही खास उपवासाची खांडवी आहे. याप्रमाणे तांदुळाच्या रव्याची पण खांडवी करतात. वऱ्याचे तांदुळ भाजल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतल्यास खांडवी अजून जास्त चांगली होईल असे वाटते. अर्ध्या वाटी वऱ्याच्या तांदुळाच्या १२ ते १५ वड्या होतात.
2 comments:
Rohinitai, masta. ata mi hi khandvi karoon baghen. mala tandulachich khandvi bhannat avadte. hi kadhich keli nahi. ata nakki karun tula sangte kashi zali te.-savita
savita, nakki karun bagh. mi pan pahilyandach keli. purvi aai mahashivratri aani aashadi ekadashi la karaychi 2-3 mothi tate bharun. aani aamhi yetajata khaycho. chhan lagte. Thanks Savita, tu suru kelelya blog che naav mala khuupach aavadale!!
Post a Comment