Wednesday, June 20, 2012

बटाटा पापड
जिन्नस :
१ मोठा बटाटा
लाल तिखट १ चमचा
जिरे पूड अर्धा- पाव चमचा
मीठ चवीपुरते
साबुदाणा पीठ ३-४ चमचे
पापड लाटण्यासाठी साबुदाणा पीठ वेगळे घ्या.मार्गदर्शन : बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. कूकरमधून शिजलेला बटाटा एका रोळीमध्ये काढून ठेवा म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटा गार झाला की त्याचे साल काढून किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, साबुदाणा पीठ व मीठ घालून हे मिश्रण हातानेच खूप एकजीव करा. नंतर साजूक तूपाचा हात घेऊन हे मिश्रण मळा. नंतर हे मिश्रण खूप कुटा. पीठ एकदम नितळ झाले पाहिजे. लोखंडी खलबत्यात हे मिश्रण खूप छान कुटले जाते. खलबत्ता नसेल तर एका पसरट पातेल्यात पीठ ठेवून त्यावर वाटीने आपटा. वाटी कलती करून हे मिश्रण वाटीनेच कूटा. वाटीच्या कडा या पीठावर पडल्या पाहिजेत. नंतर पोलपाटावर साबुदाण्याचे पीठ घ्या. कुटलेले बटाट्याच्या पीठाला डांगर म्हणतात. या डांगराचे छोटे गोळे करून एका गोळीचा एक पापड असे पापड लाटा. पापड लाटताना पीठाचा वापर जास्त करा. खूप पातळ पापड लाटून झाले की एका प्लॅस्टीकच्या कागदावर हे पापड उन्हात चांगले कडक वाळवा व नंतर एका डब्यात ठेवा. डब्याचे झाकण पूर्णपणे बंद होईल याची काळजी घ्या. नाहीतर हवा लागून हे पापड लापट होतील. उपवासाचा हे पापड चालतात. नंतर हे पापड तळून खा. पापड हलकाफुलका झाला पाहिजे. डांगर एकजीव एकसंध झाले आणि पापड पातळ लाटला गेला की पापड खूप छान होतात. पापड तळले की फुलतात आणि हलकेफुलके होतात. हे पापड चवीला खूप छान लागतात. डांगरही खूप छान लागते. १ मोठ्या बटाट्यामध्ये साधारण लहान २० ते २५ पापड होतात.

हे पापड भाजूनही छान लागतात. भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडासोबत भाजके शेंगदाणे आवडत असल्यास घ्यावेत.

No comments: