वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी साबुदाणा
मूठभर दाण्याचे कूट
१ साल न काढलेला कच्चा बटाटा (मध्यम आकाराचा)
१ चमचा लाल तिखट
अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ
शिंगाड्याचे पीठ ३-४ चमचे, तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे. नंतर त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घालणे. तिखट, मीठ, साखर, दाण्याचे कूट व शिंगाड्याचे पीठ घालून हे मिश्रण एकसारखे करून घेणे. या मिश्रणाची लहान लहान भजी मध्यम आचेवर तेलामध्ये तांबुस रंगावर तळणे. ही भजी ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला छान लागतात. ओल्या नारळाच्या चटणीमध्ये दही मिसळले तर जास्त छान लागते.
लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली तरी चालते.
माहितीचा स्रोत:सौ आई
अधिक टीपा:उपवासाच्या दिवशी संध्याकाळी खायला छान लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे ही अजिबात तेलकट होत नाहीत.
रोहिणी गोरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
Thanks Rohini - BTW, what is 'shingadyache peeth'?
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद अभिजीत. शिंगाडा हा सुपारीसारखा टणक असतो. थोडासा अर्धगोलाकार व पांढरा असतो. शिंगाडा धुवून व वाळवून त्याचे पीठ करतात. शिंगाडा उपासाकरता वापरतात. शिंगाड्याची लाप्शी व लाडू पण करतात. अमेरिकेत काही इंडीयन स्टोअर्स मध्ये शिंगाड्याचे पीठ मिळते. परत एकदा धन्यवाद.
वा वा वा वा रोहिणी व
नवीन ब्लॊगला शुभेच्छा.
त्यामुळे आता मला सर्व पाककृती वाचता येतील.
आधीच्या ब-याच वाचायला मिळालेल्या नाहीत त्या ही इथे दे. (कारणे तुला ठाऊक आहेतच.)
अगस्ती
बटाट्याच्या सालामधेच तर जीवनसत्व असते ना! म्हणून मी साल तसेच ठेवते. शिवाय पदार्थाला कुरकुरीतपणा येतो. बटाट्याच्या काचऱ्या करताना पण तसेच ठेवते. तसेच साबुदाणे वडे करताना पण साल काढायचे नाही.
पाककृतिबद्दल धन्यवाद. काही प्रश्न:
"१ वाटी साबुदाणा २-३ तास भिजत घालणे."
<< साबुदाणा २-३ तास सलग पाण्यात भिजत ठेवायचा की १० मिनिटे पाण्यात भिजवून नंतर पाणी पूर्णपणे काढून २-३ तास तसाच ठेवायचा? (२-३ तास पाण्यात ठेवला तर तो फ़ुगुन चिकट होईल की काय असं वाटतंय म्हणून विचारलं.)
<< शिंगाड्याच्या पीठाला काही दुसरा पर्याय?>
साबुदाणा भिजवायचा म्हणजे तो पाण्यात घालून ठेवायचा नाही. आपण भात करायला तांदुळ कसे धुवून घेतो तसाच साबुदाणा धुवून घ्यायचा. पाण्याने धुवून पाणी पूर्णपणे काढायचे, अगदी थोडे पाणी ठेवायचे, कारण काहीवेळेला साबुदाणा फुलून येण्याकरता पाणी जास्त लागते. तुम्ही जर अमेरिकेत रहात असाल तर स्वादचाच साबुदाणा घ्या. निरवचा अजिबात नको. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
शिंगाड्याच्या पिठाला पर्याय नाही. ते नसेल तर याच पद्धतीने साबुदाणे वडे बनवा.
Post a Comment