Wednesday, July 30, 2008

साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी! वा! प्रत्येकाला आवडणारी, माझी तर अत्यंत लाडकी. मी तिला साखी म्हणते. लहानपणीच हिची ओळख झाली. माझ्या माहेरी आईचा दर सोमवारचा उपवास असायचा त्यामुळे दर सोमवारी आई खिचडी करायची. दुपारची १२ ची शाळा ,त्यामुळे सकाळी साडेदहाला जेवायचो. त्यादिवशी सकाळपासून सगळे लक्ष त्या खिचडीकडे! केव्हा एकदा जेवायची वेळ होते आणि कधी एकदा खिचडी खायला मिळते. पोळी भाजीच्या जेवणामध्ये नैवेद्यासारखी खिचडी मिळायची, तेव्हापासून खिचडीची फॅन आहे.
एकदा आम्ही सगळ्या मामे-मावस बहिणी एकत्र जमलो होतो, आणि आम्हाला खिचडी खायची इच्छा झाली. माझी मोठी मामेबहीण आईला म्हणाली, "आत्या तू आज नको करूस खिचडी, मी करते. " हो हो. आणि खूप तिखट कर गं! लाल तिखट घाल भरपूर! असा आमच्या सगळ्या जणींचा आग्रह! ८-१० वाट्यांचा साबुदाणा भिजलेला, मग तो कालवून त्यात लाल तिखट घालतोय, घालतोय! आणि मजा म्हणजे त्या तिखटाला रंग नव्हता पण चव जाम तिखट होती, त्यामुळे आम्हाला कल्पनाच आली नाही की किती तिखट झाली आहे ते! खिचडी बनवली आणि खाल्ली मात्र....... बापरे! जहाल तिखट!! तोंड पोळणे ज्याला म्हणतात ते आम्ही त्यादिवशी अनुभवले आणि सगळा हिरमोड झाला.
नंतर इथे अमेरिकेत आल्यावर असाच एक मजेशीर अनुभव आला. माझ्या मैत्रिणीकडे साबुदाणा होता आणि मला म्हणाली, तुला येते साबुदाणा खिचडी? हो येते की! मी म्हणाले. त्या दिवशी चतुर्थी होती. मला म्हणाली की मी इथे अमेरिकेत आल्यापासून खिचडी खाल्लीच नाही, कारण मला करता येत नाही, त्यामुळे आज भरपूर खिचडी खाऊ. मी पण अगदी लांबलचक हो...... मस्त! खाऊ की! खिचडी केली. गरमगरम खायला घेतली आणि....... पहिल्या घासालाच दोन दाढांमध्ये इतकी काही चिकटली! खाताच नाही आली आम्हांला. आता याचे काय करायचे? दुधाचा, ताकाचा हबका मारून थोडी मुरवली आणि वाफा देऊन परत शिजवली तरी जैसे थे! साबुदाणा अजिबातच चांगला नव्हता. असा दुसऱ्यांदा हिरमोड झाला.
खिचडी अनेक प्रकारे करता येते. माझी आईची स्पेशालिटी म्हणजे ती हिरव्या मिरच्या कुटून घालते तूप जिऱ्याच्या फोडणीमध्ये. साजूक तुपातली तर लाजवाब होते. नुसती लाल तिखट घालून पण मस्त लागते. काकडी किसून पण घालतात, कांदा घालतात. अशी ही खिचडी माझ्या अत्यंत आवडीची!!!!

1 comment:

Anonymous said...

तुझ्या खिचडीवरून मलाही एक आठवण झाली. मी प्राथमिक शाळेत असताना कसलासा उपवास होता. कोणीतरी आजारी असल्यामुळे आई त्यांना भेटायला बाहेरगावी गेलेली होती. माझे काका आणि आम्ही भावंडे घरी होतो. त्यांना स्वयंपाकातील तसे बरेच काही माहित होते पण खिचडी कशी करतात ? माहित नव्हते. मी म्हटले,"एकदम सोप्पी असते.मी सांगते." नेहमीप्रमाणे केले सगळे पण आईच्या खिचडीला जो पिवळसर रंग येतो तो काही आला नाही. मग एकदम ट्यूब पेटली. हळद राहिली ना ? मग हळद टाकली तर वेगळाच रंग आला. पण हळद जास्त झाल्यामुळे आला असेल अशी समजूत घालत आम्ही ती हळदीची खिचडी उपवासाला खाल्ली. आईने आल्यानंतर हळद उपवासाला चालत नाही म्हटल्यावर काकांनी माझ्याकडे ’पुन्हा तुझे स्वयंपाकातील काहीही ऐकणार नाही’ अश्या अर्थी कटाक्ष टाकला...आता खिचडी परतल्यानंतर जेव्हा तो पिवळसर रंग येतो तेव्हा मला हमखास या घटनेची आठवण येते....