Tuesday, October 21, 2008

करंजी



जिन्नस :

१ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा किंवा all purpose flour ,
५-६ चमचे तेल कडकडीत गरम करून घालण्यासाठी, मीठ
३ वाट्या ओल्या नारळाचा खव, अडीच वाट्या साखर,
थोडी वेलची पूड, १-२ चमचे साजूक तूप
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन :

मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात १-२ चमचे साजूक तूप घाला. नंतर त्यात नारळाचा खव व साखर असे एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवत ठेवा. साखर वितळायला लागली की गॅस थोडा मोठा करा. थोड्या वेळाने नारळ व साखर यांचे मिश्रण घट्ट होईल. डावेने एकसारखे ढवळून मिश्रण गॅसवरून खाली उतरवून ठेवा. मग त्यात थोडी वेलची पूड घालून परत एकसारखे करा. हे झाले करंजीत घालायचे सारण.


सारण करायच्या आधी रवा व मैदा दूधात किंवा पाण्यात भिजवून ठेवा. भिजवायच्या आधी त्यात ५- ६ चमचे तेल एका कढल्यात तापवून घाला व चवीपुरते थोडे मीठ. तेल खूप गरम करा. रवामैद्यात घालताना चूर्र असा आवाज यायला पाहिजे. गरम तेल घातले की रवा मैदा चमच्याने एकसारखा करा.


सारण गार झाले की करंज्या करायला घ्या.


आता रवा मैद्याची एक मोठी पोळी लाटा. त्याचे मोठ्या वाटीने ३-४ गोल करा. पुरीसारख्या गोल आकारात सारण भरा व त्याचा अर्धगोलाकार आकार बनवून हाताने सर्व बाजूने दाब द्या म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातणाने अथवा कालथ्याने बाजूने कापून चंद्रकोरीसारखा आकार द्या. सर्व करंज्या करून घ्या. ३-४ करंज्या झाल्या की प्रत्येक वेळी त्यावर ओले फडके ठेवा म्हणजे त्या वाळणार नाहीत. नंतर करंज्या तेलात तळून घ्या.


एकेक वेगळी पुरी करून पण करंज्या करता येतील. पोळी लाटून वाटीने गोल करून घेतल्यास सर्व करंज्या एकसारख्या दिसतात.

5 comments:

Unknown said...

thank you for the receipe of Karanji :-)

Unknown said...

Hey Rohini,
I made karanji.....and u know what got the best ever compliment from my hubby......thank u so much for the receipe...i guess i can make karanji's now :-)

rohini gore said...

you are welcome nishi!

Dhanwanti said...

अरे वा.. मस्त रोहिणीताई..

यंदाची दिवाळी माझी लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. भारतात असले असते तर खूप चांगला झाली असती.

पण तुझा आधार असल्यामुळे मी चुकले तरी, तू बरोबर करायला आहेच. हि प.करू एकदम मस्त आहे. अतिशय आवडलेली आहे, आणि करून पाहणार आहे. लव यू..

- मनस्विनी

rohini gore said...

hey manaswini, wow tuzi pahili diwali aahe ka? abhinandan. kar karanji. diwaliche padarth. best luck. thanks a lott.. :)