Thursday, May 27, 2010

गोड लिंबू लोणचे

लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहिल्या लागल्यापासून जी काही छोटी मोठी सुट्टी मिळत असे तेव्हा आमची धाव नेहमी पुण्याकडेच असायची. माझी मोठी मामी त्यावेळेला दादरला रहायची तिच्याकडे अधुनमधून जायचो. ती नेहमी म्हणायची एकदा ये माझ्याकडे रहायला नेहमी पुण्याला पळत असतेच.

मामीकडे राहण्याचा योग लवकरच जुळून आला. विनायकला काही कामानिमित्ताने बाहेरगावी जायचे होते. विचार केला यावेळेला मामीकडे जाऊया. तिच्याकडे रहायला गेले आणि तिला म्हणाले मामी मला लिंबू लोणचे शिकवशील का? म्हणजे नेहमीचे नाही हं. गोड लिंबू लोणचे, मला ते खूप आवडते. म्हणाली मी तुला करूनच देते. १५ लिंबांचे करून देते. करताना बघ म्हणजे पुढच्यावेळी तू लोणचे घालशील तेव्हा सोपे जाईल. हे लोणचे तर खूपच सोपे असते. त्याकरता तुला दोन काचेच्या बरण्या लागतील त्या घेऊ आधी आपण आणि अजून आहेस ना ५-६ दिवस तेव्हा सावकाशीने घालू.

बाजारात लिंबांसाठी व बरण्यांसाठी फेरफटके मारले. बरण्या छानच मिळाल्या. चॉकलेटी रंगाच्या आणि त्याला लाल झाकण. जाड काचेच्या पारदर्शक ठेंगण्याठुसक्या बरण्या खूप छान दिसत होत्या. बरण्या घरी आल्यापासून आम्ही दोघींनी बरण्यांचे खूप कौतुक चालवले होते. कमी किंमतीत किती छान मिळाल्या ना! आकाराने पण वेगळ्याच आहेत, रंग पण नेहमीसारखा नाही, खूप वेगळा आणि छान! लिंबांकरता परत दुसऱ्या दिवशी भाजीमार्केटमध्ये फिरलो. इकडे बघ, तिकडे बघ, कितीला दिली लिंबे? खूप महाग आहेत. मामी भाजीवाल्यांकडचे लिंबू बघून वास घ्यायची, हाताने दाबून बघायची. मी खूप वैतागले होते. एक तर दादरला नेहमी गर्दी असते. एवढी काय चिकित्सा! मला तर कधी एकदा लिंबू कोणचे घालून खाते असे झाले होते! परत तिसऱ्या दिवशी आमच्या दोघींचे फेरफटके बाजारात! मला म्हणाली अगं लिंबू पण नीट बघून घ्यावी लागतात. खूप मोठी नकोत, लहानही नकोत. लिंबाचे साल पण पातळ हवे. शेवटी मामीला हवी तशी लिंबे मिळाली.

घरी आल्यावर जेवलो. दुपारचा चहा प्यायला मग लोणच्याला सुरवात. लिंबे धुवून घेतली. ती कोरड्या फडक्याने पुसली. विळी धुवून घेतली ती पण कोरड्या फडक्याने पुसली. बरण्या आधीच धुवून पुसून तयार होत्या. लिंबू सुद्धा चिरण्याची एक पद्धत आहे. उभे नाही चिरायचे, आडवे चिरायचे. मला तर त्यावेळेला उभे आडवे काहीच कळाले नाही! लिंबे चिरताना पण त्यावर दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने चिरायची. त्यात लाल तिखट व मीठपण नेहमीचे मिसळण्याच्या डब्यातले घालायचे नाही कारण की हे उपवासाचे लोणचे असते. पूर्वी लाल तिखट वर्षाचे घालून ठेवलेले असायचे त्यातले लागेल तेवढेच लाल तिखट काढून ठेवले होते मामीने. मीठ पण उपवासाला वेगळे म्हणून ठेवलेले त्यातलेच वापरले.

लोणचे कालवले व बरण्यात भरले. रात्रीच्या जेवणाला म्हणले घ्यायचे का लोणचे ह्यातले. मामी म्हणाली अगं थांब मुरू देत जरा थोडेसे! दुसऱ्या दिवशी लोणच्याच्या खाराची चव बघितली. मामी किती छान झालयं गं लोणचे! मामी म्हणाली झालाय ना छान. आवडले ना तुला. आवडले म्हणजे काय मस्तचं झाले आहे. मी नेहमी घालणार आता हे लोणचे. मला खूप आवडते. दोन दिवसांनी घरी आल्यावर आम्ही दोघांनी लोणचे खाण्याचा जो सपाटा लावला की खार संपून लोणच्याच्या फोडीच शिल्लक राहिल्या. त्याही मुरल्यावर मस्त लागल्या.

त्यानंतर मी हे लोणचे कधी घातलेच नाही. लिंबाच्या लोणच्याचा मुहूर्त बरेच वर्षानंतर इथे अमेरिकेत आल्यावर लागला. भारतात असताना आई तर दरवर्षी नवीन लोणचे घातल्यावर जुने मुरलेले आम्हां दोघी बहिणींना द्यायची, मग मुद्दामून कोण घालतयं लोणचे! इथे सुद्धा दोनदाच घातले गेले. परत एकदा घालायचे आहे. दर वेळेला लिंबे आणते आणि घोकत राहते घालायचे घालायचे म्हणून, शेवटी ती अशीच पोहे उपम्यांवर पिळून संपतात!

4 comments:

Mahendra said...

एक कन्फेशन, बायकोच्या ओरडण्याकडे ( अरे किती मीठ,साखर आहे त्यात,कश्शाला खातोस उगिच वगैरे कडे ) पुर्ण दुर्लक्ष करुन अजुनही येता जाता बरणी उघडून एखादी फोड तशीच खायला आवडते. .

पृथ्वीतलावरचं अमृत आहे ती फोड म्हणजे. :)

Dhanwanti said...

रोहिणीताई,

छान आहे एकूणच वर्णन. तुझ्या मामीच्या हातच्या "ह्या" लोणच्याची चव तरळली एकदम जिभेवर.

तुला एक गंमत सांगते, माझ्या आईकडे पण उपवासाचे तिखट-मीठ वेग-वेगळे आहे. माझी आजी पण एवढयाच चिकित्सेने लोणचं घालायची. अशाच कैऱ्या हव्या, लिंबाची सालं पातळच हवीत. वगैरे वगैरे.. आईच्या लग्ना नंतरच्या सुरवातीच्या काळात आई आजीच्या ह्या चिकित्सेपायी खूप वैतागून गेलेली असायची. आता आईच अगदी आजीसारख लोणचं करते.

तू ना खुपच छान आणि आंबट-गोड वर्णन केलं आहेस हे, अगदी मुरलेल्या लोणच्यासारख !!

- मनस्विनी

rohini gore said...

Mahendra, Dhanwanti, abhiprayabaddal anek dhanyawaad!! khup chhan vatle vachun. utsah aala!

HAREKRISHNAJI said...

श्रावणातले केळीच्या पानावरचे जेवण, त्यातले ्गरमागरम वरणभात, मस्तपैकी सोबत लिंबचे गोड लोणचे.

बोट चाटणे अशिष्टपणचे लक्षण मानले जाते काय ?