Sunday, November 21, 2010

माझ्या पाककृतींच्या लेखनाची वाटचाल (1)

मला चवीने खायला खूप आवडते आणि स्वयंपाकाचा कधीच कंटाळा नाही. चमचमीत पदार्थ तर खूपच आवडतात त्यामुळे वरचेवर केले जातात. बटाटेवडे , समोसे तर कित्येक वेळा केले आहेत. गोड अजिबातच आवडत नसल्याने मुद्दामहून गोड पदार्थ केला आणि चवीने खाल्ला असे कधीच झाले नाही. आवडीचे करणे, खाणे हे ठीक आहे पण ते लिहायचे वगैरे असते हे तर कधीच डोक्यात आले नाही. पूर्वी मासिकामध्ये येणार्‍या पाककृती पण कधी आवडीने वाचल्या नाहीत. त्यामुळे पाककृतींचे लेखन माझ्या हातून होईल असे कधीच वाटले नाही. मला मराठीतून लिहायची आवड मात्र आहे.




मनोगत या संकेतस्थळाची ओळख आम्हाला २००४ मध्ये झाली. मराठी संकेतस्थळ आणि त्यातूनही तिथे मराठीत लिहिताही येते ही तर माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट होती. अगदी सुरवातीला मला आठवत आहे, एका चर्चेत मनोगती श्रावणी हिने पाककृतींचा विषय टाकला होता. तिने लिहिले होते की आपल्याला माहीत असलेल्या पाककृती आपण इथे लिहू या, म्हणजे तेवढीच पाककृतींची देवाणघेवाण होईल. त्यानंतर त्या चर्चेत श्री. प्रभाकर पेठकर, अनू यांच्या काही पाककृतीही आल्या होत्या. सुरवातीला मी फक्त मनोगताचे वाचन करत असे आणि त्यातले काही लेखन आवडले तर त्यावर प्रतिसाद लिहीत असे. काही दिवसांनी मनोगताच्या प्रशासकांनी एक वेगळा पाककृती विभाग सुरू केला. मनोगताचे पूर्वीचे रूप मला अजूनही आठवत आहे.




असेच एकदा सहजच एक पाककृती लिहिली. मुद्दामून ठरवून लिहिली नाही, अशीच एक मनात आली आणि लिहिली. त्या पाककृतीचे नाव "कुड्या". कुड्याला एकही प्रतिसाद आला नाही. कुड्या पाककृती हे माझे आयुष्यातील पहिलेवहिले लेखन. मनोगतावर पूर्वी एका चर्चेत म्हणी लिहू या का? असे कोणीतरी सुरू केले. त्यात आठवून आठवून म्हणी लिहिल्या होत्या. मनोगत जेव्हा माहीत झाले त्यानंतर काही दिवसातच दुसर्‍या शहरात आलो. शहर नवीन असल्याने सुरवातीला पटकन ओळखी होत नाहीत, तेव्हा एकमेव आधार होता तो मनोगताचा. निरनिराळे लेखनप्रकार वाचण्यात वेळ जाई. त्यावेळी संगणकाचे व्यसन असे नव्हते. ई-सकाळ, लोकसत्ता वाचणे, एखादे विपत्र पाठवणे, गाणी ऐकणे, इतकेच मर्यादित होते. याहू निरोपकावर पण सुरवातीला २-३ मैत्रिणीच होत्या.




माझी एक मैत्रिण याहू निरोपकावर भारतातून सकाळी ८ वाजता यायची, तेव्हा अमेरिकेत संध्याकाळचे ६ वाजलेले असायचे. तिचे नाव आशा. मी रोज संध्याकाळी काही ना काही खायला करते. गप्पांमध्ये खादाडीचा विषय असायचाच. त्या दिवशी मी पोहे केले होते. नेहमीचे तेच तेच पोहे करून कंटाळा आला होता. यामध्येच काहीतरी वेगळे करू म्हणून कांदे-बटाट्यांबरोबर सिमला मिरची, गाजर, मटार असे सर्व काही घातले. सर्व भाज्या व कांदे बटाटे चिरताना पण वेगळ्या पद्धतीने चिरले - बारीक व उभे. याहूवर बोलताना मैत्रिणीला सांगितले की आज मी वेगळ्या पद्धतीचे पोहे करून पाहिले. तिने लगेच कृती विचारली. गप्पांमध्ये मी तिला मनोगताबद्दल सांगितले होते. ती म्हणाली छान आहेत की गं पोहे! मी करून पाहीन आणि तू पण लिही की मनोगतावर! मी म्हणाले, नको मला काही लिहिता येत नाही. तर म्हणाली लिही गं. म्हटले बरं चालेल लिहीन. बोलता बोलता तिला सांगितले की लिहीनच. वेगळेपणा आहे या पोह्यात. नावही ठरले माझे, "रंगीत पोहे".




रंगीत पोहे लिहिली व त्यावर एक प्रतिसाद आला- "मला इथे कोणी दडपे पोह्याची कृती देईल का?" दडपे पोहे म्हटल्यावर मला जो काही आनंद झाला! लगेच वहीत लिहिली आणि मनोगतावर टंकीत केली. दडपे पोह्यांना छान प्रतिसाद आले आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने माझी पाककृती लेखनाची वाटचाल सुरू झाली. एकेक करत लिहीत गेले. प्रतिसाद मिळाला की हुरूप येतो. मला आठवत आहे त्यावेळी मी आठवड्यातून दोन दोन पाककृती लिहायचे. जे रोज काही खायला करायचे ते लगेच रात्री मनोगतावर लिहायचे. कोणतीही पाककृती ठरवून लिहायची नाही. तिखट पदार्थ आवडत असल्याने तिखट पदार्थ्यांच्या पाककृती लिहिल्या. त्यात वडे, भजी, काही भाज्या, मसाला पापड वगैरे. मनोगतावर शरण्या नावाची मुलगी आहे, तिच्या पुरणपोळीला मी प्रतिसाद दिला. तिचा व्यक्तिगत निरोप मला आला की तू लवकरात लवकर ऑर्कुट वर ये. मी निरोपाला उत्तर दिले की मला ऑर्कुट अजिबात आवडत नाही, निमंत्रणाबद्दल धन्यवाद.




एकदा अशीच लिहीत बसले होते. विनायक म्हणाला काय लिहीत आहेस. मी म्हणाले असेच जरा काहीतरी वेगळे. पोळीच्या गमतीजमती, म्हणजे मी पोळ्या कशा शिकत गेले, असे जरा गमतीशीर. त्याने सुचवले की ते लिहिण्यापेक्षा तू पोळीचीच पाककृती दे. ती सगळ्यांना उपयोगी ठरेल. अरे वा! चांगली आहे कल्पना. मग एकदा पोळी करताना काय काय करावे लागते याचे निरीक्षण करून सविस्तर पोळी पाककृती लिहिली. त्यानंतर भाकरीची पण कृती लिहिली. एकदा श्री. पेठकर यांनी चर्चा टाकली की "आम्ही मेहनतीने पदार्थ करतो व पाककृती लिहिण्याकरता वेळ देतो तर कोणकोण करतात इथे दिलेले पदार्थ?" त्या चर्चेला बरीच उत्तरे आली. त्यात मृदुलाने माझ्या पद्धतीचे बटाटेवडे करून पाहिले होते. नंतर सर्व मनोगती जो कोणी पदार्थ करायचे त्या पाककृतीला प्रतिसाद म्हणून "मी हे करून पाहिले. छान झाले." असे लिहीत. किंवा "करून पाहिले पण बिघडले आता काय करू?" असेही प्रतिसाद येत असत. कोणीतरी आपले पदार्थ करून पाहत आहे हे वाचल्यावर पाककृती लिहायला आणखी हुरूप आला.




एकदा मनोगती गौरी हिने मला सुचवले की तुम्ही ऑर्कुटवर या आणि तिने हेही सुचवले की तुम्ही तुमच्या पदार्थांचे फोटो काढा. पाककृतींचे फोटो असलेल्या एका पाककृतींच्या ब्लॉगचा दुवाही तिने मला दाखवला. त्यात फोटो खूपच छान होते. ऑर्कुटवर खरे तर मी नाराजीनेच गेले. गौरी म्हणाली तुम्ही ऑर्कुटवर येऊन तर बघा, नाही आवडले तर सोडून द्या. ऑर्कुट वर गेले आणि ऑर्कुटच्या प्रेमातच पडले. काही कारणांनी मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता त्यामुळे प्रशासकांनी आपापले लेखन जतन करून ठेवा असे सांगितले होते. त्यावेळेला बर्‍याच मनोगतींमध्ये ब्लॉगचे वारे वाहत होते. तेव्हा मी पण माझ्या पाककृतींचा ब्लॉग काढायचे ठरवले. विचार केला त्यानिमित्ताने माझ्या सर्व पाककृती जतन केल्या जातील. मनोगतावरच्या सर्व पाककृती ब्लॉगमध्ये जतन केल्या.




ऑर्कुटला गेल्यावर तिथे एक स्वयंपाक नावाचा समुदाय पाहिला. तिथे मी माझ्या पाककृती ब्लॉगचा दुवा दिला. स्वयंपाक समुदायाच्या चालिकेने मला एक निरोप लिहिला, "रोहिणी स्वयंपाक समुदायात तुझे स्वागत आहे." तिला विचारले की तू मला ओळखतेस का? मग लगेचच लक्षात आले की हीच ती मनोगतावरची शरण्या. गौरीने फोटोचे सुचवल्याप्रमाणे पाककृतींचे फोटो काढायचे हे मनात होतेच. त्यावेळेला आमच्याकडे साधा कॅमेरा होता. विचार केला या कॅमेर्‍याने आधी फोटो काढून पाहू. चांगले आले नाहीत तर डिजिटल कॅमेरा घेऊ. साध्या कॅमेर्‍याने काढलेले फोटो प्रभावी नव्हते म्हणून मग डिजिटल कॅमेरा घेतला. सुरवातीचे फोटो व सध्याच्या फोटोमध्ये खूपच फरक आहे.




ऑर्कुटवर आणखी एक समुदाय आहे, तो म्हणजे 'एच ४ एम एम', म्हणजे एच ४ मराठी मंडळ समुदाय. अमेरिकेत एच-४ विसावर असलेल्या मराठी मंडळींचा समुदाय. तिथे डॉ. उल्का जोशी हिने पाककृती स्पर्धा आयोजित केल्या व सुरवातीला विषय होता 'तांदूळ'. मला तिने निरोप लिहिला की तू भाग घे. मी तिला लिहिले की भाग घेईन, पण मला पाककृती लिहिण्याचा कंटाळा आला आहे. त्या पाककृती स्पर्धांमध्ये असे होते की जी स्पर्धा जिंकेल तिने दुसर्‍या स्पर्धेचा विषय द्यायचा. पाककृती स्पर्धेमध्ये पदार्थाची कृती चित्रासहित द्यायची असते. नंतर मतदान होते व त्यात मते दिली जातात. पाककृती वाचून किंवा फोटो पाहून तिथल्या मुली पदार्थांना मते देतात. एका पाककृती स्पर्धेच्या विषयात माझी सिमलामसाला भाजी बसत होती. उल्काला निरोप लिहिला की पाककृती नवीन पाहिजे की आधीच प्रकाशित असली तरी चालेल. तिने निरोपाला उत्तर दिले की कोणतीही असू दे, भाग घेणे महत्त्वाचे. 'सिमलामसाला' लिहिली. फोटो दिला. नंतर अशा अनेक पाककृती स्पर्धेत भाग घेतला. आधी उल्काला म्हणाले होते की मला पाककृती लिहायचा कंटाळा आला आहे, पण झाले उलटेच. स्पर्धेच्या विषयात बसणारी पाककृती माझ्या ब्लॉगवर असली तरी ती न देता मी नवीन पाककृती लिहून स्पर्धेत भाग घेऊ लागले. या स्पर्धेमुळे माझे पाककृती लेखन खूप वाढले. प्रचंड उत्साह आला.




'एच ४ एम एम' समुदाय फक्त मराठी मुलींकरताच आहे. एच ४ सारखाच दुसरा समुदाय आहे तो म्हणजे 'आय. एच. एम. इन युएस' म्हणजेच अमेरिकेतल्या भारतीय गृहिणी. तिथे सर्व प्रांतातल्या मुली आहेत. तिथे एका स्पर्धेत भाग घेतला. विषय होता 'साउथ इंडियन डिश'. त्यात 'इडली' ची पाककृती लिहिली. शिवाय फोटोही दिला. 'इडली' विजेती ठरली. त्याच समुदायात एका स्पर्धेत 'भरली तोंडली' लिहिली व फोटोही दिला. 'भरली तोंडली' उपविजेती ठरली. तिथल्या काही अमराठी मुलींनी ही भाजी करून पाहिली व त्यांना ती आवडली. ऑर्कुटवर एक कोकणस्थ ब्राह्मणांचा समुदाय आहे तिथल्या एका पाककृती स्पर्धेत 'निवगरी' जिंकली. विजेत्या व उपविजेत्या पाककृतींना एक ऑनलाईन प्रशस्तिपत्रक देतात. त्यात मला 'इडली' साठी मिळाले. हे प्रशस्तिपत्रक वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे देतात. हे सर्व उत्साह वाढवणारे व प्रोत्साहन देणारे आहे.




गूगल टॉकवर एका मैत्रिणीशी, वैशालीशी, बोलता बोलता ती म्हणाली की मी सर्व सण साजरे करते. तिला म्हणाले की मला इथे उत्साहच वाटत नाही, कारण आमच्या शहरात भारतीय खूपच कमी आहेत. तर ती म्हणाली की इथेही इंग्लंडमध्ये बरेच कमी आहेत. पण तरी मी घरातल्या घरात सर्व सण साजरे करते. ती म्हणाली की त्यानिमित्ताने केले जाते व उत्साह येतो. आमचे हे बोलणे झाले २००७ साली. २००७ च्या पाडव्यापासून मी एक संकल्प सोडला, तो म्हणजे घरातल्या घरात सर्व सण साजरे करण्याचा. तेव्हापासून सर्व पक्वान्नांच्या पाककृती लिहिल्या. मोदक, बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी, गुळपोळी. इत्यादी.




या सर्व पाककृती लिहीत असतानाच मध्यंतरी सर्व पदार्थांना लेबले लावली. गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, चमचमीत पदार्थ, झटपट पदार्थ. लेबले लावताना अजून कोणकोणते पदार्थ लिहिले गेले नाहीत याची कल्पना आली. यात आणखी असे सुचले की जो स्वयंपाकाला नवीन आहे, ज्याला काहीही येत नाही, अगदी सुरवातीला तो कशापासून सुरवात करेल. यामध्ये मग फोडणीची पाककृती लिहिली. शिवाय थालीपिठ कसे लावावे, किंवा मिक्सर ग्राइंडर मध्ये कसे वाटावे, धिरडे-घावन कसे घालावे, साबुदाणा कसा भिजवावा, वगैरे. या आणि अशा बर्‍याच प्रकारच्या साध्या वाटणार्‍या, तरीही नवोदितांना उपयुक्त अशाही काही पाककृती लिहायच्या आहेत. बाळंतिणीसाठी पदार्थ, आजारपणातील पदार्थ, खूप पूर्वीच्या काही पारंपरिक पाककृती किंवा 'वाळवणे' अशा प्रकारच्या बर्‍याच पाककृती लिहायच्या आहेत.




पाककृतींना लेबले द्यायच्या आधी ज्या पाककृती मी केल्या त्या एकच विषय घेऊन केल्या आणि लिहिल्या. तसे तर स्पर्धेमुळे मला विषय व नवीन पाककृतीही सुचत होत्याच, पण तरीही काही माझ्या मनाने ठरवून केल्या. उदा. भाज्या, कोशिंबिरी, डाळींचे पदार्थ. गोड पदार्थांमध्ये बर्‍याच प्रकारच्या वड्या केल्या. एका चर्चेत असे कळले की खव्याला पर्याय म्हणून रिकोटा चीझ वापरतात. त्याआधी मी वडी प्रकार कधीच केला नव्हता. माझी पहिलीवहिली वडी, म्हणजे आल्याची वडी, रिकोटा चीझ घालून केली. ती यशस्वी झाली. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ते, गाजर, भोपळा या वड्या करत गेले. शिवाय मित्रमैत्रिणींकडून तुमच्याकडे अमुक एका पदार्थाची पाककृती आहे का अशी विचारणा झाल्यावर त्याही पाककृती लिहिल्या गेल्या.




मराठीबरोबरच एक इंग्रजी ब्लॉग सुरू केला आहे, पण त्याला अजूनही वेग आलेला नाही. असाच मनाचा निर्धार करून लिहायला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक बायका आहेत की ज्या पाककृती लेखन करतात पण त्यांची सुरवात ब्लॉगमधून झाली. माझी पाककृती लेखनाची सुरवात मनोगत या संकेतस्थळापासून झाली. ब्लॉग सुरू केला तेव्हा ब्लॉगचे नाव निर्मल रेसिपीज असे होते. माझ्या आईचे नाव निर्मला म्हणून निर्मल रेसिपीज. पण नंतर काही ब्लॉग्ज पाहिले तेव्हा खाण्याच्या संदर्भात ब्लॉगचे नाव हवे असे वाटले म्हणून मग ब्लॉगला नाव दिले "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म."





माझ्या पाककृती लेखनामधील जास्तीत जास्त पाककृती मी माझ्या आईकडून शिकले आहे. बरेच वेळा काही पदार्थांबद्दल माहिती असूनसुद्धा परत एकदा फोनवर नीट विचारून घेते. तिच्याकडून अजूनही बर्‍याच पाककृती घेऊन, त्या करून बघून लिहायच्या आहेत. मी कधीही पाककृती केल्याशिवाय आणि चव घेतल्याशिवाय लिहीत नाही. शिवाय भारतात असताना आणि इथे अमेरिकेत आल्यावर जे काही मित्रमैत्रिणी मिळाले त्यांच्याकडून माहिती झालेल्या व मला आवडलेल्या काही पाककृतीही लिहिल्या आहेत.




या लेखामध्ये मी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांचे विषय काय होते व त्यात मी कोणकोणत्या पाककृती दिल्या होत्या त्यांची चित्रे देत आहे.


.......(2).....


चित्रे व दुवे भाग (२) मध्ये पहा.

वरील लेख मनोगत दिवाळी अंक २०१० मध्ये प्रकाशित झालेला आहे.

3 comments:

mau said...

mast...majha punha utasah wadhavalas rohini..........halli pakakruti kamich jhaleli...pan mala watate aata suru karayala harakat naaahi.......chhan lihile aahes...

Manaswini said...

रोहिणीताई..

तुझा हा पाक-कलेतला लेखन प्रवास अतिशय वाखाणण्याजोगा आहे. प्रेरणा देणारा आहे.

खूप दिवसापासून वाचेन वाचेन म्हणत होते, पण आज मुहूर्त लागला. खरेच सांगायचे तर मी खूपच रममाण होऊन गेले वाचता वाचता. जणू एखाद्याचे आत्मचरित्र वाचताना आपण होतो ! वाचणाऱ्याला, सहज घडत जाणारा हा प्रवास वाटत असला तरी तो खूप वेगवेगळ्या स्तरांवरून जाणारा आहे. वाचताना ते लक्षात येतंच. पण, आम्ही फक्त वाचणारे.. वाचून आनंद मिळवणारे.. प्रसंगी, कौतुक करणारे.. पण प्रत्यक्ष प्रयत्न करणारी तू गं ! त्या टप्प्यातून जाणारी तू ! नवी उमेद घेऊन एक एक पाऊल पुढे जात जात हा प्रवास आणखी आणखी पुढे नेत राहणारी तू..

म्हणूनच तुझं फार फार कौतुक वाटतंय. आणि नुसतं वरपांगी नाही हे अर्थात. मनापासून.

तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा ! तुझ्या इंग्रजी ब्लॉगला सुद्धा असाच भरघोस प्रतिसाद मिळावा, ही सदिच्छाही !

- अवनी राजोपाध्ये

rohini gore said...

Uma, Manaswini, Abhiprayabaddal anek dhanyawaad!!! tumhi doghihi maza utsah khup vadhvata. khup chhan vatate!