Tuesday, March 03, 2009

कुड्या

कुड्या म्हणले की मला नेहमी पुण्यातील गणपती विसर्जनाची आठवण होते. कुड्या हा खाण्याचा प्रकार खूप प्रचलित नाही. हा एक कोकणातला प्रकार आहे. कुड्या पिठलं भाताबरोबर जास्त छान लागतात.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यामध्ये गणपती विसर्जनाची एक मोठी मिरवणूक निघते. त्यात पुण्यातील सर्व गणपती विसर्जनासाठी एकत्र येतात आणि ओळीने वाजत गाजत लक्ष्मी रोडवरून जातात. त्यात पहिले पाच मानाचे गणपती असतात आणि सगळ्यात शेवटी श्रीमंत दगडुशेट हलवाई व मंडईतला गणपती असतो. पुण्यात राहत असताना आम्ही दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व आत्ये मामे व मावस भावंड एकत्र जमायचो व मिरवणूक पहायचो. त्यावेळी विद्युत रोषणाई केलेले गणपती पण असायचे. सजावटीबरोबर एखाद्या गाण्याच्या तालावर नाचणारी विद्युत रोषणाई म्हणजे पुण्यातील गणपतींचे एक आकर्षण होते. मध्यरात्रीनंतर विद्युत रोषणाईच्या गणपती विसर्जनाला सुरवात व्हायची व पहाटे उजाडायच्या आत मिरवणूक संपायची!


आमचे सर्व मामे भाऊ, मामे बहीणी, मावस भाऊ बहीणी, त्यांचे मित्र मैत्रिणी असे सर्वजण नारायण पेठेत राहणाऱ्या मामाकडे जमायचो. रात्रीचे जेवण करून यायचे सर्वजण. रात्रभर मिरवणूकीत लक्ष्मीरोडभर फिरायचो. मजा करायचो. पाणीपुरी, भेळपुरी, सुजाताचा बटाटेवडा, अमृततुल्यचा चहा. रात्रभर हाच उद्योग! अल्का टॉकीजपासून चालत चालत जायचे ते मंडईपर्यंत. मध्येच कुणाच्या घरी जायचे, मग त्याला घेऊन परत मिरवणुकीत सामील व्हायचे. माझे मामेभाऊ व त्यांचे मित्र काही वेळेला मिरवणूकीत त्यांच्या मित्रांबरोबर ढोल ताशे वाजवण्यात सामील व्हायचे. गुलालाने माखलेले असायचे. त्या ढोल ताश्यांचा एक विशिष्ट प्रकारचा रिदम कानात साठून रहायचा. माम्या, मावश्या व माझी आई थोडा वेळ फिरून परत घरी जायच्या आणि आम्हाला बजावून जायच्या की मंडई व दगडुशेटचा गणपती निघाला की कळवा आम्हाला. मग पहाटे त्यांना घरी जाऊन सांगायचे कोणीतरी की चला उठा, दगडुशेट व मंडईचा गणपती निघाला आहे मंडईतून.

मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.


चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!


त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला. "कुड्या" ची अजून एक आठवण म्हणजे ही माझी पहिली पाककृती मी मनोगत संकेतस्थळावर लिहिली २००५ च्या सुरवातीला तेव्हापासून माझ्या पाककृती लिखाणाला सुरवात झाली. तुम्ही पण करून बघा कुड्या, नक्कीच आवडतील! पण त्याबरोबर पिठलं भात हवा बरं का!

3 comments:

भानस said...

आठवण आणि कुड्या दोन्हीही मस्त. मी कधी ऐकलेले नाही कुड्यांबद्दल. मी देशावरची ना पण हे कोंकणातले. सासुबाईना विचारायला हवे. काही पदार्थ त्यांच्या आठवणी करिता मनात रेंगाळतात.

Swati T said...

Aathwan chhan aahe, aani kudya kharach khawyashya watlya, search kele tar deatail recipe nahi milali. recipe link dewu shakal ka?

rohini gore said...

भाग्यश्री व स्वाती प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. स्वाती, या ब्लॉगवर चटणी लेबल मध्ये तुला कुड्या चित्रासहीत दिसतील. पाककृतीच्या उजव्या बाजुच्या रकान्यात तुला लेबले दिसतील. त्यात चटणी लेबल बघ. कुड्या तुम्हाला दोघांनाही आवडतील!