Friday, May 24, 2013

फोडणीची साबुदाणा खिचडी



जिन्नस :

भिजलेला साबुदाणा अर्धी वाटी
दाण्याचे कूट मूठभर
दाणे २-३ चमचे
मटार मूठभर
पाव कांदा चिरलेला
एक छोटा बटाटा (काचऱ्या चिरतो त्याप्रमाणे चिरा)
हिरवी मिरचीचे तुकडे २ते ३
लाल तिखट पाव चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
फोडणीकरता तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
मीठ चवीपुरते
साखर पाव चमचा



भिजलेला साबुदाणा हाताने ढवळून एकसारखा करून घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, साखर व दाण्याचे कूट घालून परत एकदा साबुदाणा एकसारखा ढवळून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. (हळद रंग येण्यापुरती अगदी थोडीच घालावी)  नंतर त्यात मिरचीचे तुकडे, चिरलेला कांदा व बटाटा घाला. मटारही घाला. हे सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात अगदी थोडे मीठ घाला व झाकण ठेवा. फोडणीत घातलेले सर्व जिन्नस शिजले की त्यात साबुदाणा घाला. या साबुदाण्यात आपण आधीच दाण्याचे कूट, मीठ, साखर व लाल तिखट मिक्स करून ठेवले आहे. साबुदाणा घातला की परत एकसारखे ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवून एक वाफ द्या. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एकसारखे करून घ्या. आता गॅस बंद करा. गरमागरम खिचडी खा. आवडत असल्यास थोडे लिंबू पिळा. या खिचडीची चव थोडी वेगळी लागते. मला ही चव आवडली. करून पहा. तुम्हालाही आवडेल.


No comments: