Friday, June 29, 2012
चिकवड्या
जिन्नस :
अर्धी वाटी साबुदाणा
४ वाट्या पाणी
चवीपुरते मीठ
क्रमवार मार्गदर्शन : अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवून ठेवा. साबुदाणा खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो तसा भिजवा. त्यात थोडे पाणी राहू द्या. सकाळी भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा व त्यात ४ वाट्या पाणी व मीठ घाला. नंतर त्यात मोकळा केलेला साबुदाणा घाला व हे मिश्रण शिजवा. शिजवताना डावेने हे मिश्रण ढवळत राहा म्हणजे पातेल्याला खाली लागणार नाही. पळीवाढे इतपत मिश्रण आटले की गॅस बंद करा. साबुदाणा शिजला की त्याचा पांढरा रंग जाईल म्हणजे मिश्रण झाले असे समजावे. नंतर प्लस्टीकच्या कागदावर चिकवड्या घाला. चिकवड्या घालताना जवळ जवळ घाला म्हणजे बऱ्याच चिकवड्या कागदावर मावतील. चिकवड्या चमच्याने घाला. चमच्याने मिश्रण कागदावर घातले की थोड्या गोल आकार देवून पसरवा. चिकवड्या जास्त पातळ नको व जाडही नकोत. चिकवड्यांना वाळवण्यासाठी खूप कडक उन लागते. २-३ तास कडक उन्हात चिकवड्या वाळल्या की हलक्या हाताने त्यांना उलटवा व दुसऱ्या बाजूने परत २-३ तास उन दाखवा. म्हणजे दोन्ही बाजूने चिकवड्या पूर्णपणे वाळतील. नंतर चिकवड्या एका पातेल्यात घाला व दुसऱ्या दिवशी परत उन्हात ठेवा. चिकवड्या चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजेत म्हणजे छान फुलतात. नंतर गरम तेलात चिकवड्या तळून भाजक्या शेंगदाण्याबरोबर खा. खूप छान लागतात. उपवसाला या चिकवड्या चालतात. अर्धी वाटी साबुदाण्यात छोट्या चिकवड्या ६० ते ६५ होतात.
Labels:
उन्हाळी पदार्थ,
उपवासाचे पदार्थ,
साबुदाण्याचे पदार्थ
Wednesday, June 27, 2012
बटाटा कचोरी
जिन्नस :
४ मधम आकाराचे बटाटे
मिरच्या २
नारळाचा खव मूठभर
लाल तिखट
कोथिंबीर मूठभर
दाण्याचे कूट मूठभर
मीठ चवीनुसार
साखर अर्धा चमचा
चारोळ्या, बेदाणे, बदामाचे काप ऐच्छिक
साबुदाण्याचे पीठ डावभर
क्रमवार मार्गदर्शन : बटाटे कूकरमध्ये उकडून घ्या. कूकर गार झाला की आतील बटाटे एका रोळीमध्ये काढून घ्या म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटे पूर्ण गार झाले की त्याची साले काढून किसून घ्या. बटाटे किसले की त्यात १ मिरची व मीठ वाटून घाला अथवा लाल तिखट अर्धा चमचा व चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकजीव करा. ओला नारळाचा खव, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ व साखर, एका मिरचीचे खूप बारीक तुकडे असे कचोरीत घालायचे सारण तयार करा. त्यात हवे असल्यास चारोळ्या, बदाम काप व बेदाणे घाला. सारण एकत्रित कालवून घ्या.
आता बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व एकेक गोळ्याची कचोरी बनवा. कचोरी बनवताना गोळ्याला तेला/तूपाचा हात घेऊन त्याचा हातानेच नितळ गोळा करा व त्याची पातळ पारी बनवा. या पारीमध्ये ओल्या नारळाच्या खवाचे केलेले सारण बनवा व ही पारी हाताने सर्व बाजूने एकत्र करून पारी बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही. गोल आकाराच्या कचोऱ्या बनवून घ्या. नंतर एका स्टीलच्या वाडग्यात साबुदाण्याचे पीठ घ्या व या पीठात सर्व कचोऱ्या घोळवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात तेल/तूप घाला. तेल पुरेसे तापले की आच मंद ठेवा व तांबूस रंगावर सर्व कचोऱ्या तळून घ्या. या कचोऱ्या उपवासाला चालतात.
Wednesday, June 20, 2012
बटाटा पापड
जिन्नस :
१ मोठा बटाटा
लाल तिखट १ चमचा
जिरे पूड अर्धा- पाव चमचा
मीठ चवीपुरते
साबुदाणा पीठ ३-४ चमचे
पापड लाटण्यासाठी साबुदाणा पीठ वेगळे घ्या.
मार्गदर्शन : बटाटा कूकरमध्ये उकडून घ्या. कूकरमधून शिजलेला बटाटा एका रोळीमध्ये काढून ठेवा म्हणजे जास्तीचे पाणी निथळून जाईल. बटाटा गार झाला की त्याचे साल काढून किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, साबुदाणा पीठ व मीठ घालून हे मिश्रण हातानेच खूप एकजीव करा. नंतर साजूक तूपाचा हात घेऊन हे मिश्रण मळा. नंतर हे मिश्रण खूप कुटा. पीठ एकदम नितळ झाले पाहिजे. लोखंडी खलबत्यात हे मिश्रण खूप छान कुटले जाते. खलबत्ता नसेल तर एका पसरट पातेल्यात पीठ ठेवून त्यावर वाटीने आपटा. वाटी कलती करून हे मिश्रण वाटीनेच कूटा. वाटीच्या कडा या पीठावर पडल्या पाहिजेत. नंतर पोलपाटावर साबुदाण्याचे पीठ घ्या. कुटलेले बटाट्याच्या पीठाला डांगर म्हणतात. या डांगराचे छोटे गोळे करून एका गोळीचा एक पापड असे पापड लाटा. पापड लाटताना पीठाचा वापर जास्त करा. खूप पातळ पापड लाटून झाले की एका प्लॅस्टीकच्या कागदावर हे पापड उन्हात चांगले कडक वाळवा व नंतर एका डब्यात ठेवा. डब्याचे झाकण पूर्णपणे बंद होईल याची काळजी घ्या. नाहीतर हवा लागून हे पापड लापट होतील. उपवासाचा हे पापड चालतात. नंतर हे पापड तळून खा. पापड हलकाफुलका झाला पाहिजे. डांगर एकजीव एकसंध झाले आणि पापड पातळ लाटला गेला की पापड खूप छान होतात. पापड तळले की फुलतात आणि हलकेफुलके होतात. हे पापड चवीला खूप छान लागतात. डांगरही खूप छान लागते. १ मोठ्या बटाट्यामध्ये साधारण लहान २० ते २५ पापड होतात.
हे पापड भाजूनही छान लागतात. भाजलेल्या किंवा तळलेल्या पापडासोबत भाजके शेंगदाणे आवडत असल्यास घ्यावेत.
Friday, April 20, 2012
ढोकळा
गिटसचे एक पाकीट
दोन मोठाले चमचे तेल
एक वाटी पाणी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग हळद,
लाल तिखट अर्धा चमचा
चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ थोडासा
भाजलेले दाणे
मिरची १
क्रमवार मार्गदर्शन : गिटस चे एक पाकीट कापून त्यातले ढोकळ्याचे पीठ एका पातेल्यात काढून घ्या. त्यात २ चमचे तेल घाला. एका वाटीत पाणी घ्या. थोडे थोडे पाणी घालून आणि एकीकडे पीठ चमच्याने ढवळून हे पीठ भिजवावे. एकसारखे एकही गुठळी होऊन देवू नका. म्हणून सतत एकीकडे पाणी घालून चमच्याने ढवळत रहा. कूकरच्या दोन भांड्यांना तेल लावून घ्या व पीठ ओता. मध्यम आचेवर कूकर ठेवा. त्यात थोडे पाणी घालून कूकरची दोन भांडी एकमेकांवर ठेवा. शिट्टी काढून घ्या व गॅसवर हा कूकर १५ ते २० मिनिटे ठेवा. कूकर गार झाला की त्यातली पातेली बाहेर काढून त्यात उकडलेल्या ढोकळ्याच्या पीठाचे सुरीने चौकोन करा. आता मध्यम आचेवर कढले तापत ठेवा. त्यात थोडे तेल घाला व ते तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा व त्यातच चिरलेली एक मिरची व अर्धा चमचा लाल तिखट व भाजलेले दाणे घाला. आता ही फोडणी ढोकळ्यांवर पसरवून घ्या व नंतर डीश्मध्ये घालून खायला द्या. त्यावर चिरलेली कोथिंबीवर व खवलेला नारळ घाला. आवडत असल्यास पीठ भिजवतानाच पीठामध्ये आलेमिरची व लसूण याची पेस्ट घाला.
Wednesday, March 28, 2012
साबुदाणा वडा

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
साबुदाणा १ वाटी
बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
बारीक वाटलेल्या हिरव्या तिखट मिरच्या ५-६ किंवा दीड ते २ चमचे लाल तिखट
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट पाव ते अर्धी वाटी
चवीपुरते मीठ,
१ चमचा साखर
तळणीसाठी तेल,
क्रमवार मार्गदर्शन: १ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. ४ तासानंतर भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यावा. त्यात कच्चा बटाटा साल न काढता किसून घाला. नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ व साखर घाला. नंतर त्यात दाण्याचे कूट घालून लिंबू पिळा व चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण हाताने नीट कालवा. कालवताना थोडे पाणी घाला. मिश्रण मिळून येण्यापुरतेच पाणी घालावे.
आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला व साबुदाण्याचे मिश्रण बनवले आहे त्याचे गोल आकाराचे वडे लालसर रंगावर तळून घ्या. वडे तळल्यावर ते पेपर टॉवेल वर ठेवा म्हणजे त्यातले तेल निथळून जाईल. नारळ्याच्या चटणीसोबत हे वडे छान लागतात.
Saturday, March 24, 2012
वांग्याचे भरीत

जिन्नस :
मध्यम आकाराचे वांगे
पाव कांदा चिरलेला
थोडी कोथिंबीर चिरलेली
मूठभर दाण्याचे कूट
लाल तिखट पाव चमचा
चवीपुरते मीठ
चिमूटभर साखर
तेल फोडणीसाठी
मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन : मध्यम आचेवर वांगे भाजून घ्या. ते पूर्ण गार झाले की मग त्याची साले काढून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पूरेशी तापली की त्यात तेल घालून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून परतून घ्या. कांदा शिजला की त्यात खूप बारीक केलेले वांगे घालून मग त्यावर लाल तिखट, मीठ व साखर घालून परता. परतत असताना गॅस मंद ठेवा. नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर व दाण्याचे कूट घालून नीट ढवळून घ्या. हे वांग्याचे भरीत खूप छान लागते. भाकरीबरोबर या भरताची चव अजूनही छान लागते. वांग्याचे भरीत २-३ प्रकारे करतात. दह्यातले व कांदा पात घालूनही करतात. त्याची कृती नंतर लिहीन.
Monday, March 12, 2012
अरूगुला

जिन्नस:
अरूगुला १ पॅकेट
पाव कांदा
३-४ लसूण पाकळ्या
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
तेल, मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन : अरुगुला चिरून धुवून घ्या. रोळीमध्ये चिरलेला अरूगुला घालून त्याखाली ताटली ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीकरता थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व चिरलेल्या लसूण पाकळ्या घाला. कांदा व लसूण थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला अरुगुला घालून त्यावर झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. असे दोन तीन वेळा केले की भाजी चांगली शिजेल. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड व मीठ घालून परत एकदा भाजी परतून घ्या व झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. भाजी तयार झाली आहे. या भाजीची चव थोडी उग्र लागते पण छान आहे. करडई भाजीसारखी थोडी चव जाणवली.
Wednesday, January 25, 2012
brussels sprouts balls

जिन्नस :
किसलेले brussels sprouts ८ ते १० नग
एका मिरचीचे बारीक तुकडे
लाल तिखट
धने जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
डाळीचे पीठ
तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व त्यात अगदी थोडे पाणी घालून छोटे छोटे गोल बनवा. गोल बनवण्याइतपतच पीठ घट्ट भिजवावे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवा व त्यात पुरेसे तेल घाला. तेल तापले की गॅस मंद ठेवा व त्यात वरील जिन्नसापासून बनवलेले गोळे सोडा. लालसर रंग येईपर्यंत तळा. एका बाजूने लालसर झाले की गोळे अलगद उलटा व परत लाल रंग येईपर्यंत तळा. वर तिखट मीठाचे प्रमाण दिले नाही. अगदी थोडे घालायचे आहे सर्व काही. मिरची पण तिखट नसलेली घाला. काही मिरच्या तिखट नसतात. कोथिंबीर पण थोडीच घाला. हे गोळे मधल्यावेळी चहासोबत खायला छान लागतात. नाहीतर जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पण करायला हरकत नाही.
Monday, January 16, 2012
तीळवडी

जिन्नस :
तीळाचे कूट १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
गूळ १ वाटी
साजूक तूप १ चमचा
क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात साजूक तूप, गूळ व गूळ भिजेल इतके पाणी घाला. थोड्यावेळाने मिश्रण उकळायला लागेल व त्याचा एक तारी पाक बनेल. एकतारी पाक झाला की गॅस बंद करून लगेच त्यात तीळ व दाण्याचे कूट घालून मिश्रण पटापट ढवळा. २ स्टीलच्या ताटल्यांवर थोडे साजूक तूप पसरवा व त्यावर मिश्रण ओता. हे मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा.
Wednesday, January 04, 2012
शिंगाडा पीठ लाडू

जिन्नस:
शिंगाडा पीठ १ वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
साजूक तूप ५ ते ६ चमचे
पीठीसाखर सपाट १ वाटी
क्रमवार मार्गदर्शन: मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात शिंगाडा पीठ व साजूक तूप घालून लालसर रंग येईपर्यंत भाजा. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळा. मिश्रण कोमट असताना लाडू वळा. आधी २-३ चमचे साजूक तूप घालून भाजायला सुरवात करा व नंतर बाकीचे तूप भाजत असतानाच थोडे थोडे घाला म्हणजे शिंगाडा पीठ पूर्णपणे तूपात भिजले का नाही ते कळेल. वर साजूक तूपाचे प्रमाण दिले आहे, पण कमी-जास्त लागेल, कारण पीठ तूपात भिजले पाहिजे. शिंगाडापीठ तूपात भिजल्यावर तपकिरी दिसते पण भाजून झाल्यावर थोडा रंग बदलतो. रंग बदललेला तसा कळत नाही. अंदाजाने नीट बघून भाजावे.
बेसन लाडवाप्रमाणेच ह्या लाडवाची पद्धत आहे. हे लाडू खूप खमंग लागतात. १ वाटीत छोटे छोटे १० ते १२ लाडू होतात.
Tuesday, December 06, 2011
पुरणपोळी
आमच्यात पुरणावरणाचा घाट असतो बरं का! कोणताही सण आला की बाकीचे कोणतेही पक्वान्न असले तरी पुरण हे लागतेच! इति देब्रा! कोब्रा या पुरणावरणाच्या फंदात कधी पडत नाहीत. घाट घालण्याच्या क्रियेत ते जरा लांबच राहतात!
मला पण आठवायला लागेल की मी पुरण किती वेळा आणि केव्हा घातले होते बरे! आठवून काही फायदा नाही. कारण की लांबलचक रेसिपींपासून मी जरा दूरच असते. भारतात असताना जास्तीचे कोणी पाहुणे आले किंवा सणासुदीला तयार श्रीखंडच आणायचे, अमूल व वारणा! या अमुलवारणाचे डबे तर मला खूपच आवडायचे.
अमेरिकेत आल्यावर मात्र बरेच आवडणारे तिखटगोड पदार्थ घरात करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. एकदा माझ्या पंजाबी मैत्रिणीने फोन करून मला सांगितले की मला पुरणपोळी शिकायची आहे आपण करायची का एकदा? मी तुझ्या मदतीला येईन. मी म्हणाले चालेल की! करू या, येत्या होळीच्या मुहूर्तावरच करू. मलाही खूप आवडते! विचार केला या दोघा पंजाबी नवराबायकोबरोबर अजूनही ओळखीच्या चार पाच मित्रमैत्रिणींना बोलावू. मस्तपैकी पुरणावरणाचा घाटच घालू की जो जन्मात कधी घातला नाही!
पंजाबी दोघे जण, दक्षिण भारतीय दोघे जण, आम्ही दोघे व एक मराठमोळा मित्र म्हणजे ७ ते ८ जणांचा पुरणपोळीचा बेत ठरवला. त्यावेळी माझ्याकडे पुरणयंत्र नव्हते, अजूनही नाही. खरे तर पुरण हे पुरणयंत्रातूनच जास्त चांगले वाटले जाते. पुरणयंत्र नसताना पुरणपोळीचा घाट घातला होता.
पुरण जास्तीत जास्त बारीक कसे करायचे यावर एक युक्ती काढली. त्यावेळेला माझ्याकडे भारतातून आणलेला मोठा कुकर होता. त्यात ६ वाट्यांची हरबरा डाळ शिजवली. इलेक्ट्रिक शेगडीवर कुकराला वाफ धरायला अर्धा तास तरी जातोच. कुकराला शिट्या भरपूर केल्या, इतक्या की आतल्या डाळीचा भुगा पडून ती उलट शिट्टीतून बाहेर यायला लागली! नंतर डाळ साखरगुळ घालून शिजवायला कढईत ठेवली. शिजवताना एकीकडे कालथ्याने डाळीवर वार करत राहिले जेणेकरून सर्व डाळ खूप बारीक झाली पाहिजे. मिश्रण छान मिळून आले होते. मिश्रण गार झाले. कणकेलाही चांगलेच तिंबून घेतले होते. आता एवढी सगळी जय्यत तयारी झाल्यावर पोळ्या कशा काय बिघडतील!?
कणकेच्या छोट्या गोळ्याला हातानेच पुरीसारखा आकार दिला. त्यात पुरणाचा साधारण मुठीइतका गोळा भरून पोळी लाटायला सुरवात केली. पोळी लाटली जात होती पण लाटताना भरड लाटली जात आहे हे जाणवत होते. पोळीमधून अगदी छोटे छोटे न शिजलेले डाळीचे बारीक कण पोळीच्या वरती आले होते. पोळी ठिगळ लावलेल्या कापडाप्रमाणे दिसत होती. पूरण शिजले होते पण त्यात खूप छोटे डाळीचे बारीक कण न शिजताच तसेच राहून गेले होते. सर्व पोळ्या करून मग एकत्रच सर्व जेवायला बसणार होतो. कुणीतरी म्हणाल्याचे आठवले की पुरणयंत्र नसेल तर मिक्सर मधून बारीक करता येते. इथले ब्लेंडर म्हणजे काय दिव्यच असतात. पुरण घातले ब्लेंडरमध्ये तर पुरणाचा सगळ्यात खालचा थर फिरत होता. वरचा थर' जैसे थे' स्थितीत होता. म्हणतात ना की काम बिघडले तर कामात काम अजूनच वाढत जाते. मिक्सरमध्ये पुरण बारीक झाले नाहीच, शिवाय मिक्सर धुण्याचे एक काम वाढले.
मैत्रिणीला सांगितले की या पुरणामधले सर्व न शिजलेले डाळीचे बारीक कण वेगळे करायला घे. मला जाम वैतागायला झाले होते. मैत्रीण म्हणाली 'आप क्युं चिंता कर रही है, मै ये काम कर देती हुँ अलग करनेका' काम खूपच किचकट होऊन बसले होते. ती मैत्रीण आरामात एका परातीत पुरण घेऊन न शिजलेले कण बाजूला करत होती. एकीकडे दूरदर्शन बघत होती. मी मनात 'अगं बाई ही वेळ आरामात दूरदर्शन बघून तांदूळ निवडण्याची नाहीये. युद्धपातळीवर कामे व्हायला हवीत.' मग मी पण अर्धे मिश्रण एका परातीत घेतले आणि दोघींनी मिळून डाळीचे बारीक कण अलग करण्याचे काम करत राहिलो. तसे काम पटकन झाले आणि एकीकडे हासत राहिलो:D एकमेकींना छोटे कण दाखवत राहिलो, 'ये देख,,, कितने है,,, छोटे कण,,:) ' या डाळीच्या कणांचे अलग करण्याच्या कामात मी जास्त वेळ रेंगाळत राहिले नाही. एकेक करत मी पुरणपोळ्या लाटायला सुरवात केली. आता पुरणपोळ्या मऊसूत छान होत होत्या. दोघे दोघे करत जेवायला बसले. गरम गरम पोळ्यांवर भरपूर साजूक तूप! पोळ्या पटापट संपत होत्या. सगळ्यात शेवटी माझ्या वाटणीच्या गरम पोळ्या घेऊन त्यावर भरपूर साजूक तूप घातले आणि 'आहाहा,,, ' करत पोळ्या खाल्ल्या. मला पुरणपोळी वर भरपूर तूप लागते. पोळीवर तूप तरंगायला हवे.
त्या एपिसोडनंतर मी इतक्या पोळ्या कधीच केल्या नाहीत. आम्हाला दोघांना एक वाटी हरबरा डाळीच्या पोळ्या भरपूर होतात. अजूनही माझ्याकडे पुरणयंत्र नाही. पण माझे काहीही अडत नाही. आता मी हरबरा डाळ शिजवण्या आधी एक तास गरम पाण्यात भिजत घालते आणि मग कुकरामध्ये शिजवते. बाकीचे सर्व तसेच.

Tuesday, November 01, 2011
खसखशीच्या वड्या

जिन्नस :
खसखस अर्धी वाटी
दूध अर्धा कप
बदाम अर्धी वाटी
काजू अर्धी वाटी
साजूक तूप २ चमचे
साखर दीड वाटी
मार्गदर्शन :
खसखस दूधामध्ये भिजत घाला. बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घाला. तासाभराने भिजवलेले सर्व बदाम सोला. मिक्सरमध्ये सोललेल्या बदामाची व काजूची पूड करा. नंतर भिजवलेली खसखस मिक्सरमध्ये घालून बारीक करा व त्यात बदाम काजूची केलेली पूड घालून परत एकदा मिक्सरमधूनध्ये सर्व बारीक करा. हे सर्व मिश्रण साधारण ३ वाट्या होईल. नंतर मध्यम आंचेवर कढई तापत ठेवा व त्यात २ चमचे तूप घालून त्यात खसखस, बदाम व काजू यांचे बारीक केलेले मिश्रण घाला व कालथ्याने थोडे परतून घ्या. नंतर मध्यम आचेवर दुसऱ्या कढईत साखर व साखर बुडेल इतके पाणी घ्या व त्याचा एक तारीहून थोडा जास्त कडक पाक करून परतलेले मिश्रण त्यात घाला व कालथ्याने ढवळत रहा. काही वेळाने हे मिश्रण घट्ट होईल व त्याचा एक गोळा तयार होईल. गॅस बंद करा व मिश्रण कालथ्याने थोडे घोटा.
पाक करायच्या आधी स्टीलच्या दोन ताटल्यांना साजूक तूपाचा हात लावून ठेवा. त्यावर हे गोळा झालेले मिश्रण घाला, एकसारखे पसरवा व लगेच वड्या पाडा. वड्या गार झाल्यावर डब्यात भरा. या वड्या थंडीसाठी उपयुक्त आहेत.
Monday, October 31, 2011
बदाम खीर

जिन्नस :
बदाम २२
साखर १० चमचे
साजूक तूप १ चमचा
दूध अडीच कप
मार्गदर्शन :
मिक्सरवर २ बदामांची सालासकट पूड करा. २० बदाम गरम पाण्यात भिजत घाला. एक तासानंतर बदाम सोला. नंतर मिक्सरवर सोललेल्या बदामाची बारीक पूड करा. मंद आंचेवर कढई तापत ठेवा. नंतर त्यात साजूक तूप व बदामाची बारीक केलेली पूड घाला व हे मिश्रण कालथ्याने परतून घ्या. नंतर त्यात दूध व साखर घालून ढवळत रहा. आता आंच मध्यम करा. दूध थोडे आटले की गॅस बंद करा. बदामाची खीर प्यायला देताना त्यावर थोडी सालासकट केलेली बदामाची पूड पेरून द्या. ही खीर चविष्ट व पौष्टिक आहे.
Thursday, September 01, 2011
खोबऱ्याची खिरापत
Thursday, August 18, 2011
दही पालक
जिन्नस :
चिरलेला पालक २ ते ३ वाट्या
दही मोठे २ चमचे/ ताक पाव ते अर्धी वाटी
मीठ चवीपुरते
साखर १ चमचा
डाळीचे पीठ १ चमचा
दाण्याचे कूट १ चमचा
तेल
मोहरी, हिंग, हळद फोडणीसाठी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
मिरच्यांचे तुकडे २-४
मार्गदर्शन : एका पातेल्यात चिरलेला पालक घाला व तो कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की पालक बाहेर काढा व डावेने नीट ढवळून घ्या. एकजीव करा. पालक एकजीव केल्यावर त्यामध्ये मिळून येण्याइतपतच डाळीचे पीठ व दही/ताक घाला.नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर , मीठ व दाण्याचे कूट घाला. सर्व मिश्रण डावेने एकजीव करा/ढवळून घ्या. नंतर मध्यम आचेवर एक पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीत हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून त्यावर पालकाचे तयार केलेले मिश्रण घालून नीट ढवळा. एक उकळी आली की गॅस बंद करा. ही पातळ भाजी गरम भाताबरोबर खूपच छान लागते.
Monday, August 15, 2011
Wednesday, August 10, 2011
रंगीत भात
जिन्नसः
अर्धी वाटी तांदुळाचा शिजवलेला भात (मोकळा शिजवलेला हवा)
प्लॉवर, श्रावणघेवडा, सिमला मिरची, मटार, गाजर, कांदा, बटाटा, टोमॅटो, भोपळा, वांगे, हिरवी मिरची १
फोडणीसाठी तेल
मोहरी, जिरे, हिंग, हळद
धनेजिरे पूड अर्धा चमचा
लाल तिखट अर्धा चमचा,
काळा मसाला अर्धा चमचा
मिरपूड २ चिमटी
मीठ चवीपुरते,
साखर अगदी चिमुटभर (चवीपुरती)
मार्गदर्शन : अर्धी वाटी तांदुळाचा भात शिजवून घ्या व तो गार झाला की अलगद हाताने मोकळा करून घ्या. हा भात शिजवताना पहिली शिट्टी होऊ द्यायची नाही. त्या आधीच गॅस बंद करा. भात शिजवण्याच्या आधी तांदुळ धुवून घ्या व रोळीत २ तास निथळत ठेवा म्हणजे भात मोकळा शिजण्यास मदत होते. वर दिलेल्या सर्व भाज्या मध्यम आकारात चिरा. कांदा, बटाटा उभे चिरा. कांदा व टोमॅटो फोडणीत शिजवण्या इतपतच घ्या. जास्त नको. सर्व भाज्या चिरल्यावर पाण्याने धुवून घ्या व रोळीत निथळत ठेवा. या सर्व भाज्या मिळून २ ते ३ वाट्या घ्या.
नंतर मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात आधी मिरचीचे तुकडे (उभे चिरलेले) घाला व नंतर कांदा व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर चिरलेल्या सर्व भाज्या घाला व शिजवा. शिजवताना त्यावर झाकण ठेवा व फोडणीवर या भाज्या शिजू देत. झाकण काढा व भाज्या कालथ्याने परतत रहा. या भाज्या शिजल्या तर पाहिजेत पण जास्त शिजायला नकोत. भाजी शिजवताना पाणी अजिबात घालू नये.
भाजी परतताना त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, काळा मसाला, मिरपूड , चवीपुरते मीठ व अगदी थोडी साखर घाला व भाजी सगळीकडून परतून व्यवस्थित ढवळा. नंतर त्यामध्ये मोकळा केलेला भात घाला व अलगद हाताने सर्व मिश्रण ढवळा. हा भात तिखट, चमचमीत छान लागतो. तोंडाला खूप छान चव येते. गरम गरम भाताबरोबर दही छान लागते. हा भात पार्टीसाठी पण करता येईल.
Tuesday, August 09, 2011
बटाटा कीस
जिन्नस :
बटाटे ३
लाल तिखट पाव चमचा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ५-६
जिरे पाव चमचा
तेल/तूप फोडणीसाठी
मीठ, साखर,
कोथिंबीर २-३ चमचे चिरलेली
खवलेला ओला नारळ २-३ चमचे
दाण्याचे कूट मूठभर
मार्गदर्शन : बटाटे धुवून घ्या व ते किसणीवर सालासकट किसा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात पुरेसे तेल/तूप घाला. ते तापले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात मिरच्यांचे तुकडे व किसलेला बटाट्याचा कीस घाला. थोडे परता. नंतर त्यावर झाकण ठेवा व काही सेकंदाने झाकण काढा व परता. असे २-३ वेळा करा म्हणजे बटाट्याचा कीस शिजेल. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ , थोडी साखर व दाण्याचे कूट घालून परत नीट ढवळा. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून त्यात चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालून परत एकदा नीट ढवळा. परत झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व गरम गरम कीस डीश मध्ये खायला घ्या. हा कीस खूपच चविष्ट लागतो. ही उपवासाची डीश आहे.
Wednesday, August 03, 2011
भोपळा खीर

जिन्नस:
लाल भोपळ्याचा कीस अडीच वाट्या
दूध ३ वाट्या
साजूक तूप ३-४ चमचे
साखर ८-१० चमचे
क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात साजूक तूप व किसलेला भोपळ्याचा कीस घाला व परता. झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परता. असे २-३ वेळा करा. वाफेवर किसलेला भोपळा शिजवून घ्या. हा भोपळा पटकन शिजतो. शिजवण्याकरता पाणी अजिबात घालू नये. नंतर त्यात दूध व साखर घाला व आटवा. आटवताना अधून मधून ढवळत रहा. ही एक भोपळ्याची चवदार खीर छान लागते. खीर दाट होईपर्यंत दूध आटवा. पटकन होणारी, चविष्ट व दाट खीर खूप छान लागते. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून ही एक खूप छान खीर आहे.
Subscribe to:
Posts (Atom)