Friday, August 31, 2018

बटाट्याचा चिवडा

जिन्नस
कडक उन्हात वाळवलेला बटाट्याचा कीस
तेल
लाल तिखट
मीठ
साखर
तळलेले दाणे

मार्गदर्शन : कढईत तेल घाला. ते तापले की त्यात वाळलेला बटाट्याचा कीस थोडा थोडा घालून तळा. नंतर तळलेला कीस पेपर टॉवेलवर घाला जेणेकरून जास्तीचे तेल निथळेल. आता दाणे तेलात घालून ते तळून त्यात घाला. गॅस बंद करा. हा तळलेला चिवडा ज्या पेपर टॉवेल वर घातला आहे तो पेपर टॉवेल काढून घ्या. नंतर त्यात चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि थोडी साखर घालून हा चिवडा हाताने मोडून काढा. हातानेच कालवा म्हणजे सर्व बाजून तिखट मीठाची चव लागेल. हा चिवडा मधवेळेला ऑफीस मधून आल्यावर
खायला उपयोगी पडतो. नंतर चहा हवाच.

उन्हाळ्याच्या दिवसात हा बटाट्याचा कीस भरपूर प्रमाणात वाळवून ठेवता येतो. नंतर केव्हाही तळून चिवडा
बनवता येतो.

मला हा वाळवलेला बटाट्याचा कीस इंडियन स्टोअर्स मध्ये मिळाला. हा चिवडा उपवासाला चालतो.

Saturday, August 11, 2018

काहीतरी वेगळे

आजपासून मी ठरवलं आहे ते म्हणजे शनिवारी मला कामावर ऑफ डे मिळाला तर काहीतरी स्पेशल करायचे. त्यामुळे दिवस वेगळा तर जातोच पण वेगळी चव असलेलं जेवण जेवलो की ताजेतवाने वाटते आणि उत्साह वाढीस लागतो.

तीळकूट
कोथिंबीर भजी
कढी ( कढीमध्ये कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो आणि कडिपत्ता घातला आहे.)
तोंडल्याची रस भाजी
मूगतूर डाळीचे धिरडे
आंब्याच्या फोडी
तांदुळाचे खिचे (तळून)




Saturday, February 25, 2017

खोबऱ्याची वडी आणि पेढा यांचे लग्न

अंगत पंगत या ग्रुपवर एकांनी गुलाबजाम आणि जिलबीचे लग्न लावले होते . ते वाचले आणि अशीच काही कल्पना करून मला लिहावेसे वाटले. ते मी इथे शेअर करत आहे.
मोदक आणि निवगरी यांची कन्या खोबऱ्याची वडी हिचा विवाह निश्चित झाला. माहीम हलवा आणि सुतरफेणी यांचा मुलगा मलई पेढा या तिघानांही मुलगी पसंद पडली. आम्हाला खूप साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे आणि हो अगदी फक्त सख्य्या नातेवाईकांनाच बोलवायचे असा दोघांचाही आग्रह होता. फक्त आमची भांवडेच आम्हाला हवीत. बाकी कोणीही नको. नाहीतर तुमचे रुसवे फुगवेच जास्त होतात. त्यांना तुम्ही वेगळे रिसेप्शन द्या. खोबऱ्याची वडी आणि पेढा पिढीजात श्रीमंत असल्याने दोघेही नोकरी करत नव्हते.खोबरी वडीचा नारळाच्या झाडांचा पिढीजात बिझिनेस होता तर पेढ्याचा मेवामिठाईचा पिढीजात बिझिनेस होता.
लग्नामध्ये जास्त बडेजाव नको. पक्वान्ने नकोत असे त्यांचे म्हणणे दोघांच्या आईवडिलांनी मान्य केले.
छोटेखानी मंडप मोदकाच्या घराच्या अंगणातच सजवला गेला. खोबऱ्याच्या वडीला बहीणी खूप होत्या. मामे, मावस, चुलत बहीणी. पेढ्याला मात्र फक्त ३ सख्य्या बहीणी होत्या. खोबऱ्याची वडी आणि पेढा यांनी एकत्र येऊन काय हवे आणि काय नको हे ठरवले आणि त्यांचे " शुभमंगल" झाले.
लग्नाच्या आधी एक दिवस मोदकाच्या घरासमोरचे अंगण तांदुळाच्या पिठीने सारवले गेले. त्या अंगणात साधेच परंतु खूप शोभिवंत सुरळीच्या वडीचे जाजम टाकण्यात आले. जाजमावर कोथिंबिरीची पाने होती. किसलेल्या ओल्या नारळाची छोटी पांढरी शुभ्र फुले होती. आणि छोट्या हिरव्यागार मिरच्यांची किनार होती. एकेक मंडळी लग्नाकरता सजली. खोबरी वडीची एक मानलेली बहिण काजूकतली तिच्या साडीवरच्या चांदीच्या वर्खाने खूप उठून दिसत होती. चुलत बहिणी अनुक्रमे गाजरवडी, भोपळ्याची वडी आणि टोमॅटो वडी यांनी ठरवून शेंदरी रंगाच्या पण थोडी शेड वेगळी असलेल्या साड्या परिधान केल्या होत्या. खोबरी वडीच्या मावसबहीणी अनुक्रमे कोथिंबीर वडी आणि अळू वडी यांनीही ठरवून एक रंग ठरवला आणि तो म्हणजे हिरवा. वेगवेगळ्या शेडच्या साड्या आणि त्यामध्ये विटकरी फिरता रंग होता. त्यामुळे या दोघी बहिणी सगळ्यांच्यात खास उठून दिसत होत्या.
पेढ्याच्या बहिणींनी मात्र भरजरी शालू नेसले होते. वराच्या बहीणी शोभायला नकोत का? पिस्ता बर्फीने तिच्या खास ठेवणीतला पिस्ता रंगाचा शालू नेसला की ज्याचा रंग सगळ्यांमध्ये शोभून दिसेल. आंबा बर्फी सगळ्यात धाकटी. तिने आंब्याच्या रंगाची खूप भारीतली साडी नेसायचे ठरवले होते. तिला शालूचा भपका तितका पसंत नव्हता. सगळ्यात मोठ्या मलई बर्फीने खास आपल्या भावाच्या लग्नानिमित्त क्रीम रंगाचा शालू खरेदी केला होता. त्यावर पिस्ता, बदाम, काजू यांचे अंगभर बुट्टे होते.
खोबरी वडीला अजिबात सजायचे नव्हते. पण सगळ्यांचा आग्रह पडला की निदान यादिवशी तरी तिने थोडेसे नटावे. म्हणून मग तिने थोडासा पिवळसर रंग आणि त्यावर किसलेले बदाम काजू पिस्ते व चारोळ्यांची नक्षी असलेली साडी तिच्या पसंतीने घेतली. या साडीला केशराची किनारपट्टी होती. पेढ्यानेही त्याचा पिवळ्या रंगाचा खानदानी झब्बा घातला आणि बोटात पिस्ते, काजू आणि बदामाच्या अंगठ्या घातल्या.
खोबरी वडीच्या मामेबहिणी अनुक्रमे खसखस वडी, आले वडी यांनी पण आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी फिकट चॉकलेटी रंगाचे पंजाबी सुट घातले होते. असे केल्याने मंडपात बहिणी बहिंणीमध्ये थोडी कुजबुज सुरू झाली. आपण सगळ्यांच्यात उठून दिसावे म्हणून नेहमीच या दोघीजणी काही ना काही करत असतात. पण आज लग्नाच्या दिवशी तरी त्यांनी असे करायला नको होते. ही कुजबूज आले वडीच्या कानावर आली आणि ती फणकारली आणि म्हणाली घरातच तर साध्या पद्धतीने लग्न आहे मग कशाला एवढा दिमाख दाखवायचा. मोदकाने आणि निवगरीने मात्र त्या दोघींना सांभाळून घेतले.
खोबरी वडी व पेढा यांनि गुरूजींना बोलवायचे नाही. घरीच तुम्ही सर्वांनी मिळून मंगलाष्टके म्हणा आणि आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घालू असे सांगितले होते. त्यामुळे एक माहेरचे आणि एक सासरचे मंगलाष्टक् म्हणले. बारीक शेवयांनी विणलेला आंतर्पाट होता तो आंबा बर्फी आणि काजूकतली या दोघींनी मिळून धरला होता. मंगलाष्टक झाल्यावर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात रंगीबेरंगी हलव्याच्या माळा घातल्या. पेढ्याने खोबरी वडीच्या गळ्यात मनुकांचे मंगळसूत्र घातले आणि टुटीफ्रुटीच्या लाल रंगाचे कुंकू लावले. बडीशेपेच्या रंगीबेरंगी छोट्या गोळ्यांच्या अक्षता होत्या.
त्या दोघांना बाकीचे सोपस्कार म्हणजे लाजा होम, सप्तपदी असे काहीही नको होते लग्नानंतर जेवणाची तयारी झाली. पाटवड्यांचे पाट मांडण्यात आले. त्यापुढे ढोकळ्याचे चौरंग मांडले. त्यावर बत्ताशाचे ताट मांडले गेले. सगळे जण पाटावर बसले आणि त्या दोघांच्या आईवडिलांनी सगळ्यांना आग्रह करून वाढले. जेवणामध्ये फळफळावळ, उसळी, आंबट गोड भाज्या, सलाड, फुलके, भाकऱ्या आणि स्वीट डीश म्हणून साखरभात आणि नारळीभाताच्या मुदी. हा जेवणाचा बेत नवरानवरीनेच ठरवला होता.
लग्न साध्या पद्धतीने तरी पण थाटामाटात पार पडले. रितीरिवाजाप्रमाणे खरे तर खोबरीवडीने पेढ्याच्या घरी जायला पाहिजे पण पेढा जायला निघाला खोबरीवडीच्या घरी. हे गुपीत मात्र दोघांनीही लपवून ठेवले होते. लग्न झाले की सांगायचे असे ठरवले होते. पेढा खोबरी वडीच्या घरी जायला निघतोय हे माहिम हलवा आणि सुतरफेणीला अजिबात पसंत नव्ह्ते. पण पेढा म्हणाला आईबाबा मी काही कायमचा चाललेलो नाहिये. काही महिने मी त्यांच्याकडे राहणार आणि काही महिने ती आपल्याकडे येऊन राहणार आहे. असे आमच्या दोघांच्या मतांनी आम्ही लग्ना आधी फिरायला जायचो तेव्हाच ठरवले आहे. निदान काही महिने तरी खोबरी वडी आपल्याकडे राहील या सांगण्यावर ते तयार झाले खरे पण त्यांना ते तितके पटलेले दिसत नव्हते. खोबरी वडी म्हणाली की तुम्ही काही काळजी करू नका मी नक्किच तुमच्याकडे रहायला येणार आहे. आम्ही दोघांनी ठरवले आहे की वर्षातले काही महिने मी तिकडे व तो इकडे राहील आणि असाच आमचा संसार सुरू राहील म्हणजे आमच्या घरात पेढाही रूळेल आणि मी तर तुमचीच आहे की !
आपली मुलगी साधी आणि आधुनिक विचारांची आहेच पण आपल्याला जावई पण साधाआणि आधुनिक विचारांचा मिळाला आहे हे पाहून मोदक आणि निवगरी खूप सुखावले गेले.

Tuesday, December 29, 2015

ढोकळा



जिन्नस :

१ वाटी हरबरा डाळीचे पीठ
१ चमचा किसलेले आलं
१ चमचा किसलेला लसूण
अर्धा चमचा साखर
२ चमचे लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
पाव ते अर्धा चमचा इनो
१ चमचा तेल
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर



मार्गदर्शन :डाळीच्या पीठ एका वाडग्यात काढून घ्या. त्यात पाणी घालून कालवा. कालवताना त्यात पीठाची एकही गुठळी राहता कामा नये. नंतर त्यात किसलेले आले, लसूण घाला. नंतर त्यामध्ये लिंबाचा रस, साखर व चवीपुरते मीठ घाला. अजून थोडे पाणी घालून सर्व मिश्रण  एकजीव करा. नंतर त्यात तेल घाला व परत एकदा थोडे पाणी घालून ढवळून घ्या. हे मिश्रण इडलीच्या पीठाइतपत पातळ हवे. आता हे मिश्रण झाकून ठेवा व अर्ध्या तासाने याचा ढोकळा बनवायला घ्या. कूकरमध्ये पाणी घालून कूकर मध्यम आचेवर तापत ठेवा. तयार केलेले डाळीच्या मिश्रणात इनो घाला व ढवळा आणि हे मिश्रण कूकरमधल्या एका भांड्यात ओता. त्या आधी कूकरच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता हे  भांडे कूकरमध्ये ठेवा व झाकण लावा. झाकण लावताना त्याची शिटी काढून घ्या. २० मिनिटांनी गॅस बंद करा. मिश्रण गार झाले  की त्याच्या वड्या कापा आणि त्यावर फोडणी करून घाला. सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर पेरावी. हलकाफुलका ढोकळा तयार झाला आहे. आफीसमधून दमून आल्यावर झटपट काहीतरी खायला बनवण्यासाठी हा ढोकळा छान आहे. चहासोबत ढोकळा खायला घ्या. दमलेला जीव फ्रेश होईल.

Thursday, August 13, 2015

मसाला पापड



उडदाचा पापड तळावा. एका डिशमध्ये उडदाचा पापड ठेवा. त्यावर कांदा व टोमॅटो बारीक चिरून घाला. नंतर त्यात चिमूटभर लाल तिखट, धनेजिरे पूड, व चवीपुरते मीठ पेरा. कोथिंबीर बारीक चिरून घाला. चिमूटभर साखरही पेरा. अजून तुम्हाला ज्याप्रमाणे अधिक सजवायचे असेल त्याप्रमाणे पापड सजवा.


उदा. पापडावर बारीक शेव पेरता येईल. तसेच ताजा ओला नारळही पेरता येईल.   जेवणाच्या आधी हा पापड खाल्यास नंतरचे जेवण अधिक रूचकर लागेल. खूप कंटाळवाणे झाले असेल तर असा सजवलेला पापड खाल्यावर उत्साह येईल.



Tuesday, March 10, 2015

मसाला वांगी


जिन्नस :

बारीक चिरलेली वांगी ३ वाट्या
मध्यम चिरलेला कांदा पाऊण वाटी
मध्यम चिरलेला टोमॅटो पाऊण वाटी
पाउण चमचा लाल तिखट
पाऊण चमचा धनेजिरे पूड
पाऊण चमचा गरम मसाला
चवीपुरते मीठ
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद
दाण्याचे कूट मूठभर
सजावटीसाठी कोथिंबीर
अर्धा चमचा साखर



मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घाला.  ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेले वांगी, टोमॅटो व कांदा घाला व भाजी ढवळा. आता कढईवर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत एकदा भाजी ढवळा. आता अगदी जरूरीपुरतेच थोडेसेच पाणी घाला व परत झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत म्हणजे वांगी चांगली शिजतील. आता त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ  व दाण्याचे कूट घाला. परत एकदा भाजी ढवळून घ्या. तेल कमी वाटले तर परत घाला. नंतर परत काही सेकंदाची वाफ द्या. आता अर्धा चमचा साखर पेरून भाजी ढवळा. भाजी बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर पेरा. ही भाजी खूप चविष्ट लागते. या भाजीवर तेलाचा चांगला तवंग आला पाहिजे हे विषेश आहे. तरच ही भाजी चांगली लागते.

Friday, March 06, 2015

थालिपीठाच्या भाजणीचे घावन


जिन्नस
  • थालिपीठाची भाजणी २ ते ३ मूठी
  • लाल तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ
  • अर्धा कांदा बारीक चिरलेला
  • पीठ भिजवण्यासाठी पाणी
  • तेल
 मार्गदर्शन:

 वरील सर्व मिश्रण एकत्र करा व पीठ भिजवा. हे पीठ खूप पातळ भिजवा. गॅसवर तवा तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यावर चमच्याने थोडे तेल टाकून तवाभर पसरवा. नंतर डावेने भिजवलेले पीठ तवाभर  घाला. काही सेकंदाने त्यावर थोडे तेल टाका. शिवाय घावनाच्या कडेनेही तेल टाका. काही सेकंदाने  कालथ्याने घावन सोडवून मग ते उलटवावे. व नंतर परत थोडे तेल घाला व काही सेकंदाने घावन तव्यावरून काढा.

Sunday, February 22, 2015

पालक- मूगडाळ


जिन्नस :
चिरलेला पालक ४ मुठी
एक मध्यम बटाटा
अर्धा कांदा
अर्धा टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
लाल तिखट पाऊण चमचा
धनेजिरे पूड पाऊण चमचा
चवीनुसार मीठ
मूगडाळ अर्धी वाटी
फोडणी साठी तेल
मोहरी, हिंग. हळद


मार्गदर्शन : चिरलेला पालक पाण्याने धुवून रोळीमध्ये निथळत ठेवा. पाणी सर्व निघून गेले पाहिजे. मुगाची डाळ २ तास भिजत घाला. २ तासानंतर भाजी करायला घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग , हळद घालून फोडणी करा. त्यात आधी मुगाची डाळ घालून परता व त्याला थोडी वाफ द्या. नंतर त्यात चिरलेली मिरची, लसूण, कांदा, घालून थोडे परता. नंतर त्यात चिरलेला बटाटा, टोमॅटो घालून थोडे परता. आता या मिश्रणावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व परत मिश्रण नीट परता. आता त्यात चिरलेला पालक घाला व परता. झाकण ठेवा व एक दणदणीत वाफ द्या. परत झाकण काढून त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. अजून एक वाफ द्यावी. नंतर परतून भाजी सर्व बाजूने एकसारखी करून घ्यावी. पोळी बरोबर खायला द्या. ही भाजी चवीला खूप छान लागते.


Thursday, December 11, 2014

सणाला सजवलेली ताटे








ही सर्व ताटे नैवेद्याची आहेत. वर्षभरातील सणांना सजवलेली आहेत. सण आहेत दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, श्रावणी शुक्रवार.

Wednesday, August 06, 2014

तुरीच्या डाळीचे वडे



जिन्नस :
तुरीची डाळ २ वाट्या
तांदुळ २ चमचे
आले एक छोटा तुकडा
कडिपत्ता १० ते १२ पाने
अगदी थोडी हळद
मीठ

मार्गदर्शन : तुरीची डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजत घाला. नंतर मिक्सर - ग्राइंडर वर वाटा. वाटतानाच त्यात आल्याचे तुकडे घाला. वाटताना जरूरीपुरतेच पाणी घालावे व डाळ भरड वाटावी. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून त्यात चवीप्रमाणे मीठ व थोडी हळद घाला व कडिपत्याची पाने हातानेच अर्धी करून घाला. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात वडे चांगले तळले जातील इतपत तेल घाला व ते तापले की त्यात वडे घालावेत व खरपूस रंग येईपर्यंत तळावेत. कडीपत्ता वर दिसला पाहिजे इतका घाला. या वड्यात आल्याची व कडिपत्याचीच चव आहे.



 ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे. २००३ साली आम्ही ज्या शहरात राहत होतो तेव्हा माझ्या शेजारणीने हे वडे मला खायला दिले होते. तेव्हा आमची भारतासारखी पदार्थांची देवाणघेवाण चालायची. मी तिला बटाटेवडे दिले होते व तिने मला हे वडे ! त्याच वेळेला तिला रेसिपी विचारली होती पण मुहूर्त आज लागला.

Saturday, March 22, 2014

प्रसादाचा शिरा



जाड रवा १ वाटी
दीड वाटी दूध
अर्धी / पाऊण वाटी पाणी
१ वाटी साखर
केळ्याच्या चकत्या ५ ते ६
केशर ४ ते ५ काड्या
अर्धी वाटी साजूक तूप

मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात रवा व साजूक तूप घालून कालथ्याने परतायला सुरवात करा. रवा परतून थोडा रंग बदलायला लागेल. मग त्यात केळ्याच्या चकत्या घाला व अजून थोडे परता. रवा व केळ्याचे काप खमंग परतावेत. नंतर त्यात गरम करून थोडे कोमट झालेले दूध  व पाणी घाला. केशर गरम करून ते चुरडून दुधात घाला म्हणजे त्याचा रंग दूघात उतरेल आणि ते दूधही घाला. रवा कालथ्याने भराभर ढवळा त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. आता झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत रवा ढवळून घ्या. आता साखर घाला व परत एकदा ढवळा. आता परत थोडे हे मिश्रण पातळ होईल. आता परत झाकण ठेवा. म्हणजे शिरा चांगला शिजेल व साखरेशी एकरूप होईल. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. गॅस बंद करा. हा शिरा चवीला खूप छान लागतो.

Tuesday, March 18, 2014

भाज्यांचे कसेडिया



 जिन्नस :
ब्रोकोली, पालक, कांद्याची पात, सिमला मिरची, झुकिनी स्वॅश, बटाटा, गाजर, टोमॅटो,
कांदा, लसूण, आले
किसलेले चीझ
टोमॅटो केचप
तेल अथवा लोणी
मिरपूड
मीठ
टॉर्टिया
बारीक चिरलेले लेट्युस, कांदा, टोमॅटो व कोथिंबीर

 मार्गदर्शन : वरील सर्व भाज्या बारीक चिरा.


 कांद्याची पात यातील खालचा भाग चिरून घ्यावा. हिरवी पात घेऊ नये कारण ती पटकन शिजत नाही व दातात येते. या सर्व चिरलेल्या भाज्या साधारण ४ ते ५ वाट्या होतील इतक्या चिरा. वर दिलेल्या भाज्यांपैकी तुम्हाला आवडतील तशा कमीजास्त प्रमाण घ्या अथवा अजून तुमच्या काही आवडीच्या भाज्या असतील त्या घेतल्या तरी चालतील. फक्त या भाज्या बारीक चिराव्या म्हणजे कमी तेलावर पटकन शिजतील. अर्थात या सर्व भाज्या थोड्या अर्धवट शिजलेल्याच ठेवायच्या आहेत. मध्यम आचेवर पसरट पातेले ठेवा व त्यात लोणी अथवा तेल घाला. भाज्या कोरड्या राहणार नाहीत पण शिजल्या पाहिजेत इतकेच तेल किंवा लोणी घाला. जास्त नको. तेल तापले/लोणी विरघळले की त्यात आधी बारीक चिरलेला थोडा कांदा व आले लसूण मिरच्यांची पेस्ट/पेस्ट नसेल तर खूप बारीक चिरून परता. नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून कालथ्याने ढवळत रहा. बारीक चिरल्याने भाज्या पटकन शिजतात. आता गॅस बंद करा व त्यात मिरपूड व चवीपुरते मीठ घाला.


 थोड्या वेळाने  गॅसवर तवा ठेवा व मध्यम आचेवर लोणी अथवा तेल घालून टॉर्टिया दोन्ही बाजूने  भाजून घ्या. भाजताना त्यावर कालथ्याने थोडे प्रेस करा. टॉर्टिया फुगून येतील. आता गॅस खूप मंद ठेवा. टॉर्टियाच्या अर्ध्या भागावर केलेली भाजी पसरवून घ्या व त्यावर किसलेले चीझही पसरवून घ्या. आता उरलेली अर्धी पोळी त्यावर दुमडून ठेवा. आणि कालथ्याने प्रेस करा. आता परत थोडे तेल किंवा लोणी घालून दोन्ही बाजूने टॉर्टिया खरपूस भाजून घ्या. हा खरपूस भाजलेला टॉर्टिया एका ताटलीत काढा व त्याचे सुरीने दोन भाग करा.

एका छान डिशमध्ये दोन भाग केलेला टॉर्टिया घालून  त्यावर थोडे टोमॅटो केचप घालून व चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्या. थोडे किसलेले चीझही घाला. सोबत लेट्युस व बारीक कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या. ही एक पटकन होणारी डिश आहे.

Tuesday, March 11, 2014

नाचणी लाडू


जिन्नस :
नाचणीचे पीठ दीड वाटी
एक वाटी साखर (ग्रॅन्युलेटेड शुगर अथवा पीठीसाखर)
५ ते ६  चमचे साजूक तूप
अर्धी वाटी दाण्याचे कूट
अर्धी वाटी बदामाची पूड

मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की लगेच त्यात साजूक तूप व नाचणीचे पीठ घाला व कालथ्याने ढवळायला लागा. तूप जर कमी पडत असेल तर अजून थोडे घाला. नाचणीचे पीठ तूपात पूर्णपणे बुडायला हवे. आता आच कमी करा व नाचणीचे पीठ कालथ्याने सतत ढवळून भाजा (जसे बेसन पीठ भाजतो तसेच) ते भाजून होत आले की त्यात दाण्याचे कूट व बदामाची पावडर घालून अजून थोडे परतावे. आता गॅस बंद करा  व साखर घाला आणि ढवळा. किंवा मिश्रण कोमट असताना साखर घातली तरी चालेल. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळा. हे लाडू पौष्टिक आहेत. चवीलाही छान लागतात.  या मिश्रणाचे १५ लाडू होतील.

Thursday, February 13, 2014

टोमॅटो वडी


जिन्नस :

लाल टोमॅटो २ कच्चे अथवा उकडून (साले काढावीत)
एक मध्यम उकडलेला बटाटा
अर्धी वाटी नारळाचा खव
साखर पावणे दोन वाट्या
दूध अगदी थोडे
साजूक तूप २ चमचे
रिकोटा चीझ २ ते ३ चमचे




मार्गदर्शन : उकडलेला बटाटा,  टोमॅटो आणि नारळाचा खव मिक्सर मधून बारीक करून घ्या. एका कढईत २ चमचे साजूक तूप घालून ती कढई मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण थोडे परतून घ्या. त्यात अगदी थोडे दूध घाला. नंतर अजून थोडे परता. आता हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. याच कढईत किंवा पातेल्यात साखर घाला व साखर बुडेल इतके पाणी घाला आणि कालथ्याने ढवळत राहा. एक तारी पाक बनला की लगेचच परतलेले मिश्रण घालून ढवळत राहा.  आता हे मिश्रण चांगले उकळेल व आटायला लागेल. नंतर यात रिकोटा चीझ घाला व परत ढवळत रहा.  काही वेळाने या मिश्रणाचा गोळा बनायला लागेल व हा गोळा थोडा कोरडा पडायला सुरवात होईल. आता गॅस बंद करा. ताटलीला साजूक तूपाचा हात लावून घ्या व हे गरम मिश्रण त्यावर ओता व सर्व बाजून थापा. थापताना वाटीचा वापर करा. वाटीच्या बाहेरच्या तळाला साजूक तूप लावा व ही वाटी त्या गरम मिश्रणावर एकसारखी फिरवा म्हणजेच हे सारण ताटलीभर पसरवा. कोमट असताना वड्या पाडा. टोमॅटोने या वडीला छान रंग येतो.


बटाटा टोमॅटो आणि नारळाचा खव हे सर्व मिक्सर मध्ये वाटून केलेले मिश्रण जर १ वाटी तयार झाले तर पावणे दोन वाट्या साखर पाकाकरता घ्यावी.

Friday, November 22, 2013

खरवस



जिन्नस :
  • चिकाचे दूध १ कप
  • दूध पाऊण कप
  • साखर साधारण १ कप
  • वेलची पूड, केशर


चिकाचे दूध , दूध , साखर, वेलची व केशर सर्व एका भांड्यात एकत्र करा व ढवळा. साखर विरघळली पाहिजे. नंतर कुकर मध्ये कुकराची ताटली बुडेल इतके पाणी घाला व सर्व एकत्रित केलेले मिश्रणाचे भांडे कुकरामध्ये ठेवा व त्यावर झाकण ठेवा. नंतर कुकराचे झाकण लावून शिटी काढा. अर्धा तास मंद आचेवर हे मिश्रण शिजू देत. आता गॅस बंद करा. कुकर गार झाला की मिश्रणाचे भांडे बाहेर काढा. खूप गार झाल्यावर वड्या पाडा. वड्या खाऊन जर उरल्या तर त्या शीतकपाटात ठेवा.

साखरेचे प्रमाण साधारण एक कप  असे दिले आहे तरी प्रथम अर्धा कप  साखर घालून ढवळून मग चव पाहावी. व नंतर परत आवडीप्रमाणे साखर घालावी. खरवस  अगोड  चांगला लागत नाही. चिकाचे दूध पहिल्या दिवशीचे असेल तर दूध पाऊण प्रमाणात घ्यावे . चीक दुसऱ्या दिवशीचा असेल तर चिकाच्या दुधाच्या निम्मे साधे दूध घ्यावे. पहिल्या दिवशीच्या चिकाच्या वड्या छान पडतात. गूळ घालणार असाल तर जायफळ घालावे.

Friday, June 28, 2013

बिस्कीटे



जिन्नस

  • गव्हाचे पीठ अर्धी वाटी, मैदा व हरबरा डाळीचे पीठ मिळून अर्धी वाटी
  • लोणी पाऊण वाटी, ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर मिळून अर्धी वाटी
  • २ चिमूट बेकींग सोडा
  • साजूक तूप ट्रे बेकींग ट्रे ला लावण्यापुरते

 
वरील सर्व मिश्रण एका वाडग्यात एकत्र करा व हाताने मळून घ्या. पिठाच्या गुठळ्या रहायला नकोत. नंतर हे मिश्रण झाकून ठेवा. २० मिनिटे हे मिश्रण झाकले गेले पाहिजे. नंतर बेकींग ट्रे ला तूपाचा हात लावून घ्या. मुरवलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करा व त्यावर काट्या चमच्यामधल्या काट्याने अलगद हाताने चेपा. ट्रे मध्ये हे सर्व गोळे काही अंतर राखून ठेवा. ओव्हन २५० डिग्री फॅरनहाईट वर ठेवून ट्रे त्यात ठेवा. ३० ते ३५ मिनिटे भाजून घ्या. बिस्कीटे तयार होतील. ओव्हन बंद करा. काही वेळाने ट्रे बाहेर काढून सर्व बिस्कीटे एका ताटात गार करायला ठेवा. पूर्ण गार झाली की डब्यात भरून ठेवा.


वरील मिश्रणात ३५ बिस्कीटे होतात. वर जे मिश्रण दिले आहे त्यामध्ये ग्रॅन्युलेटेड शुगर जास्त व बाकीची ब्राऊन शुगर थोडी घालावी. शिवाय मैदा जास्त व बाकीचे डाळीचे पीठ कमी घ्या. वरील सर्व मिश्रणाचा एकत्रित मळून जो गोळा तयार होतो तो सैलसर कणकेसारखा झाला पाहिजे. लोण्याचे प्रमाण दिले आहे तर ते थोडे कमी जास्त घालावे म्हणजे गोळा सैलसर होण्याइतपत घालावे.

Tuesday, June 18, 2013

कणीक भिजवणे


जिन्नस :
गव्हाचे पीठ ४ वाट्या
पाणी २ वाट्या
गोडतेल मोठाले ५ ते ६ चमचे
पाऊण चमचा मीठ


मार्गदर्शन : एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून कणीक ओली करा. कणीक ओली करताना एकीकडे चमच्याने सगळ्या बाजूने ढवळत रहा. ४ वाट्या कणकेसाठी २ वाट्या पाणी लागते. आता ही ओली झालेली  कणीक अजूनही थोडीफार कोरडीच असेल. नंतर एक चमचा तेल हातावर घ्या आणि ओली झालेली  कणीक हातानेच एकसारखी करून मळून घ्या व त्याचा गोळा बनवा. हा कणकेचा गोळा बनवताना अजूनही कणकेच्या गोळ्याच्या आजुबाजूला थोडे गव्हाचे पीठ कोरडे राहिलेले दिसेल. त्यात अगदी थोडे पाणी घालून तेही त्या गोळ्यात मिक्स करा. कणकेचा गोळा मळताना एकेक चमचा हातावर तेल घेत राहा व गोळा मळत रहा. आता हा मळलेला कणकेचा गोळा अर्धा तास मुरवत ठेवा. कणकेच्या गोळ्यावर झाकण ठेवा. अर्ध्या तासानंतर परत थोडे हातावर तेल घालून कणकेचा गोळा मळा. आता तुम्हाला कणीक नितळ दिसायला लागेल. नितळ झालेल्या कणकेच्या पोळ्या बनवा.

Monday, June 17, 2013

एम आणि एम कुकीज


जिन्नस :

अर्धी वाटी बटर (मीठविरहीत)
अर्धी वाटी (ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर) यामध्ये ब्राऊन शुगर पाव वाटीपेक्षा जास्त आणि बाकीची ग्रॅन्युलेटेड शुगर
१ वाटी मैदा किंवा ऑल परपज फ्लोअर आणि हरबरा डाळीचे पीठ (यामध्ये मैदा पाऊण वाटीपेक्षा जास्त आणि बाकीचे डाळीचे पीठ)
 २ चिमटी बेकींग सोडा
एम आणि एम ची चॉकलेट १ छोटे पाकीट (४७.९ ग्रॅम)


मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व मळून घ्या. चॉकलेट सर्वात शेवटी टाकून अजून थोडे मळून घ्या. २० मिनिटे हे मिश्रण तसेच झाकण ठेवून ठेवा. नंतर त्याचे एकसारखे गोळे करून थोड्या थोड्या अंतरावर बेकींग ट्रे मध्ये ठेवा. नंतर ३५० डिग्री फॅरनहाईटवर २५ मिनिटे कुकीज भाजून घ्या. कूकीज गार झाल्या की डब्यात भरून ठेवा. वरील मिश्रणात १५ कुकीज होतात.
बटर फ्रीजमधून काढून नेहमीच्या तापमानाला येऊ देत.

Tuesday, June 04, 2013

नानकटाई

 

जिन्नस :

१ वाटी मैदा किंवा ऑल परपज फ्लोअर
अर्धी वाटी मीठविरहीत बटर
अर्धी वाटी ग्रॅन्युलेटेड साखर
२ चिमटी बेकींग सोडा
ट्रे ला लावायला थोडेसे साजूक तूप

मार्गदर्शन : वरील सर्व मिश्रण एका भांड्यात घाला व हाताने एकजीव करा.  बटर मिक्स करायच्या आधी फ्रीजमधून काढा व ते नेहमीच्या तापमानाला येऊ देत. भिजवलेल्या मिश्रणावर झाकण ठेवा. २० मिनिटानंतर परत एकदा भिजवलेले मिश्रण मळून घ्या व त्याचे एकसारखे ११ गोळे बनवा व ते हाताने गोल गोल करून घ्या व कूकी ट्रेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. कूकीज ३०० फॅरनहाईट डीग्रीवर ३० मिनिटे ओव्हनमध्ये भाजून काढा. ट्रे ओव्हनमध्ये मधोमध ठेवा. वरील मिश्रणात ११ नानकटाई होतात.