Monday, July 09, 2007

सँडविच (१)








वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

ब्रेडचे स्लाइस १६ विब्स किंवा ग्रेट व्हॅल्युचा व्हाईट ब्रेड स्प्लीट टॉप
लाल टोमॅटोच्या चकत्या ३०-३५, हिरवी चटणी वाडगाभर
उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या ३०-३५, मीठ चवीनुसार
काकडीच्या चकत्या ३०-३५, बटर/साजुक तूप,
कांद्याच्या चकत्या ३०-३५, मिरपूड १ चमचा
टोमॅटो केचप, धारदार सुरी

क्रमवार मार्गदर्शन: हे सँडविच बनवताना धारदार सुरी आवश्यक आहे. ओला नारळ, १-२ मिरच्या, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून सौम्य चटणी करणे. या चटणीमधे कोथिंबीर जास्त घालणे. चटणी हिरवी दिसायला हवी. नंतर सर्व स्लाइसच्या सर्व कडा सुरीने काढणे. नंतर एका स्लाइसला बटर/साजुक तूप पसरवून लावणे. दुसऱ्या स्लाइसला चटणी पसरवून लावणे. उकडलेला बटाटा, टोमॅटो, कांदा व काकडी याच्या धारदार सुरीने अतिशय पातळ चकत्या करून घेणे. नंतर ज्या स्लाइसवर चटणी लावली असेल त्यावर प्रत्येकाच्या २-३ चकत्या लावून त्यावर थोडीशी मिरपूड व चवीपुरते मीठ घालणे. नंतर त्यावर बटर/साजुक तूप लावलेला स्लाइस ठेवून थोडासा हाताने दाब देणे. आता या तयार झालेल्या सँडविचचे धारदार सुरीने चार भाग करणे. नंतर अलगद हाताने हे चारही भाग एका ताटलीत घालून त्यावर टोमॅटो केचप घालून खायला देणे.

२ स्लाइसचे मिळून एक, असे ४ सँडविच एकाचे एका वेळचे पोटभर जेवण होते.

माहितीचा स्रोत:बहीण सौ रंजना जेरे

अधिक टीपा:सँडविच खाल्यावर त्यावर ज्युस/आइस्क्रीम/आंबा किंवा खजूर-बदाम-काजु मिल्क शेक जे आवडेल ते घेणे. आवडत असल्यास सँडविचवर किसलेले चीझ घालणे.

Friday, May 25, 2007

पातळ पोह्यांचा चिवडा



वाढणी:२ जण (८-१० दिवस पूरेल इतका)

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे


पाककृतीचे जिन्नस:
पातळ पोहे १० वाट्या
डाळं १ वाटी,
भाजलेले शेंगदाणे १ वाटी
गोटा खोबऱ्याच्या खूप पातळ चकत्या १ वाटी
हिरव्या मिरच्या ४-५, कढिपत्ता १०-१५ पाने
धनेजीरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, पिठीसाखर २ चमचे
मीठ चवीनुसार, तेल १ वाटी, मोहरी,हिंग,जिरे, हळद फोडणीसाठी


क्रमवार मार्गदर्शन: सर्वात आधी चाळणीने पोहे चाळून ते निवडून घेणे. नंतर मध्यम आचेवर कढई ठेवून ती तापली की त्यात साधारण अर्धी कढई मावतील इतके पोहे घालून सतत ढवळणे. ढवळल्यावर काही वेळाने पोहे दुमडले जातील आणि कुरकुरीत होतील. पोहे कुरकुरीत झाले की नाही हे बघण्याकरता हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे कुरकुरीत झाले असे समजावे. अशा रितीने सर्व पोहे कुरकुरीत भाजून घेणे. भाजलेले पोहे एका परातीत ठेवणे.



पोहे भाजून झाल्यावर मोठ्या कढईत एक वाटी तेल घालून त्यात नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जास्त मोहरी, जिरे, हिंग हळद व अर्धा चमचा तिखट घालून लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतणे. हिरव्या मिरच्यांच्या रंग बदलला की लगेच दाणे घालणे व परतणे. दाण्याचा रंग बदलला(थोडा तांबुस झाला की) की डाळं घालणे व परतणे. डाळ्याचा रंग बदलला (तांबुस) की कढिपत्ता घालून परतणे. कढिपत्त्याचा रंग बदलला की सर्वात शेवटी अतिशय पातळ केलेल्या गोटा खोबऱ्याच्या चकत्या घालून परत परतणे. खोबऱ्याचा काळपट चॉकलेटी रंग झाला की मग त्यात भाजलेले सर्व पोहे घालून पटापट ढवळणे. नंतर गॅस थोडा बारीक करून त्यात अर्धा चमचा लाल तिखट, धनेजीरे पूड, साखर व चवीनुसार मीठ घालून पटापट ढवळणे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते. नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद करून ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून कलता ठेवणे. चिवडा एकदम गार झाला की डब्यात भरून घट्ट झाकण लावणे. जी वाटी पोहे घेण्याकरता वापरली तीच वाटी इतर साहित्य घेण्यासाठी वापरणे.

ह्याच पद्धतीने ५-१० किलोचा चिवडा पण करता येतो. पोहे भाजण्याची पद्धत हीच. पोहे बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे ते भाजल्यावर वर्तमानपत्रावर काढून ठेवणे. नंतर फोडणी न करता दाणे, डाळं ..... इत्यादी तेलात हिंग व हळद घालून वेगवेगळे परतून त्या पसरलेल्या पोह्यांवर ओतणे व लगेच ढवळणे. म्हणजे एकदा फक्त दाणे, एकदा मिरच्या, एकदा खोबरे असे क्रमाक्रमाने. पोहे ढवळताना थोडे मीठ व साखर पण घालणे. हे सर्व झाले की मोठ्या कढईत वेगळी तेलाची फोडणी (मोहरी, हिंग, जीरे, लाल तिखट ) करून त्या कढईत मावतील इतके पोह्यांचे तयार झालेले मिश्रण घालून मीठ, साखर, धनेजीरे घालून ढवळणे. ह्याप्रमाणे थोडा थोडा करून तयार झालेला चिवडा परत दुसऱ्या वर्तमानपत्रावर ओतून चव बघणे. जे कमी असेल ते (फोडणी सुद्धा कमी वाटली तरी ती सुद्धा ) त्याप्रमाणे सर्व घालून परत ढवळणे. या पद्धतीने लग्नकार्यात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी घरी केलेला चिवडा व (लाडूही) भरपूर प्रमाणात व चांगल्या चवीचा करता येतो.


रोहिणी
माहितीचा स्रोत:सौ आई

Thursday, May 17, 2007

डाळं लाडू



पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

डाळं ३ वाट्या पीठ होईल इतके
पीठीसाखर दीड वाटी
साजूक तूप १० चमचे

क्रमवार मार्गदर्शन: ३ वाट्या पीठ होईल इतके डाळं घेणे. मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करून घेणे. नंतर त्यात साजूक तूप व साखर घालून हाताने/चमच्याने एकसारखे ढवळून मग त्याचे लाडू वळणे. ३ वाट्यांमधे साधारण १२ ते १५ लाडू होतात. वर साखरेचे व तुपाचे प्रमाण दिले असले तरीही साखरेचे प्रमाण ज्याप्रमाणात गोड आवडते त्या प्रमाणात. आणि तूपही लाडू वळतील इतपत घालणे. जी वाटी पीठाचे प्रमाण घ्यायला वापरतो तीच साखर घ्यायला वापरणे.
डाळं म्हणजे आपण जे चिवड्यात घालतो ते आहे.

Wednesday, April 11, 2007

शंकरपाळे


वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

अर्धी वाटी साजुक तूप,
अर्धी वाटी साखर,
अर्धी वाटी दूध
तळणीसाठी तेल किंवा तूप
२ वाट्या मैदा अथवा
unbleached all purpose flour (king arthur)


क्रमवार मार्गदर्शन:

दूध, साखर व तूप एका पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवणे. उकळी आली की गॅस बंद करून त्या गरम मिश्रणात मैदा किंवा (all purpose flour) घालून कालथ्याने ढवळणे. मैदा घालत असतानाच एकीकडे पीठ लगेच ढवळणे, नाहीतर गुठळी होते. सैलसर एकजीव गोळा तयार झाला की तेलाचा हात घेऊन पीठ कणकेप्रमाणे मळून दोन तास मुरवत ठेवणे. हा तयार झालेला पीठाचा गोळा घट्ट नको.

दोन तासानंतर एक मोठा गोळा घेऊन पोलपाटभर एक मोठी पोळी लाटणे. लाटताना थोडी कणीक किंवा मैदा वापरणे. मोठी पातळ पोळी लाटली की त्याचे कालथ्याने किंवा कातण्याने तिरके चोकोन कापून मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळणे. हे शंकरपाळे कुरकुरीत व खुसखुशीत होतात. तळताना ते फुगतात.


२ वाट्यांमध्ये साधारण ५-६ मोठ्या पोळ्या होतात त्याचे तिरके चोकोनी तुकडे करून तळणे.
साधारण २ वाट्या मैद्याचे पीठ (दुध,साखर,तूप) या मिश्रणात मावते. थोडे कमी जास्त प्रमाण करावे लागेल. पीठ घालून ढवळताना एकसारखा गोळा होईपर्यंत पीठ घालणे. साजूक तूप नसेल तर तेल किंवा डालडा तूप वापरले तरी चालेल. पण मी अजून तसे करून पाहिले नाहीत.

रोहिणी

कणीस कीस

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोवळी मक्याची मध्यम आकाराची कणसे ४
मिरच्यांचे बारीक तुकडे २-३
कोथिंबीर २ चमचे, ओला नारळ २ चमचे,
दाण्याचे कूट मूठभर, मीठ, साखर अर्धा चमचा
तेल 4 चमचे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन:

मक्याची कोवळी कणसे किसून घ्या. तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे घालून नंतर त्यात किसलेला मक्याचा कीस घाला. २-३ वाफा देवून शिजवा. वाफ देताना झाकण काढल्यावर हा कीस परतून घ्या.  नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, ओला नारळ, साखर व चवीप्रमाणे मीठ घालून परत २-३ वाफा देवून परता. हा कीस पौष्टीक आहे. ४ कणसांच्या कीसामध्ये एका वेळेला एकासाठी पोटभर होतो.





Wednesday, February 28, 2007

रवा खीर



वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

रवा ४ चमचे
साखर ४ चमचे
दूध १ कप
साजुक तूप १-२ चमचे

क्रमवार मार्गदर्शन: एका छोट्या कढईत साजूक तूप व रवा घालून मध्यम आचेवर लालसर रंगावर भाजून घेणे. त्याचवेळी एकीकडे एका पातेल्यात दूधात साखर घालून गरम करायला ठेवणे. रवा छान भाजून झाला की तो दूधात घालून सतत ढवळणे. दूध उकळून वर यायला लागले की गॅस बंद करणे. ह्या १ कप दुधाची एक मोठा बाऊल भरून दाट खीर तयार होईल. खीर तयार झाल्यावर थोड्या थोड्या वेळाने ढवळणे, म्हणजे साय धरणार नाही. एकसंध दाट खीर चांगली लागते. दूध/साखर आवडीनुसार कमीजास्त घालणे.

खजूर-बदाम-काजू मिल्क शेक



वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

खजूर १२
बदामाची पूड २ मुठी
काजू पूड १ मूठ
दूध २ कप
साखर २ चमचे / आवडीनुसार

क्रमवार मार्गदर्शन:एक कप थंडगार दूधामधे खजूर २-३ तास भिजत घालणे. नंतर ते मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक करणे. नंतर परत १ कप दूध घालणे. बदाम व काजू पूड घालणे. व आवडीनुसार साखर घालून परत एकदा बारीक करणे. असे हे दाट मिल्क शेक तयार होईल. पातळ/दाट हवे त्याप्रमाणे दूध घालणे.

Sunday, January 21, 2007

कुड्या



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

लसूण पाकळ्या १० ते १२
हिरव्या मिरच्या ४ ते ५
ख़ोवलेला ओला नारळ २ ते ३ वाट्या
तेल मोहोरी,हिंग,हळद,मीठ ,साखर


क्रमवार मार्गदर्शन: कढाईत थोडेसे तेल घालुन त्यात मोहोरी,हिंग, हळद टाकुन फ़ोड्णी करणे, त्यात मिरर्च्यांचे तुकडे,लसुण पाकळ्या टाकुन थोडे परतणे. नंतर त्यात ख़ोवलेले ओले खोबरे घालुन परत थोडे परतणे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणी साखर घालणे. gas बंद करणे. लसुण पाकळ्या आणी मिरच्या जास्त शिजवायच्या नाहीत.

पीठले भाताबरोबर ह्या कुड्या छान लागतात.

रोहिणी

माहितीचा स्रोत:आई कडून

Saturday, January 20, 2007

डाळ कोबी










वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

बारीक चिरलेला कोबी ४-५ वाट्या
हरबरा डाळ अर्धी वाटी,
हिरव्या मिरच्या १-२, लाल तिखट १ चमचा
मीठ, गूळ सुपारीएवढा
ओला नारळ अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे

क्रमवार मार्गदर्शन: हरबरा डाळ ३ तास पाण्यात भिजत घालणे. फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे व हरबरा डाळ घालून १-२ वेळा वाफेवर शिजवणे. नंतर त्यात चिरलेला कोबी घालून मध्यम आचेवर शिजवणे. थोडे पाणी घालून पातेलीवर झाकण ठेवणे. ५ मिनिटांनी झाकण काढून परतणे. असे थोडे थोडे पाणी घालून ५-६ वाफा देवून शिजवणे. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व गूळ घालून परत २-३ वेळा वाफेवर शिजवणे. सगळ्यात शेवटी ओला नारळ व कोथिंबीर घालणे. या भाजीत शिजवण्यापुरतेच पाणी घालणे नाहीतर पांचट होते. ही पातळ भाजी नाही.

नुसती खायला पण छान लागते.

माहितीचा स्रोत:मामेबहीण सौ विनया गोडसे.

Thursday, January 18, 2007

आमटी





वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तुरीची डाळ अर्धी वाटी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा,
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
२ मिरच्या, ३-४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू
लाल तिखट १ चमचा, धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन: अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मोहरी, जिरे हिंग, हळद व अर्धा चमचा लाल तिखट व चिरलेल्या मिरच्या घालून लगेचच चिरलेला कांदा व टोमॅटो घालणे. थोडी तीव्र आच ठेवून परतणे. परतून झाल्यावर त्यात अगदी थोडे पाणी घालून मध्यम आचेवर शिजवणे. कांदा व टोमॅटो व्यवस्थित शिजले की मग त्यात अर्धा चमचा धनेजिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, अर्धे लिंबू पिळून अजून थोडे पाणी घालून थोडी उकळी आणणे. नंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ डावेने घोटून घेऊन त्यात घालणे. परत १-२ वाट्या पाणी घालून तीव्र आच ठेवून उकळी आणणे. अधुम मधून ढवळणे.


उकळी आली की परत त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पूड व थोडे मीठ घालून अजून थोडी आमटी उकळणे व ढवळणे. वरून थोडे लाल तिखट व धनेजिरे पूड घातल्याने आमटीला रंग छान येतो. आमटी थोडी दाट असू दे. खूप पातळ नको. लिंबू आवडीनुसार कमीजास्त पिळणे.


रोहिणी

Wednesday, January 17, 2007

पालक थालिपीठ



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पालकाची छोटी पाने २५-३०
लहान अर्धा कांदा
२-३ हिरव्या मिरच्या
लाल तिखट, हळद, हिंग, मीठ
हरबरा डाळीचे पीठ
तेल

क्रमवार मार्गदर्शन: पालकाची पाने पाण्याने धुवुन घेवून बारीक चिरणे, कांदा व मिरच्या बारीक चिरुन घेणे, त्यात चविप्रमाणे लाल तिखट, मीठ व थोडेसे हळद,हिंग घालणे. या मिश्रणामधे डाळीचे पीठ व थोडे (५-६ चमचे) तेल घालणे. पीठ जास्त नको, मिळुन येण्याइतपतच घालणे.

वरील मिश्रण कालवताना पाणी वापरायचे नाही, कारण पालकाची पाने ओली असतात, शिवाय कांदा, तिखट-मीठामुळे पाणी सुटतेच. निरलेप तव्यावर थोडे तेल घालून ह्या मिश्रणाचा छोटा गोळा घेवून पातळ थालिपीठ थापा. थालिपीठ थापताना हातावर थोडे तेल घेवून थापावे.

असे हे खरपूस व चविष्ट थालिपीठ दह्याबरोबर खाणे.

रोहिणी

Tuesday, January 16, 2007

श्रीखंड (१)





वाढणी:दोन/तीन जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस :

केफ़िर चीज (लेबनी) नावाचे दही १ डबा/Sour Cream
वेलची जायफ़ळ पूड पाव चमचा
बदाम काजु पिस्ते काप ५ चमचे
केशर चिमुट्भर
साखर १:१ प्रमाण

क्रमवार मार्गदर्शन: केफ़ीर चीज (लेबनी) दह्यामधे १:१ याप्रमाणे साखर घालून चमच्याने ढवळणे. त्यामधे बदाम काजु पिस्ते काप, वेलची जायफ़ळ पूड, केशर घालून परत ढवळ्णे. झाले श्रीखंड तयार.
दह्याला रात्री बांधुन ठेवायची गरज नाही. केफ़ीर चीज लेबनी या दह्यामधे अजीबात पाणी नसते.
हे दही अमेरीकेत कोणत्या दुकानामधे मिळते माहीत नाही. हे श्रीखंड मी एका student कडुन शिकली आहे. तो हे दही एका international shop मधुन आणायचा (denton,texas)
Sour Cream ची कल्पना माझी आहे. हे कोणत्याही अमेरिकन दुकानात मिळते.
साखरेच प्रमाण एकास एक जरी दिले असले तरी अर्धे प्रमाण आधी घालून चव पाहवी व आवडीनुसार नंतर परत घालावी. नाहीतर खूपच गोड होईल.

शेवयांचा उपमा



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कुस्करलेल्या शेवया १ वाटी
साजुक तुप अथवा तेल
मोहोरी, हिंग, चिमूटभर हळद, आणि लाल तिखट
मीठ, साखर, लिंबू १/२
चिरलेला कांदा १ वाटी, हिरव्या मिरच्या ३ ते ४
भाजलेले शेंगदाणे १०/१२

क्रमवार मार्गदर्शन: १ चमचा साजुक तूप अथवा तेलामधे शेवया गुलाबी रंग येईपर्यंत भाजुन घ्या. शेवया भाजताना गॅस मंद ठेवा. ४ ते ५ चमचे साजुक तूप अथवा तेलामधे मोहोरी,  हिंग,  हळद, आणि लाल तिखट घालुन त्यात मिरच्या, कांदा, भाजलेले दाणे घालुन परता. कांदा शिजायला पाहिजे. नंतर त्यात २ वाट्या पाणी ,चवीप्रमाणे मीठ,साखर घालुन लिंबू पिळून ढवळा. पाण्याला उकळी आली कि त्यात भाजलेल्या शेवया घालुन ढवळा. नंतर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा.

शेवयांचा उपमा गरम गरम खायला द्या.

मसाला पापड

वाढणी:जितकी माणसे तितके पापड

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उडदाचा पापड
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
लाल तिखट, मीठ

क्रमवार मार्गदर्शन: प्रथम उडदाचा पापड तळून घेणे. नंतर त्यावर खूप बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सम प्रमाणात पूर्ण पापडभर पसरुन घालणे. नंतर त्यावर चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ पेरणे.
रोहिणी

भाज्यांची भजी

वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

कोबी, गाजर, मटार, सिमला मिरची, श्रावणघेवडा
हिरव्या तिखट मिरच्या
लिंबू अर्धे, मीठ
डाळीचे पीठ
तांदुळाचे पीठ
तळण्यासाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: वरील सर्व भाज्या खूप बारीक चिरणे. प्रत्येक बारीक चिरलेली भाजी १ वाटी घेणे व मटारचे दाणे १ वाटी. ५-६ हिरव्या मिरच्या आधी उभ्या व नंतर आडव्या बारीक चिरणे. हे सर्व एका पातेलीमधे घालून त्यात चवीप्रमाणे लिंबू व मीठ घालणे. नंतर त्यात डाळीचे पीठ जास्त आणि तांदुळाचे पीठ थोडेसे घालून पीठ भिजवणे. हे पीठ नेहमीच्या भज्यांप्रमाणे पाणी घालुन भिजवायचे नाही. हे पीठ भिजवताना मिळून आले नाही तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही.

भिजवलेले हे पीठ मुठीत घेउन २-३ वेळा दाबून (लाडू वळतो तसे) तेलात सोडून तळावेत. लांबटगोल आकार द्यावा.

रोहिणी

भरली कारली







वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

हिरवीगार कारली पाव किलो (बुटकी असल्यास जाती चांगली)
ओल्या नारळाचा खव दोन वाट्या
दाण्याचे कूट दोन वाट्या
तिखट, मीठ, गोडा/गरम मसाला, गूळ, हळद, हिंग, धने-जिरे पूड
कोथिंबीर
फोडणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: पहिल्याप्रथम बुटकी हिरवीगार कारल्याचे दोन भाग करणे. कारली उंच असल्यास ३-४ भाग करणे. त्यातील बिया काढणे. नारळाचा खव व दाण्याचे कूट यामधे प्रत्येकी ३-४ चमचे तिखट,धने-जिरे पूड, गोडा किंवा गरम मसाला घालणे. अजुन १ चमचा हळद व अर्धा चमचा हिंग घालणे. कोथींबीर बारिक चिरुन घालणे. लिंबा एवढ्या आकाराचा गूळ व चवीपुरते मीठ घालुन हे सर्व मिश्रण कालवणे. नंतर कारल्यामधे हे मिश्रण दाबून भरणे. हे मिश्रण जास्ती प्रमाणात झाले तरी चालेल, पण कमी पडता कामा नये.


परसट भांड्यात तेल घालुन फोडणी करणे व त्यात ही कारली घालुन मंद आचेवर ५-६ वाफा देवून शिजवणे. सर्व कारली बुडतील एवढे तेल घालणे. कारल्यावर कोणतेही सोपस्कार करु नयेत.
कारल्याच्या कडू चवीमधेच खरी गोडी आहे. अमेरीकेतील तो दसरा मी कधीच विसरणार नाही. कधी नव्हे ते इंडीयन स्टोअर्समधे कारली दिसली, म्हणून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भरली कारली केली होती. दोन भारतीय विद्यार्थ्यांना जेवायला बोलावले होते, कारण तेही कारलेप्रेमी होते.


रोहिणी



माहितीचा स्त्रोत : सौ दिप्ती जोशी

पाव-भजी



वाढणी:२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

पावाचे स्लाइस ६
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, हिरव्या तिखट मिरच्या ४
लाल तिखट, मीठ, हिंग, हळद
हरबरा डाळीचे पीठ १ वाटी,
तांदुळाचे पीठ ४ -५चमचे
तळायला तेल

क्रमवार मार्गदर्शन: पहिल्याप्रथम पावाच्या स्लाइसच्या सर्व कडा काढणे. नंतर त्याचे सुरीने चार तुकडे करणे. हरबरा डाळ व तांदुळाच्या पिठामधे चविप्रमाणे तिखट,मीठ व थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालणे. चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेल्या मिरच्या घालून बटाटयाच्या भज्यांना भिजवतो तसे पिठ भिजवणे. (खूप पातळ पिठ भिजवू नये) पावाचे केलेले तुकडे पिठात भिजवून तांबुस रंग येईपर्यंत तळणे. ६ स्लाइसमधे २४ भजी होतील.

तांदुळाचे पिठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात आणि कोथिंबीर व मिरच्या घातल्याने भज्यांना वरुन हिरवा रंग येतो म्हणून दिसायला छान दिसतात व चविला चांगली लागतात.

रोहिणी

निवगरी




वाढणी:जितकी माणसे तितक्या निवगऱ्या

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उकडीच्या मोदकांना करतो तशी उकड करणे
कोथिंबीर, मिरच्या, जिरे किंवा जिऱ्याची पावडर
मीठ
उकड मळण्यासाठी तेल,पाणी

क्रमवार मार्गदर्शन:

ही पाककृती सोपी आहे. ज्यांना उकडीचे मोदक करता येतात, त्यांना निवगरी करणे काही अवघड नाही. तांदुळाच्या पीठाची केलेली उकड तेल-पाण्यामधे मळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मिरच्या वाटून घालणे, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर व जिरे/जिरे पावडर घालुन परत मळून घेउन वड्याच्या गोल आकाराप्रमाणे पातळ थापणे. मोदक जसे वाफेवर उकडतो त्याचप्रमाणे केळीच्या पानावर ठेवून उकडणे. गोड मोदक खाताना मधुन मधुन तिखट निवगरी खायला छानच लागते.
मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


रोहिणी

डाळवांगे

वाढणी:चार जणांना

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तुरीची डाळ १ वाटी
वांग्याच्या मध्यम आकाराच्या फोडी १०-१२
अर्धी वाटी दाट चिंचेचे पाणी, गूळ छोट्या लिंबाएवढा, मीठ चवीपुरते
धने-जीरे पूड १ चमचा, लाल तिखट १ चमचा, गरम/गोडा मसाला १ चमचा
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कढीपत्ता थोडासा
तेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद,


क्रमवार मार्गदर्शन: तुरीची डाळ कुकरमधे एकजीव शिजवून घेणे. तेलाच्या फोडणीमधे कढीपत्ता, कोथिंबीर व नारळाचा खव घालून वांग्याच्या फोडी १-२ वाफेवर शिजवून घेणे. नंतर त्यामधे लाल तिखट, धने-जीरे पूड, गोडा अथवा गरम मसाला, चिंच-गुळ व चवीप्रमाणे मीठ घालुन हे सर्व मिश्रण थोडे पाणी घालुन व्यवस्थित ढवळावे व सगळे रस (आंबट-गोड-तिखट) उतरण्याकरता मध्यम आचेवर थोडे उकळून घेणे.
नंतर त्यामधे एकजीव शिजवलेली तुरीची डाळ घालुन परत थोडे पाणी घालुन ढवळणे. ५ मिनिटांनी गॅस बंद करणे. झाले तयार डाळवांगे. हे डाळवांगे दाट असु दे. पातळ नको. पोळी-भाकरीशी खूप छान लागते.


रोहिणी

सिमला भजी




वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

सिमला उर्फ ढब्बू मिरची २ (लांब आकाराच्या)
डाळीचे पीठ १ वाटी, अधपाव वाटी तांदुळाचे पीठ
लाल तिखट १ चमचा, हळद अर्धपाव चमचा, हिंग चिमुटभर, मीठ
तळणीसाठी तेल

क्रमवार मार्गदर्शन: सिमला मिरची लांबट म्हणजेच उभी व बारीक चिरणे. डाळीच्या पीठात तांदुळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून भजी करायला पीठ लागते (थोडे सैलसर) त्याप्रमाणे भिजवावे व त्यामधे सिमला मिरचीचे उभे चिरलेले काप घालून भजी करणे. (ज्याप्रमाणे बटाटा भजी करतो तशी) तादुंळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत होतात. खूप मस्त लागतात. उभी चिरल्यामुळे दिसायला पण छान दिसतात.


रोहिणी