Thursday, January 18, 2007

आमटी

वाढणी:२ जण

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

तुरीची डाळ अर्धी वाटी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा,
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
२ मिरच्या, ३-४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू
लाल तिखट १ चमचा, धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन: अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मोहरी, जिरे हिंग, हळद व अर्धा चमचा लाल तिखट व चिरलेल्या मिरच्या घालून लगेचच चिरलेला कांदा व टोमॅटो घालणे. थोडी तीव्र आच ठेवून परतणे. परतून झाल्यावर त्यात अगदी थोडे पाणी घालून मध्यम आचेवर शिजवणे. कांदा व टोमॅटो व्यवस्थित शिजले की मग त्यात अर्धा चमचा धनेजिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, अर्धे लिंबू पिळून अजून थोडे पाणी घालून थोडी उकळी आणणे. नंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ डावेने घोटून घेऊन त्यात घालणे. परत १-२ वाट्या पाणी घालून तीव्र आच ठेवून उकळी आणणे. अधुम मधून ढवळणे.


उकळी आली की परत त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पूड व थोडे मीठ घालून अजून थोडी आमटी उकळणे व ढवळणे. वरून थोडे लाल तिखट व धनेजिरे पूड घातल्याने आमटीला रंग छान येतो. आमटी थोडी दाट असू दे. खूप पातळ नको. लिंबू आवडीनुसार कमीजास्त पिळणे.


रोहिणी

1 comment:

मीनल गद्रे. said...

माझ्या आईने खारे शंकरपाळे मसाल्याच्या आमटीत टाकले. काय ताव मारला आहे सर्वांनी!
पातळशी आमटी तयार करायची. जेवळाच्या वेळी वाटीत शंकरपाळे घालायचे, त्यावर ती उकळलेली आमटी घालायची आणि त्यावर तूप.
आणि मस्त ओरपायची. आधी कुरकुरीत शंकरपाळे मग मऊ पडलेले आमटी दाट करणारे शंकरपाळे.
भात्ताबरोबर, पोळीबरोबर छान लागतात.