- थालिपीठाची भाजणी २ ते ३ मूठी
- लाल तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ
- अर्धा कांदा बारीक चिरलेला
- पीठ भिजवण्यासाठी पाणी
- तेल
Tuesday, March 10, 2015
मसाला वांगी
जिन्नस :
बारीक चिरलेली वांगी ३ वाट्या
मध्यम चिरलेला कांदा पाऊण वाटी
मध्यम चिरलेला टोमॅटो पाऊण वाटी
पाउण चमचा लाल तिखट
पाऊण चमचा धनेजिरे पूड
पाऊण चमचा गरम मसाला
चवीपुरते मीठ
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, जिरे, हळद
दाण्याचे कूट मूठभर
सजावटीसाठी कोथिंबीर
अर्धा चमचा साखर
मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेले वांगी, टोमॅटो व कांदा घाला व भाजी ढवळा. आता कढईवर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत एकदा भाजी ढवळा. आता अगदी जरूरीपुरतेच थोडेसेच पाणी घाला व परत झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत म्हणजे वांगी चांगली शिजतील. आता त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ व दाण्याचे कूट घाला. परत एकदा भाजी ढवळून घ्या. तेल कमी वाटले तर परत घाला. नंतर परत काही सेकंदाची वाफ द्या. आता अर्धा चमचा साखर पेरून भाजी ढवळा. भाजी बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर पेरा. ही भाजी खूप चविष्ट लागते. या भाजीवर तेलाचा चांगला तवंग आला पाहिजे हे विषेश आहे. तरच ही भाजी चांगली लागते.
Friday, March 06, 2015
थालिपीठाच्या भाजणीचे घावन
वरील सर्व मिश्रण एकत्र करा व पीठ भिजवा. हे पीठ खूप पातळ भिजवा. गॅसवर तवा तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यावर चमच्याने थोडे तेल टाकून तवाभर पसरवा. नंतर डावेने भिजवलेले पीठ तवाभर घाला. काही सेकंदाने त्यावर थोडे तेल टाका. शिवाय घावनाच्या कडेनेही तेल टाका. काही सेकंदाने कालथ्याने घावन सोडवून मग ते उलटवावे. व नंतर परत थोडे तेल घाला व काही सेकंदाने घावन तव्यावरून काढा.
Sunday, February 22, 2015
पालक- मूगडाळ
जिन्नस :
चिरलेला पालक ४ मुठी
एक मध्यम बटाटा
अर्धा कांदा
अर्धा टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
लाल तिखट पाऊण चमचा
धनेजिरे पूड पाऊण चमचा
चवीनुसार मीठ
मूगडाळ अर्धी वाटी
फोडणी साठी तेल
मोहरी, हिंग. हळद
मार्गदर्शन : चिरलेला पालक पाण्याने धुवून रोळीमध्ये निथळत ठेवा. पाणी सर्व निघून गेले पाहिजे. मुगाची डाळ २ तास भिजत घाला. २ तासानंतर भाजी करायला घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग , हळद घालून फोडणी करा. त्यात आधी मुगाची डाळ घालून परता व त्याला थोडी वाफ द्या. नंतर त्यात चिरलेली मिरची, लसूण, कांदा, घालून थोडे परता. नंतर त्यात चिरलेला बटाटा, टोमॅटो घालून थोडे परता. आता या मिश्रणावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व परत मिश्रण नीट परता. आता त्यात चिरलेला पालक घाला व परता. झाकण ठेवा व एक दणदणीत वाफ द्या. परत झाकण काढून त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड व चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. अजून एक वाफ द्यावी. नंतर परतून भाजी सर्व बाजूने एकसारखी करून घ्यावी. पोळी बरोबर खायला द्या. ही भाजी चवीला खूप छान लागते.
Thursday, December 11, 2014
सणाला सजवलेली ताटे
ही सर्व ताटे नैवेद्याची आहेत. वर्षभरातील सणांना सजवलेली आहेत. सण आहेत दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, श्रावणी शुक्रवार.
Wednesday, August 06, 2014
तुरीच्या डाळीचे वडे
जिन्नस :
तुरीची डाळ २ वाट्या
तांदुळ २ चमचे
आले एक छोटा तुकडा
कडिपत्ता १० ते १२ पाने
अगदी थोडी हळद
मीठ
मार्गदर्शन : तुरीची डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजत घाला. नंतर मिक्सर - ग्राइंडर वर वाटा. वाटतानाच त्यात आल्याचे तुकडे घाला. वाटताना जरूरीपुरतेच पाणी घालावे व डाळ भरड वाटावी. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून त्यात चवीप्रमाणे मीठ व थोडी हळद घाला व कडिपत्याची पाने हातानेच अर्धी करून घाला. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात वडे चांगले तळले जातील इतपत तेल घाला व ते तापले की त्यात वडे घालावेत व खरपूस रंग येईपर्यंत तळावेत. कडीपत्ता वर दिसला पाहिजे इतका घाला. या वड्यात आल्याची व कडिपत्याचीच चव आहे.
ही रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे. २००३ साली आम्ही ज्या शहरात राहत होतो तेव्हा माझ्या शेजारणीने हे वडे मला खायला दिले होते. तेव्हा आमची भारतासारखी पदार्थांची देवाणघेवाण चालायची. मी तिला बटाटेवडे दिले होते व तिने मला हे वडे ! त्याच वेळेला तिला रेसिपी विचारली होती पण मुहूर्त आज लागला.
Thursday, July 10, 2014
Saturday, March 22, 2014
प्रसादाचा शिरा
जाड रवा १ वाटी
दीड वाटी दूध
अर्धी / पाऊण वाटी पाणी
१ वाटी साखर
केळ्याच्या चकत्या ५ ते ६
केशर ४ ते ५ काड्या
अर्धी वाटी साजूक तूप
मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात रवा व साजूक तूप घालून कालथ्याने परतायला सुरवात करा. रवा परतून थोडा रंग बदलायला लागेल. मग त्यात केळ्याच्या चकत्या घाला व अजून थोडे परता. रवा व केळ्याचे काप खमंग परतावेत. नंतर त्यात गरम करून थोडे कोमट झालेले दूध व पाणी घाला. केशर गरम करून ते चुरडून दुधात घाला म्हणजे त्याचा रंग दूघात उतरेल आणि ते दूधही घाला. रवा कालथ्याने भराभर ढवळा त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. आता झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढून परत रवा ढवळून घ्या. आता साखर घाला व परत एकदा ढवळा. आता परत थोडे हे मिश्रण पातळ होईल. आता परत झाकण ठेवा. म्हणजे शिरा चांगला शिजेल व साखरेशी एकरूप होईल. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. गॅस बंद करा. हा शिरा चवीला खूप छान लागतो.
Tuesday, March 18, 2014
भाज्यांचे कसेडिया
जिन्नस :
ब्रोकोली, पालक, कांद्याची पात, सिमला मिरची, झुकिनी स्वॅश, बटाटा, गाजर, टोमॅटो,
कांदा, लसूण, आले
किसलेले चीझ
टोमॅटो केचप
तेल अथवा लोणी
मिरपूड
मीठ
टॉर्टिया
बारीक चिरलेले लेट्युस, कांदा, टोमॅटो व कोथिंबीर
मार्गदर्शन : वरील सर्व भाज्या बारीक चिरा.
कांद्याची पात यातील खालचा भाग चिरून घ्यावा. हिरवी पात घेऊ नये कारण ती पटकन शिजत नाही व दातात येते. या सर्व चिरलेल्या भाज्या साधारण ४ ते ५ वाट्या होतील इतक्या चिरा. वर दिलेल्या भाज्यांपैकी तुम्हाला आवडतील तशा कमीजास्त प्रमाण घ्या अथवा अजून तुमच्या काही आवडीच्या भाज्या असतील त्या घेतल्या तरी चालतील. फक्त या भाज्या बारीक चिराव्या म्हणजे कमी तेलावर पटकन शिजतील. अर्थात या सर्व भाज्या थोड्या अर्धवट शिजलेल्याच ठेवायच्या आहेत. मध्यम आचेवर पसरट पातेले ठेवा व त्यात लोणी अथवा तेल घाला. भाज्या कोरड्या राहणार नाहीत पण शिजल्या पाहिजेत इतकेच तेल किंवा लोणी घाला. जास्त नको. तेल तापले/लोणी विरघळले की त्यात आधी बारीक चिरलेला थोडा कांदा व आले लसूण मिरच्यांची पेस्ट/पेस्ट नसेल तर खूप बारीक चिरून परता. नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून कालथ्याने ढवळत रहा. बारीक चिरल्याने भाज्या पटकन शिजतात. आता गॅस बंद करा व त्यात मिरपूड व चवीपुरते मीठ घाला.
थोड्या वेळाने गॅसवर तवा ठेवा व मध्यम आचेवर लोणी अथवा तेल घालून टॉर्टिया दोन्ही बाजूने भाजून घ्या. भाजताना त्यावर कालथ्याने थोडे प्रेस करा. टॉर्टिया फुगून येतील. आता गॅस खूप मंद ठेवा. टॉर्टियाच्या अर्ध्या भागावर केलेली भाजी पसरवून घ्या व त्यावर किसलेले चीझही पसरवून घ्या. आता उरलेली अर्धी पोळी त्यावर दुमडून ठेवा. आणि कालथ्याने प्रेस करा. आता परत थोडे तेल किंवा लोणी घालून दोन्ही बाजूने टॉर्टिया खरपूस भाजून घ्या. हा खरपूस भाजलेला टॉर्टिया एका ताटलीत काढा व त्याचे सुरीने दोन भाग करा.
एका छान डिशमध्ये दोन भाग केलेला टॉर्टिया घालून त्यावर थोडे टोमॅटो केचप घालून व चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्या. थोडे किसलेले चीझही घाला. सोबत लेट्युस व बारीक कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या. ही एक पटकन होणारी डिश आहे.
Tuesday, March 11, 2014
नाचणी लाडू
जिन्नस :
नाचणीचे पीठ दीड वाटी
एक वाटी साखर (ग्रॅन्युलेटेड शुगर अथवा पीठीसाखर)
५ ते ६ चमचे साजूक तूप
अर्धी वाटी दाण्याचे कूट
अर्धी वाटी बदामाची पूड
मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की लगेच त्यात साजूक तूप व नाचणीचे पीठ घाला व कालथ्याने ढवळायला लागा. तूप जर कमी पडत असेल तर अजून थोडे घाला. नाचणीचे पीठ तूपात पूर्णपणे बुडायला हवे. आता आच कमी करा व नाचणीचे पीठ कालथ्याने सतत ढवळून भाजा (जसे बेसन पीठ भाजतो तसेच) ते भाजून होत आले की त्यात दाण्याचे कूट व बदामाची पावडर घालून अजून थोडे परतावे. आता गॅस बंद करा व साखर घाला आणि ढवळा. किंवा मिश्रण कोमट असताना साखर घातली तरी चालेल. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळा. हे लाडू पौष्टिक आहेत. चवीलाही छान लागतात. या मिश्रणाचे १५ लाडू होतील.
Thursday, February 13, 2014
टोमॅटो वडी
जिन्नस :
लाल टोमॅटो २ कच्चे अथवा उकडून (साले काढावीत)
एक मध्यम उकडलेला बटाटा
अर्धी वाटी नारळाचा खव
साखर पावणे दोन वाट्या
दूध अगदी थोडे
साजूक तूप २ चमचे
रिकोटा चीझ २ ते ३ चमचे
मार्गदर्शन : उकडलेला बटाटा, टोमॅटो आणि नारळाचा खव मिक्सर मधून बारीक करून घ्या. एका कढईत २ चमचे साजूक तूप घालून ती कढई मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण थोडे परतून घ्या. त्यात अगदी थोडे दूध घाला. नंतर अजून थोडे परता. आता हे मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. याच कढईत किंवा पातेल्यात साखर घाला व साखर बुडेल इतके पाणी घाला आणि कालथ्याने ढवळत राहा. एक तारी पाक बनला की लगेचच परतलेले मिश्रण घालून ढवळत राहा. आता हे मिश्रण चांगले उकळेल व आटायला लागेल. नंतर यात रिकोटा चीझ घाला व परत ढवळत रहा. काही वेळाने या मिश्रणाचा गोळा बनायला लागेल व हा गोळा थोडा कोरडा पडायला सुरवात होईल. आता गॅस बंद करा. ताटलीला साजूक तूपाचा हात लावून घ्या व हे गरम मिश्रण त्यावर ओता व सर्व बाजून थापा. थापताना वाटीचा वापर करा. वाटीच्या बाहेरच्या तळाला साजूक तूप लावा व ही वाटी त्या गरम मिश्रणावर एकसारखी फिरवा म्हणजेच हे सारण ताटलीभर पसरवा. कोमट असताना वड्या पाडा. टोमॅटोने या वडीला छान रंग येतो.
बटाटा टोमॅटो आणि नारळाचा खव हे सर्व मिक्सर मध्ये वाटून केलेले मिश्रण जर १ वाटी तयार झाले तर पावणे दोन वाट्या साखर पाकाकरता घ्यावी.
Friday, November 22, 2013
खरवस
जिन्नस :
- चिकाचे दूध १ कप
- दूध पाऊण कप
- साखर साधारण १ कप
- वेलची पूड, केशर
चिकाचे दूध , दूध , साखर, वेलची व केशर सर्व एका भांड्यात एकत्र करा व ढवळा. साखर विरघळली पाहिजे. नंतर कुकर मध्ये कुकराची ताटली बुडेल इतके पाणी घाला व सर्व एकत्रित केलेले मिश्रणाचे भांडे कुकरामध्ये ठेवा व त्यावर झाकण ठेवा. नंतर कुकराचे झाकण लावून शिटी काढा. अर्धा तास मंद आचेवर हे मिश्रण शिजू देत. आता गॅस बंद करा. कुकर गार झाला की मिश्रणाचे भांडे बाहेर काढा. खूप गार झाल्यावर वड्या पाडा. वड्या खाऊन जर उरल्या तर त्या शीतकपाटात ठेवा.
साखरेचे प्रमाण साधारण एक कप असे दिले आहे तरी प्रथम अर्धा कप साखर घालून ढवळून मग चव पाहावी. व नंतर परत आवडीप्रमाणे साखर घालावी. खरवस अगोड चांगला लागत नाही. चिकाचे दूध पहिल्या दिवशीचे असेल तर दूध पाऊण प्रमाणात घ्यावे . चीक दुसऱ्या दिवशीचा असेल तर चिकाच्या दुधाच्या निम्मे साधे दूध घ्यावे. पहिल्या दिवशीच्या चिकाच्या वड्या छान पडतात. गूळ घालणार असाल तर जायफळ घालावे.
Friday, June 28, 2013
बिस्कीटे
जिन्नस
- गव्हाचे पीठ अर्धी वाटी, मैदा व हरबरा डाळीचे पीठ मिळून अर्धी वाटी
- लोणी पाऊण वाटी, ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर मिळून अर्धी वाटी
- २ चिमूट बेकींग सोडा
- साजूक तूप ट्रे बेकींग ट्रे ला लावण्यापुरते
वरील सर्व मिश्रण एका वाडग्यात एकत्र करा व हाताने मळून घ्या. पिठाच्या गुठळ्या रहायला नकोत. नंतर हे मिश्रण झाकून ठेवा. २० मिनिटे हे मिश्रण झाकले गेले पाहिजे. नंतर बेकींग ट्रे ला तूपाचा हात लावून घ्या. मुरवलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करा व त्यावर काट्या चमच्यामधल्या काट्याने अलगद हाताने चेपा. ट्रे मध्ये हे सर्व गोळे काही अंतर राखून ठेवा. ओव्हन २५० डिग्री फॅरनहाईट वर ठेवून ट्रे त्यात ठेवा. ३० ते ३५ मिनिटे भाजून घ्या. बिस्कीटे तयार होतील. ओव्हन बंद करा. काही वेळाने ट्रे बाहेर काढून सर्व बिस्कीटे एका ताटात गार करायला ठेवा. पूर्ण गार झाली की डब्यात भरून ठेवा.
वरील मिश्रणात ३५ बिस्कीटे होतात. वर जे मिश्रण दिले आहे त्यामध्ये ग्रॅन्युलेटेड शुगर जास्त व बाकीची ब्राऊन शुगर थोडी घालावी. शिवाय मैदा जास्त व बाकीचे डाळीचे पीठ कमी घ्या. वरील सर्व मिश्रणाचा एकत्रित मळून जो गोळा तयार होतो तो सैलसर कणकेसारखा झाला पाहिजे. लोण्याचे प्रमाण दिले आहे तर ते थोडे कमी जास्त घालावे म्हणजे गोळा सैलसर होण्याइतपत घालावे.
Tuesday, June 18, 2013
कणीक भिजवणे
जिन्नस :
गव्हाचे पीठ ४ वाट्या
पाणी २ वाट्या
गोडतेल मोठाले ५ ते ६ चमचे
पाऊण चमचा मीठ
मार्गदर्शन : एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात अर्धा चमचा मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून कणीक ओली करा. कणीक ओली करताना एकीकडे चमच्याने सगळ्या बाजूने ढवळत रहा. ४ वाट्या कणकेसाठी २ वाट्या पाणी लागते. आता ही ओली झालेली कणीक अजूनही थोडीफार कोरडीच असेल. नंतर एक चमचा तेल हातावर घ्या आणि ओली झालेली कणीक हातानेच एकसारखी करून मळून घ्या व त्याचा गोळा बनवा. हा कणकेचा गोळा बनवताना अजूनही कणकेच्या गोळ्याच्या आजुबाजूला थोडे गव्हाचे पीठ कोरडे राहिलेले दिसेल. त्यात अगदी थोडे पाणी घालून तेही त्या गोळ्यात मिक्स करा. कणकेचा गोळा मळताना एकेक चमचा हातावर तेल घेत राहा व गोळा मळत रहा. आता हा मळलेला कणकेचा गोळा अर्धा तास मुरवत ठेवा. कणकेच्या गोळ्यावर झाकण ठेवा. अर्ध्या तासानंतर परत थोडे हातावर तेल घालून कणकेचा गोळा मळा. आता तुम्हाला कणीक नितळ दिसायला लागेल. नितळ झालेल्या कणकेच्या पोळ्या बनवा.
Monday, June 17, 2013
एम आणि एम कुकीज
जिन्नस :
अर्धी वाटी बटर (मीठविरहीत)
अर्धी वाटी (ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर) यामध्ये ब्राऊन शुगर पाव वाटीपेक्षा जास्त आणि बाकीची ग्रॅन्युलेटेड शुगर
१ वाटी मैदा किंवा ऑल परपज फ्लोअर आणि हरबरा डाळीचे पीठ (यामध्ये मैदा पाऊण वाटीपेक्षा जास्त आणि बाकीचे डाळीचे पीठ)
२ चिमटी बेकींग सोडा
एम आणि एम ची चॉकलेट १ छोटे पाकीट (४७.९ ग्रॅम)
मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा व मळून घ्या. चॉकलेट सर्वात शेवटी टाकून अजून थोडे मळून घ्या. २० मिनिटे हे मिश्रण तसेच झाकण ठेवून ठेवा. नंतर त्याचे एकसारखे गोळे करून थोड्या थोड्या अंतरावर बेकींग ट्रे मध्ये ठेवा. नंतर ३५० डिग्री फॅरनहाईटवर २५ मिनिटे कुकीज भाजून घ्या. कूकीज गार झाल्या की डब्यात भरून ठेवा. वरील मिश्रणात १५ कुकीज होतात.
बटर फ्रीजमधून काढून नेहमीच्या तापमानाला येऊ देत.
Tuesday, June 04, 2013
नानकटाई
जिन्नस :
१ वाटी मैदा किंवा ऑल परपज फ्लोअर
अर्धी वाटी मीठविरहीत बटर
अर्धी वाटी ग्रॅन्युलेटेड साखर
२ चिमटी बेकींग सोडा
ट्रे ला लावायला थोडेसे साजूक तूप
मार्गदर्शन : वरील सर्व मिश्रण एका भांड्यात घाला व हाताने एकजीव करा. बटर मिक्स करायच्या आधी फ्रीजमधून काढा व ते नेहमीच्या तापमानाला येऊ देत. भिजवलेल्या मिश्रणावर झाकण ठेवा. २० मिनिटानंतर परत एकदा भिजवलेले मिश्रण मळून घ्या व त्याचे एकसारखे ११ गोळे बनवा व ते हाताने गोल गोल करून घ्या व कूकी ट्रेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. कूकीज ३०० फॅरनहाईट डीग्रीवर ३० मिनिटे ओव्हनमध्ये भाजून काढा. ट्रे ओव्हनमध्ये मधोमध ठेवा. वरील मिश्रणात ११ नानकटाई होतात.
Thursday, May 30, 2013
घेवड्याची भाजी
जिन्नस :
घेवड्याच्या शेंगा सोललेल्या (३ते ४ वाट्या)
१ बटाटा उकडून त्याच्या फोडी
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजिरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
दाण्याचे कूट २ मूठी
नारळाचा खव १ मूठ
थोडा गूळ
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन : घेवड्याच्या शेंगा कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की शिजलेल्या शेंगा बाहेर काढा. शिजताना त्यात थोडे पाणी घाला. शिजल्यावर यातले पाणी एका वाटीत काढा. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये घेवड्याच्या शिजलेल्या शेंगा आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला आणि ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, मीठ, गूळ, दाण्याचे कूट, नारळाचा खव घाला. परत एकदा भाजी नीट ढवळून घ्या. नंतर शिजवलेल्या घेवड्याच्या शेंगातले पाणी काढून ठेवलेले घाला. नंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटे भाजी शिजू दे. थोड्यावेळाने गॅस बंद करा. पोळीपेक्षाही ही भाजी भाताबरोबर छान लागते.
Wednesday, May 29, 2013
मेथीची भाजी
जिन्नस :
मेथीची मोठी १ जुडी
लाल तिखट पाव चमचा
धनेजिरे पूड पाव चमचा
चवीपुरते मीठ
२ते ३ चमचे डाळीचे पीठ
२ते ३ चमचे चिरलेला कांदा
लसूण पाकळ्या चिरलेल्या २
१ ते २ मिरचीचे लहान तुकडे
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
मार्गदर्शन : मेथी निवडून धुवून घ्या. कूकरमध्ये शिजवून घ्या. कूकर गार झाला की त्यातली शिजलेली मेथी बाहेर काढा व त्यात डाळीचे पीठ मिक्स करा. मिक्स करताना त्यात गुठळी होऊन देवू नका. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ घालून डावेने भाजी एकसारखी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. नेहमी फोडणी करतो त्यापेक्षा जरा जास्त तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. फोडणीमध्ये चिरलेली मिरची, लसूण व कांदा घाला. कांदा लसूण बारीक चिरा. आच कमी करून हे सर्व जिन्नस थोडे परतून घ्या. नंतर त्यात मेथीचे तयार केलेले मिश्रण घाला. व थोडे पाणी घाला. भाजी ढवळा. एकसारखी करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. गॅस बंद करा. मेथीची भाजी तयार झाली आहे. कांदा लसूण फोडणीत घातल्याने एक छान चव येते. पोळीपेक्षाही ही भाजी गरम भाकरीशी जास्त छान लागते.
या भाजीला मेथीची गोळा भाजी म्हणतात.
Friday, May 24, 2013
फोडणीची साबुदाणा खिचडी
जिन्नस :
भिजलेला साबुदाणा अर्धी वाटी
दाण्याचे कूट मूठभर
दाणे २-३ चमचे
मटार मूठभर
पाव कांदा चिरलेला
एक छोटा बटाटा (काचऱ्या चिरतो त्याप्रमाणे चिरा)
हिरवी मिरचीचे तुकडे २ते ३
लाल तिखट पाव चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
फोडणीकरता तेल
मोहरी,जिरे, हिंग, हळद
मीठ चवीपुरते
साखर पाव चमचा
भिजलेला साबुदाणा हाताने ढवळून एकसारखा करून घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, साखर व दाण्याचे कूट घालून परत एकदा साबुदाणा एकसारखा ढवळून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. (हळद रंग येण्यापुरती अगदी थोडीच घालावी) नंतर त्यात मिरचीचे तुकडे, चिरलेला कांदा व बटाटा घाला. मटारही घाला. हे सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर त्यात अगदी थोडे मीठ घाला व झाकण ठेवा. फोडणीत घातलेले सर्व जिन्नस शिजले की त्यात साबुदाणा घाला. या साबुदाण्यात आपण आधीच दाण्याचे कूट, मीठ, साखर व लाल तिखट मिक्स करून ठेवले आहे. साबुदाणा घातला की परत एकसारखे ढवळून घ्या. नंतर झाकण ठेवून एक वाफ द्या. काही सेकंदाने झाकण काढा व परत ढवळा. आता थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एकसारखे करून घ्या. आता गॅस बंद करा. गरमागरम खिचडी खा. आवडत असल्यास थोडे लिंबू पिळा. या खिचडीची चव थोडी वेगळी लागते. मला ही चव आवडली. करून पहा. तुम्हालाही आवडेल.
Monday, May 20, 2013
तिखटामीठाच्या पुऱ्या
जिन्नस :
कणिक अडीच वाट्या
लाल तिखट दीड चमचा
धनेजिरे पूड दीड चमचा
हळद अर्धा चमचा
चवीपुरते मीठ
मूठभर चिरलेली कोथिंबीर
५-६ चमचे तेल (कणकेत घालायला)
तळणीसाठी तेल
मार्गदर्शन : कणकेमध्ये वरील सर्व जिन्नस घालून घट्ट कणिक भिजवा. अर्ध्या तासाने मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात पुरेसे तेल घाला. तेल जरा जास्ती घालावे म्हणजे पुरी फुगण्यास वाव मिळतो. भिजलेली कणिक अजून थोडी मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे करा व पुऱ्या लाटा. तेल तापले की त्यात सर्व पुऱ्या तळून घ्या. अडीच वाट्यांमध्ये ५० छोट्या पुऱ्या होतात. मधवेळी खाण्यास द्या. या पुऱ्या गरम खाल्या की बरोबर काहीही नसले तरी चालते इतक्या छान होतात. गार झाल्या तर लोणच्यामधेय थोडे दही घालून एकसारखे करा किंवा दाण्याची दह्यातली चटणी सोबत घ्या.
या पुऱ्या खुसखुशीत व कुरकुरीत होतात.
पुऱ्या चांगल्या होण्यासाठी टीपा :
कणीक भिजवताना मीठ अंदाजे घातले तरी सुद्धा तिखट मीठ घातल्यावर कणीक एकसारखी ढवळा आणि चव बघा. मीठ कमी असेल तर परत घाला. आळणी तिखटामिठाच्या पुऱ्या चांगल्या लागत नाहीत.
तासभर मुरू द्यावी.
तळणीसाठी तेल जरा जास्त घ्यावे म्हणजे पुरी फुगायला वाव मिळतो.
तेल व्यवस्थित तापू द्यावे.
तेल व्यवस्थित तापले आहे की नाही याकरता एक टीप आहे. कणकेचा खूप बारीक अगदी छोटा गोळा तेलामध्ये घालावा. तो जर पटकन वर आला तर तेल पुरीसाठी व्यवस्थित तापले आहे असे समजावे.
पुरी फुगण्यासाठी कडेने जास्त लाटावी.
पुरी तेलात सोडून ती लगेच फुगते जर का ती नीट लाटली असेल तर आणि शिवाय जर ती फुगली नाही तर झारेने त्यावर कढईतल्या कढईत पुरीच्या वर तेल घालावे म्हणजे फुगण्यास वाव मिळतो.
या तिखटामिठाच्या पुऱ्या मधवेळी करून खाऊ शकता. नंतर १ कप चहा. अथवा १ फळ किंवा ताक व दही,
२ ते ३ दिवस टिकतात त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पुरीसोबत बटाटा भाजी करून खा.
सहलीसाठी जाण्यासाठी उपयुक्त कोरड्या असल्याने.
पुऱ्या तळून झाल्या की पेपर टावेल वर ठेवा म्हणजे पुरीत असलेले जास्तीचे तेल निथळून जाईल.
Thursday, May 09, 2013
भाजलेले दाणे
दाणे २४ औंस
अल्युमिनियमचे पसरट भांडे
३५० degree F,, हे दाणे ४५ मिनिटे भाजत ठेवा. खूप छान भाजले जातात. जसे की कढईत भाजतो तसेच होतात. छान साले सुटतात.
Subscribe to:
Posts (Atom)
























