Monday, July 27, 2009

दही मिसळ





वाढणीः ४ जण

जिन्नसः
हिरवे मूग १ वाटी
२ टोमॅटो
२ कांदे
२ बटाटे
लसूण पाकळ्या ७-८
हिरव्या मिरच्या ५-६
आल्याचा छोटा तुकडा
लाल तिखट दीड चमचा
धनेजीरे पूड दीड चमचा
गरम मसाला दीड चमचा
थोडे दाण्याचे कूट
थोडा ओल्या नारळाचा खव
मीठ
कोथिंबीर
तेल
मोहरी, हिंग, हळद
पातळ पोह्यांचा चिवडा
शेव
दही
लिंबू १



क्रमवार मार्गदर्शनः

हिरव्या मुगाची उसळ : हिरवे मूग सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री चाळणीत ओतून ठेवा म्हणजे पाणी निथळून जाईल. पाणी निथळण्याकरता चाळणीखाली एक ताटली ठेवा. चाळणीवर पूर्ण मूग झाकून जातील अशी एक ताटली ठेवा. सकाळी त्याला मोड आलेले दिसतील. दुपारी १२ ते १ च्या सुमारास जेवणाच्या वेळेस मोड आलेल्या कडधान्याची उसळ करा. मी हिरवे मूग वापरले आहेत. मटकी, हिरवे मूग व मटकी मिक्स आवडीप्रमाणे घ्या. मध्यम आचेवर छोटा कुकर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यात तेल घाला व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. त्यात चिरलेला अर्धा कांदा व टोमटो घालून थोडे ढवळा. नंतर त्यात मूग घाला. नंतर लाल तिखट, धनेजीरे पूड , गरम मसाला व चवीपुरते मीठे घालून पूर्ण मूग भिजतील एवढे पाणी घालावे. नंतर थोडे ढवळून कुकरचे झाकण लावा व एक शिट्टी करा.

कांदे बटाट्याचा रस्सा : मध्यम आचेवर पातेले/कढई ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला व मोहरी, हिंग, हळद घालून लसूण आले व मिरचीचे वाटण घाला. ते थोडे फोडणीतच परतून घ्या. नंतर बटाटे व कांदे बारीक चिरून त्यात घाला. चवीपुरते मीठ घाला. अगदी थोडे दाण्याचे कूट व ओल्या नारळाचा खव घाला म्हणजे रस्सा दाट होईल. नंतर त्यात पाणी घालून झाकण ठेवा. वाफेवर कांदे बटाटे शिजतील. थोड्या वेळाने झाकण काढून त्यात थोडी चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले ढवळा. आता थोडी आच वाढवा व पाहिजे असल्यास पाणी घाला. हा रस्सा थोडा पातळ असावा.

कांदा टोमॅटोची कोशिंबीर : टोमॅटो व कांद्याची लाल तिखट, मीठ व थोडी साखर घालून कोशिंबीर करा. त्यात थोडी कोथिंबीर घाला.

आता एका खोलगट डीशमध्ये आधी उसळ घाला. नंतर त्यावर कांदे बटाट्याचा रस्सा व कांदे टोमॅटोची कोशिंबीर घाला. नंतर त्यावर चिवडा, शेव, दही घाला. दह्यावर थोडे लाल तिखट, धनेजीरे पूड, व थोडे मीठ घाला. शोभेकरता थोडी चिरलेली कोथिंबीर घाला व खावयास द्या. यावर पाहिजे असल्यास थोडे लिंबूही पिळा. उसळ व रस्सा गरम पाहिजे.

पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी दिली आहे. ही मिसळ झणझणीत नसल्याने लहान मुले व आजीआजोबांनाही आवडते. हा एक पौष्टिक व पोटभरीचा पदार्थ आहे.

Wednesday, July 08, 2009

पुरी

जिन्नस : कणीक २ वाट्या चवीपुरते मीठ तेल ६ चमचे कोमट पाणी तळण्यासाठी तेल क्रमवार मार्गदर्शन : कणकेमध्ये चवीपुरते मीठ व तेल घालून कोमट पाण्याने घट्ट भिजवा व तेलाचा हात घेऊन थोडी मळा. कणकेवर झाकण ठेवा. २० मिनिटे कणीक मूरू द्यावी. नंतर कढईत तेल घाला. तेल जरा जास्त घ्या म्हणजे साधारण अर्धी कढई होईल इतपत घ्या व मंद आचेवर कढई तापत ठेवा. पुऱ्या फुगायला तेल थोडे जास्त लागते. जास्त असलेल्या तेलात पुऱ्या तळल्या की त्या छान होतात. तेलाचा हात घेऊन मुरलेली कणीक चांगली मळून घ्या. एकसंध व नितळ दिसली पाहिजे. आता कणकेचा अर्धा भाग घ्या व त्याची जाड सुरनळी बनवा. नंतर त्याचे छोटे एकसारखे गोळे बनवून घ्या. नंतर परत अर्ध्या कणकेचे असेच छोटे गोळे बनवा. हे गोळे झाकून ठेवा.आता तापत ठेवलेल्या कढईची आच थोडी वाढवा. आणि पुऱ्या लाटायला घ्या. २ ते ३ पुऱ्या लाटून झाल्या की त्या आधी तळून घ्या. मग परत २-३ लाटा. लाटताना गरज पडली तर बोटाला थोडे तेल घेऊन पुरीच्या गोळ्याला लावा. पुरी लाटताना गोळा परत हाताच्या तळव्यावर ठेवून परत गोल गोल वळा व किंचित चपटा करा. पुरी सर्व बाजूने एकसारखी लाटा. पातळ लाटा, पण खूप पातळ नको. तेल व्यवस्थित तापले आहे का नाही याची चाचणी करा म्हणजे कणकेचा एक छोटा कण तापलेल्या तेलात घाला. तो जर लगेच पटकन वर आला तर तेल पुरेसे तापले असे समजावे. तेल जर का पुरेसे तापले नसेल तर तो सोडलेला छोटा कणकेचा कण तसाच तळाशी बसतो. आता आच मध्यम करा. २ पुऱ्या लाटल्या की एकेक करून तळा. तेल तापल्यामुळे पुरी फुगून वर येईल व तेलात तरंगायला लागेल. मग पुरी उलटा व झाऱ्याने कढईच्या बाजूला पुरीला धरा म्हणजे तेल निथळेल. पटकन फुगली नाही तर झाऱ्यानेच पुरीवर थोडे थोडे कढईतले तेल घाला. पुरी लगेच फुगेल. पुरी ब्राऊन रंगावर तळून काढा म्हणजे ती कच्ची राहणार नाही. तळून झाली की टीप कागदावर पुऱ्या काढून ठेवाव्या म्हणजे तेल निथळून जाईल व पुऱ्या तेलकट होणार नाहीत. काहींना कडक पुऱ्या आवडतात. कडक पुऱ्या करण्यासाठी आच मध्यम आचेपेक्षा थोडी कमी ठेवावी म्हणजे पुरी फुगणार नाही व ब्राऊन रंग यायला थोडा वेळ लागेल व पुरी तेलात जास्त वेळ राहिल्याने कडक होईल. पुरी चांगली लागते याबरोबर : श्रीखंडपुरी, आमरसपुरी, खीरपुरी, पुरीभाजी (उकडून बटाट्याची) पुरी सणासुदीला करतात, शिवाय लग्नकार्यात, व घरातल्या कोणत्याही शुभकार्यात करतात. आम्ही दोघी बहिणी लहानपणी फुगलेल्या पुरीला "टम्म" पुरी म्हणायचो. एकदा आईने थोड्या पुऱ्या साजुक तुपात तळल्या होत्या आणि आम्ही त्या आमरसाबरोबर खाल्या. खूपच छान लागल्या.

Tuesday, July 07, 2009

कारले काचऱ्या



जिन्नस :

कारली
लाल तिखट
धनेजीरे पूड
मीठ
साखर
दाण्याचे कूट
तेल
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी कारली पाण्याने धुवून घ्या व कोरड्या फडक्याने पुसून घ्या. कारल्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये. पूर्णपणे कोरडी झाली पाहिजेत. नंतर त्याच्या गोल व खूप पातळ चकत्या करा. त्यातल्या बिया काढून टाका. आता मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व ती तापली म्हणजे पुरेसे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात गोल व पातळ केलेले कारल्याचे काप घाला व परता. आता थोडी आच मंद करा. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढा व परता. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, चवीपुरते मीठ व थोडी साखर घाला. नंतर थोडी आच वाढवा व काचऱ्या व्यवस्थित परत परतून घ्या. परत एकदा त्यावर झाकण ठेवा व आच मंद करा. काही सेकंदांनी परत झाकण काढा व परता. ह्या काचऱ्या परतून परतून चांगल्या कुरकुरीत होतील. नंतर त्यात थोडे दाण्याचे कूट घाला व ढवळा. झाल्या तयार काचऱ्या. खूप छान लागतात. आमटी भाताबरोबर छान लागतात.

Monday, July 06, 2009

फ्लॉवर मटार



जिन्नस :

फ्लॉवर फुले ५ वाट्या
मटार १ वाटी
१ मिरची तुकडे करून
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजीरे पूड अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
फोडणीसाठी तेल
फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद व जीरे
अगदी थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ व साखर चवीपुरते

क्रमवार मार्गदर्शन : फ्लॉवरची फुले व मटार पाण्याने धूवून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात मोहरी, जीरे, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालून फ्लॉवर व मटार घाला. आता आच थोडी कमी करा व भाजी परतून घ्या. त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून परत थोडे ढवळा. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, व गरम मसाला घाला. चवीपुरते मीठ व साखर घाला. चिरलेली थोडी कोथिंबीर घाला व कालथ्याने भाजी परता. थोडी परतली की त्यावर परत झाकण ठेवा. व काही सेकंदांनी परत झाकण काढून भाजी ढवळा. ही भाजी पटकन शिजते. ही भाजी खूप शिजवू नका. चव चांगली येत नाही. शिजली की लगेच गॅस बंद करा.

Thursday, July 02, 2009

सातुचे पीठ

जिन्नस :

गहू २ वाट्या
हरबरा डाळ १ वाटी
उडीद डाळ अर्धी वाटी

मध्यम आचेवर कढई तापत ठेवा व त्यात वरील धान्य खमंग भाजून घ्या. गार झाले की गिरणीतून दळून आणा. थोडे रवाळ दळा.

वरील पीठात दूध साखर/गुळ घालून मिक्स करून तसेच खातात. छान लागते. पौष्टीक आहे. लाडू करायचे झाल्यास खालीलप्रमाणे करा.

वरील दळून आणलेले पीठ परत एकदा साजूक तूपावर खमंग भाजा. पीठ भाजून झाले की जेवढे पीठ घ्याल तेवढाच गूळ घाला व त्याचे लाडू वळा. हे लाडू पण चविष्ट लागतात.

Thursday, June 25, 2009

सजावट

सजावट

गव्हले




जिन्नस

रवा मोठे ४ चमचे
मैदा/all purpose flour २ चमचे
साजुक तूप १ चमचा
अगदी थोडे मीठ
पीठ भिजवण्यापुरते दुध

क्रमवार मार्गदर्शन : रवामैद्यामध्ये साजूक तूप व अगदी थोडे मीठ घाला. पीठ भिजवण्यापुरते दूध घ्या आणि घट्ट पीठ भिजवा. पीठ झाकून ठेवा. हा रवामैदा २ तास मूरू द्या. नंतर त्याचे गव्हले वळायला घ्या. गव्हले वळताना दुधाचा हात घेऊन पीठ मळून घ्या. व पीठाची एक पातळ सुरनळी बनवा. सुरनळ्या अगदी छोट्या छोट्या घेतल्या तरी चालेल. डाव्या हातात सुरनळीचे टोक घ्या व डाव्या हाताची २ बोटे वापरा वळायला. अंगठा व त्याशेजारील बोट आणि उजव्या हाताच्या २ बोटांनी वळलेल्या सुरनळीचे बारीक बारीक तुकडे पाडा. तुकडे पाडताना पण ते वळून घ्या. दोन्ही हातानी सुरनळी वळली जाऊन गव्हले पाडा. उजव्या हाताची पण तीच दोन बोटे वापरा. अंगठा व त्या शेजारील बोट. हे गव्हले साधारण तांदुळ ज्याप्रमाणे दिसतात तसे वळले गेले पाहिजेत. बारीक आणि पातळ. वळताना खाली एक पेपर ठेवा म्हणजे वळता वळता गव्हले या कागदावर पडतील. ते असेच वाळू द्या. याला उन्हाची गरज लागत नाही. कडकडीत वाळले की डब्यात भरून तो फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकतील. या गव्हल्यांची खीर बनवतात शेवयांसारखी. लग्नकार्यात गव्हले करतात.

Thursday, June 18, 2009

गाजर टोमॅटो कोशिंबीर



जिन्नस :

लाल टोमॅटो
गाजर
हिरवी मिरची चवीपुरती चुरडून
थोडे दाण्याचे कूट
थोडा ओला नारळ
थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीपुरते
चवीपुरती साखर

वरील सर्व जिन्नस एकत्र करा. कोशिंबीर तय्यार!

सजावट (१०)



गाजर, पालकाची पाने, रासबेरी, लाल मुळा

Wednesday, June 10, 2009

रगडा पॅटीस






वाढणी २ जण


जिन्नस :

वाटाण्यांची उसळ


हिरवे वाटाणे १ वाटी
बारीक चिरलेले लसुण मिरची व बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिळून १ वाटी
उकडलेला बटाटा अर्धा
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
मीठ


कृती : हिरवे वाटाणे आदल्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री पाणी बदला. आधीचे पाणी काढून टाका व परत नवीन घाला. दुसऱ्या दिवशी दुपारी रगडापॅटीस करणार असाल १२ वाजता जेवणासाठी तर त्या आधी २ तास वाटाणे चाळणीत काढून घ्या पाणी निथळण्यासाठी. मध्यम आचेवर कूकर तापत ठेवा. तो व्यवस्थित तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बारीक चिरलेले लसूण, मिरची, कांदा व टोमॅटो घालून थोडे परता. परतून झाले की त्यात वाटाणे घालून ढवळा. नंतर त्यात उकडलेला बटाटा लाल तिखट, धनेजीरे पूड, चवीपुरते मीठ व पाणी घाला. वाटाणे बुडून थोडे वर पाणी घाला. एक शिट्टी करा. ही झाली वाटाण्याची उसळ.


पॅटीस :

उकडलेले बटाटे मोठे २
धनेजीरे पूड १ चमचा
लाल तिखट १ चमचा
मीठ चवीपुरते
तेल

कृती : उकडलेले बटाटे खूप बारीक कुस्करून घ्या. हाताने नीट कुस्करले गेले नाहीत तर किसणीने किसून घ्या. त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड व मीठ घालून हे मिश्रण हाताने नीट कालवा. सगळीकडे तिखट मीठ लागले पाहिजे. त्याचे हवे तसे बारीक मोठे चपटे गोल पॅटीस करा. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर थोडे तेल घाला. कालथ्याने हे तेल पसरून घ्या. मग त्यावर एका वेळेला ५-६ तयार केलेले बटाट्याचे पॅटीस तव्यावर ठेवून चांगले दोन्ही बाजुने खरपूस भाजा.


सजावट :

बारीक चिरलेला कांदा २ वाट्या
बारीक चिरलेला टोमॅटो २ वाट्या
बारीक चिरलेली कोथिंबीर २ वाट्या
चिंचगुळाचे दाट पाणी २ वाट्या
कोथिंबीर व हिरवी मिरचीचे वाटण २ वाट्या
लाल तिखट
धनेजीरे पूड
मीठ
साखर
थोडा लिंबाचा रस
बारीक शेव


सर्वात आधी एका खोलगट डीश मध्ये तयार केलेले पॅटीस ठेवा. नंतर त्यावर उसळ घाला. नंतर त्यावर चिंचगुळाचे पाणी, मिरची कोथिंबीरीचे वाटण घाला. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. नंतर त्यावर थोडी बारीक शेव घाला. नंतर त्यावर आवडीनुसार थोडे लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडे मीठ व थोडी साखर पेरा. नंतर त्यावर हवे असल्यास थोडा लिंबाचा रसही घाला. उसळ व पॅटीस गरम गरम हवे. असे हे गरम, तिखट, आंबट गोड मिश्रण खूप चविष्ट व छान लागते. तोंडाला छान चव येते. उत्साह येतो. असा हा रगडा पॅटीस मला खूप आवडतो.

Tuesday, June 09, 2009

सजावट (९)


कोथिंबीर, कांदा, टोमॅटो

भेळपुरी



जिन्नस:


चुरमुरे
फरसाण
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक चिरलेला उकडलेला बटाटा
बारीक चिरलेली काकडी
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक शेव
कोथिंबीर व हिरव्या मिरच्यांचे वाटण
चिंचगुळाचे दाट पाणी
लाल तिखट
धनेजीरे पूड
थोडे मीठ
थोडी साखर
थोड्या पाणीपुरीच्या पुऱ्या चुरडून


वरील सर्व गोष्टी एकत्र करा. एक चविष्ट भेळ तयार होईल.




माहितीचा स्त्रोत : सौ दिप्ती जोशी

Friday, May 29, 2009

सजावट (८)


किसलेले चीझ, कोथिंबीर, गाजर, टोमॅटो

ओली भेळ



जिन्नस:


चुरमुरे (कोल्हापुरी पांढरे शुभ्र व टपोरे असल्यास उत्तम), फरसाण
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला टोमॅटो
लाल तिखट, धणेजीरे पूड, मीठ,
चिंचगुळाचे दाट पाणी
भाजलेले अथवा कच्चे दाणे


वरील सर्व जिन्नस एकत्र करा. एक चविष्ट भेळ तयार होईल.


माहितीचा स्रोत: पुण्याच्या पुष्करिणी भेळेच्या निरिक्षणातून

Sunday, May 10, 2009

पाव भाजी



जिन्नस :


मटार २ वाट्या
बटाटा १
मध्यम आकारात चिरलेला कोबी १ वाटी
मध्यम आकारात चिरलेला फ्लॉवर
मध्यम आकारात चिरलेली सिमला मिरची
टोमॅटो ४
लाल तिखट २ चमचे
धणेजीरे पूड २ चमचे
मीठ
पावभाजी मसाला २ चमचे (बादशाह किंवा एम. डी. एच मसाला)
बटर ८-१० चमचे
लसूण मिरची पेस्ट २ चमचे
खूप बारीक चिरलेला कांदा २ चमचे
ब्रेड स्लाईस ४


सजावटीसाठी :


खूप बारीक चिरलेला कांदा
खूप बारीक चिरलेला टोमॅटो
खूप बारीक चिरलेली कोथिंबीर
बटर
किसलेले चीझ
लिंबाची फोड


क्रमवार मार्गदर्शन : कोबी, मटार, फ्लॉवर, सिमला मिरची, बटाटा व टोमॅटो कूकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना त्यात थोडे पाणी घाला. कूकर गार झाला की सर्व भाज्या काढा, व त्यात असलेले जास्तीचे पाणी काढून टाका. सर्व भाज्या एका चाळणीमध्ये घाला म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल. बटाट्याची व टोमॅटोची साले काढा. टोमॅटो व्यतिरिक्त सर्व भाज्या एका डावेने घोटून घ्या म्हणजे या सर्व भाज्यांचा एक लगदा तयार होईल. टोमॅटो मिक्सर मधून बारीक करून घ्या म्हणजे त्याचा रस तयार होईल.


मध्यम आचेवर पातेले ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात बटर, घाला. ते वितळले की अगदी लगेचच लसूण मिरची पेस्ट, व बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन कलर येईपर्यंत परता. नंतर त्यात तयार केलेला भाज्यांचा लगदा घाला. आता आच थोडी कमी करा. नंतर त्यात लाल तिखट, धणेजीरे पूड, पाव भाजी मसाला व चवीप्रमाणे मीठ घालून भाजी ढवळा. आता त्यात ४ चमचे बटर घाला. नंतर त्यात टोमॅटोचा रस घाला व परत एकदा ढवळून घ्या. ५ मिनिटांनी त्यात अजून ४ चमचे बटर घालून सर्व बाजूने भाजी एकसारखी ढवळा. ही झाली पाव भाजी मधली भाजी.


मध्यम आचेवर तवा ठेवून तो तापला की त्यावर बटर घाला व त्यावर ब्रेड ठेवून दोन्हीकडून ब्रेड चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.


पाव भाजी खायला देताना भाजीवर थोडे बटर, किसलेले चीझ, चिरलेला कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून द्या. सोबत लिंबाची फोड व हवी असल्यास एक मिरची तळून त्यावर थोडे मीठ पेरून द्या. गरम गरम खा. पावभाजी हा एक पौष्टीक व चविष्ट पदार्थ आहे.

Thursday, April 30, 2009

पोळीचा लाडू


वाढणी : २ जण

जिन्नस :

शिळ्या पोळ्या २
चिरलेला गूळ ४ चमचे
पातळ साजुक तूप ३ ते ४ चमचे
गोटा खोबरे/कोरडे खोबरे किसून ३-४ चमचे
खसखस अर्धा चमचा


मार्गदर्शन : शिळ्या पोळ्यांचा हाताने अथवा मिक्सर मधून कुस्करा करा/बारीक करा. त्यात गूळ व साजुक तूप घाला. किसलेले कोरडे खोबरे व खसखस एका कढल्यामध्ये भाजून घ्या. गार झाल्यावर पोळीच्या कुस्कऱ्यामध्ये घाला. हे सर्व मिश्रण एकत्र हाताने कालवून त्याचे हवे त्या आकाराचे लाडू करा. २ पोळ्यांमध्ये लहान ५-६ लाडू होतात. गूळ, खसखस आणि कोरडे खोबरे घातल्याने खमंग लागतात. चित्रात दाखवलेल्या लाडवामध्ये खोबरे व खसखस नाही.

Monday, April 20, 2009

श्रावणघेवडा - बटाटा - टोमॅटो

जिन्नस :


खूप बारीक चिरलेला श्रावणघेवडा उर्फ ग्रीन बीन्स ३ वाट्या
१ मधम टोमॅटो
एक खूप लहान बटाटा साले काढून
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा धणेजीरे पूड
पाऊण चमचा गरम मसाला
४-५ चमचे दाण्याचे कूट
४-५ चमचे ओल्या नारळाचा खव
पाव चमचा साखर
चवीपुरते मीठ
अर्धी वाटी पाणी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग हळद



क्रमवार मार्गदर्शन :



टोमॅटो व बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. नंतर मध्यम आचेवर एक छोटा कूकर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यात फोडणीसाठी तेल घाला. तेल तापले की त्यात मोहरी हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात चिरलेला श्रावणघेवडा उर्फ ग्रीन बीन्स, चिरलेला बटाटा व टोमॅटो घाला. लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला, दाण्याचे कूट, नारळाचा खव, साखर, मीठ व अर्धी वाटी पाणी घाला. हे सर्व घातले की डावेने भाजी नीट ढवळून घ्या म्हणजे मसाला सर्व भाजीला एकसारखा पसरला जाईल. नंतर कूकरचे झाकण लावून एक शिट्टी करा व गॅस बंद करा. ही एक पळीवाढी भाजी तयार होईल. पोळीभाताबरोबर छान लागते.

Sunday, April 19, 2009

लसूण चटणी

वाढणी : २ जण (साधारण ८ दिवस पुरेल)

जिन्नस:

मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या ४ ते ५
खोबरे कीस २ वाट्या
लाल तिखट १ चमचा
जिरे १ चमचा
साखर अर्धा चमचा
चवीनुसार मीठ


वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर/ग्राइंडर वर बारीक करा। लोखंडाच्या खल बत्यात ही चटणी बारीक केली तर अजुनही चव छान येते. तांदुळ मुग डाळीच्या गरम गरम खिचडीबरोबर जास्त छान लागते.

Friday, April 17, 2009

भरली तोंडली


वाढणी : २ जण



जिन्नस :




तोंडली २० ते २२ नग
ओल्या नारळाचा खव अर्धी वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
तीळ कूट पाव वाटीच्या कमी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
गूळ चिरून 5-6 चमचे
मीठ
चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद


क्रमवार मार्गदर्शन : तोंडली पाण्याने धूवून ती रोवळीत पाणी निथळण्यासाठी ठेवा. पाणी निथळले की कोरड्या फडक्याने पुसून घ्या. प्रत्येक तोंडल्याची देठे काढा दोन्ही बाजुने. नंतर दोन्ही बाजूने अगदी थोडे चिरा मसाला भरण्यासाठी. नारळाचा खव, दाणे व तीळाचे कूट, लाल तिखट, गरम मसाला, धनेजीरे पूड, गूळ, चवीपुरते मीठ व चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मसाला तयार करून घ्या. मसाल्याची चव बघा. काही कमी जास्त हवे असल्यात ते जिन्नस घाला. नंतर प्रत्येक तोंडल्यामध्ये मसाला भरून घ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे. मसाला पूर्ण भरून झाला आणि तरीही थोडा उरला तर तो उरलेला मसाला वाटीत भरून ठेवा.



मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती तापली की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व लगेच त्यात मसाला भरलेली तोंडली घालून थोडी ढवळून घ्या. आच मध्यम असुदेत. त्यावर झाकण ठेवा. वाफेवर ही तोंडली शिजतील. काही सेकंदांनी झाकण काढा व त्यात थोडे पाणी घाला. परत झाकण ठेवा. व परत ते काढून परत पाणी घाला. उरलेला मसालाही त्यात घाला. मसाला उरला नसेल आणि कमी वाटत असेल तर नंतर हवा तसा मसाला वरूनही घालता येतो. वाफेवर तोंडली शिजली की गॅस बंद करा. तोंडली शिजली की त्याचा रंग बदलेल. आणि शिवाय डावेने टोचूनही बघा. तोंडली सहज तुटली की ती शिजली असे समजावे. पाणी पण ज्याप्रमांणे रस हवा असेल त्याप्रमाणात घालावे.



ही भरली तोंडली खूपच चविष्ट लागतात. पूर्वी लग्नकार्यामधे मुंबईत ही भरली तोंडली खाल्ली आहेत. बऱ्याच प्रमाणात करायची असेल तर तोंडली आधी कूकर मध्ये शिजवून घ्यावीत. ती खूप गार झाली की मग त्यामध्ये मसाला भरावा. पोळीभाताबरोबर छान लागतात. नुसती वाटीत घेऊन खायला पण मस्त लागतात.

Thursday, April 16, 2009

कारली रस भाजी

वाढणी : २ जण


जिन्नसः



हिरवीगार कारली २ मध्यम आकाराची
तीळकूट पाव वाटी
दाण्याचे कूट अर्धी वाटी
लाल तिखट १ चमचा
धनेजीरे पूड १ चमचा
गरम मसाला १ चमचा
नारळाचा खव अर्धी वाटी
चिंचगुळाचे दाट आंबटगोड पाणी अर्धी ते पाऊण वाटी
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
मीठ



क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी कारली धुवून घ्या. ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. नंतर त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात तेल घाला. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घ्या. तेल तापले की त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व त्यात कारल्याच्या फोडी घालून त्यावर झाकण ठेवा. वाफेवर कारली शिजतील. अधून मधून झाकण काढून थोडे ढवळा. कारली अर्धवट शिजली की त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला, चिंचगुळाचे दाट पाणी व चवीपुरते मीठ घाला. थोडे ढवळून परत त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून त्यात तीळकूट, दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला. परत भाजी सर्व बाजूने नीट ढवळा. आता थोडे पाणी घालून अजून थोडी शिजवा. शिजवल्यावर ही भाजी थोडी आटून दाट होते. अजून पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे. वर मसाल्याचे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा थोडे जास्त घेतले तरी चालेल. कारली शिजली आहेत की नाही हे पाहण्याकरता ती डावेने मोडून पहा.

Wednesday, April 15, 2009

तोंडली काचऱ्या

जिन्नस:

खूप पातळ चिरलेल्या तोंडल्याच्या गोल चकत्या
एक मिरची (जाड तुकडे)
फोडणीसाठी तेल
मोहरी, हिंग, हळद
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडा ओल्या नारळाचा खव
लाल तिखट
धनेजीरे पूड
गरम मसाला
मीठ
साखर



क्रमवार मार्गदर्शन : मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला व मोहरी, हिंग हळद घालून फोडणी करा. त्यात बारीक चिरलेल्या तोंडल्याचा गोल चकत्या व मिरच्यांचे जाड तुकडे घालून कालथ्याने परता. नंतर त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदानी झाकण काढून परत ही भाजी परता. असे २-४ वेळा केले की भाजी अर्धवट शिजेल. मग त्यात चवीप्रमाणे लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला मीठ घाला. थोडी साखरही घाला. परत एकदा चांगली ढवळा/परतून घ्या. यावेळेस आच थोडी वाढवा. परतून परतून भाजी करा. आता त्यात चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खव घाला व परत एकदा परतून झाकण ठेवा. काही सेकंदांनी झाकण काढून ढवळा/परता. तोंडली शिजली आहे की नाही हे बघण्याकरता कालथ्याने एक तोंडल्याची चकती टोचून बघा. ती तुटली तर तोंडली चांगली परतली/शिजली गेली आहेत हे समजावे.



या तोंडल्याच्या काचऱ्या खूप खमंग लागतात. लोखंडी कढईत केलेली ही भाजी खूपच खरपूस व खमंग लागते. पोळीबरोबर छान लागते. मला तर या काचऱ्या नुसत्या वाटीत घेऊन खायला आवडतात.

Monday, April 13, 2009

बेला

शीर्षकाचे नाव वाचून तुम्हाला कदाचित वाटेल की ही बाई बहुतेक मुलीबद्दल लिहीत आहे. बेला म्हणजे बेला हो! बेसन लाडू! एक नंबरचा हट्टी, पण तरीही खूप आवडता!


लग्न झाले की प्रत्येक मुलीला काहीतरी नवीन पदार्थ करण्याची हुक्की येते, तशी मला पण आली काही वर्षांपूर्वी. लाडू चिवडा करण्याचे ठरवले. गोडतिखटामध्ये मला तिखट पदार्थ खूपच आवडतात त्यामुळे सहसा बिघडत नाहीत. गोडाच्या फंदात कमी पडते. बेलाबद्दल आई मावशी व माम्यांकडून बरेच काही ऐकले होते. बेला खूप सोप्पा आहे त्यामानाने र. ला. अवघड. आता हा र. ला कोण!? र. ला म्हणजे बेलाचा भाऊ रवा लाडू. रवा लाडू पाकातच होतात आणि पाक म्हणजे खूप किचकट प्रकार, आपल्याला तो कधीच जमणार नाही, त्यामुळे र. ला. च्या भानगडीत कधीच पडायचे नाही असे ठरवले होते.


तर ऐकीव माहितीवर बेला करायचे ठरवले. आईचे वाक्य आठवले. बेसन लाडवाला खमंग भाजले गेले पाहिजे की छान होतात लाडू. ठरले तर मग! बेला आमच्या दोघांचाही आवडीचा. गॅस पेटवला, कढई ठेवली. तूप बेसन घातले आणि कालथ्याने ढवळायला लागले. काही वेळाने बेसन रंग बदलायला लागला. मनातून खूप खूश झाले. बेसनाचा रंग बदलला. तो काळपट चॉकलेटी दिसू लागला. बेसनाला खमंग वास येत नव्हता म्हणून अजून थोडे भाजले. डोक्यात फक्त एकच की बेसन खमंग भाजले गेले पाहिजे. बाकी तूप किती घ्यायचे, गॅस तीव्र ठेवायचा की मध्यम? की मंद? हे काहीही माहित नव्हते. गॅस बंद केला. त्यात पिठीसाखर घालून थोडे ढवळले.


गार झाल्यावर वळायला घेतले तेव्हा मला जरा संशय आला. हे असे काय दिसत आहेत लाडू!?? ५-६ वळल्यावर देवाला नैवेद्य दाखवल व एक लाडू खाल्ला. चव अजिबातच चांगली नव्हती. काय चुकले असावे? मूडच गेला. विनायक कामावरून आल्यावर म्हणाला काय गं , काय झाले? "काही नाही रे. लाडू साफ बिघडले आहेत." हे बेसन लाडू नाही तर काळे लाडू झाले आहेत. मी तर याला "काळे लाडू" असेच नाव दिले आहे. विनायकने एक लाडू खाल्ला. माझे मन न दुखवण्याच्या हेतूने म्हणाला. चांगले झालेत की लाडू. मी नाक मुरडून चांगले कुठचे? दिसायला काळे व बेचव लाडू झालेत. मी ते सर्व फेकून देणार आहे. आच तीव्र ठेवल्याने हा प्रकार झाल्याचे लक्षात आले होते. तूप कमी झाल्याने थोडे भुरभुरीत पण दिसत होते.


परत एकदा ऐकीव माहितीवर आधारीत प्रयोग केला! बेलाला तूप भरपूर लागते हं ! नाहीतर वळले जात नाहीत आणि चविष्टही होत नाहीत. परत एकदा बेसनतुपाचे मिश्रण कढईत व कढई गॅसवर पण यावेळी आच मध्यम. ढवळायला सुरवात केली. काही वेळाने वास, रंग, सारं कसं छान छान!! यावेळेला अगदी व्यवस्थित जमलेत. हं..... म्हणजे तूप पण सढळ हाताने घालावे लागते तर! पिठीसाखर घातली. ढवळले. गार झाल्यावर लाडू एकदम छान झाले! नितळही दिसत होते! ताटात ठेवले. नैवेद्य दाखवून एक तोंडात घातला. अहाहा! चवीला छानच! खुसखुशीत शिवाय नितळही, दिसायला पण छान! एका ताटात सर्व लाडू एकेक करून वळून ठेवले. त्यावर एक पेपर ठेवला. पूर्ण गार झाले की भरू या डब्यात. काही कामानिमित्ताने बाहेर गेले. आल्यावर बघते तर काय! सर्व लाडू बसलेले! बसले तर बसू देत. पण इतके काही ऐसपैस बसले की एकमेकात मिसळून गेले! परत मग तो सर्व गोळा भरला डब्यात. नंतर थोडे थोडे करून खाल्ले मिश्रण. त्यावेळेला अंदाज आला की आपण लाडू "छान" होण्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत!


तिसऱ्या प्रयोगाच्या वेळी लाडू "सर्वांगसुंदर" झाले. तुपाचे प्रमाण निश्चित कळाले आणि तेही कसे घालायचे तेही कळाले. तूप पातळ घालून बेसनामध्ये घालायचे आणि एकीकडे कालथ्याने ढवळायला घ्यायचे. बेसन पूर्णपणे भिजेल इतकेच घालायचे. बेसन पूर्णपणे भिजले गेले पाहिजे पण अति भिजायला नको. परत जेव्हा लाडू करीन तेव्हा तूपाचे नक्की प्रमाण देईनच. बेलाचे सर्व हट्ट पुरवले तरच तो शहाण्यासारखा वागतो.


बेला माझ्या तरी खूप आवडता आहे, तुमचा आहे का?

Friday, April 10, 2009

सजावट (७)


काकडी, गाजर, लाल मुळा, कोथिंबीर

Wednesday, April 08, 2009

डाळ पालक

वाढणी : २ जण


जिन्नस :



अडीच ते ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
अर्धी वाटी तुरीची/मुगाची डाळ
१ लहान टोमॅटो
२ पाकळ्या लसूण बारीक चिरून
चिरलेला जाड कांदा थोडासा
मिरची अर्धी जाड तुकडे करून
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजीरे पूड अर्धा चमचा
मीठ चवीपुरते
फोडणीकरता तेल
मोहरी, हिंग, हळद
१ वाटी पाणी


क्रमवार मार्गदर्शन : चिरलेला पालक चाळणीमध्ये पाण्याने धुवून घ्या व निथळत ठेवा. त्याचवेळेला अर्धी वाटी डाळही पाण्यामध्ये भिजत घाला. साधारण १५ ते २० मिनिटांनी पालकामधले निथळलेले पाणी काढून टाका. पाणी निथळण्यासाठी चाळणीखाली एक ताटली ठेवा. भिजत घातलेल्या डाळीमधले पाणी पण काढून टाका.



आता एक छोटा कूकर मध्यम आचेवर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यामध्ये तेल घाला. ते पुरेसे तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कांदा व टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला पालक व तुरीची/मुगाची डाळ घाला. लाल तिखट, धनेजीरे पूड व चवीपुरते मीठ घालून परत एकदा डावेने ढवळून घ्या. नंतर त्यामध्ये १ वाटी पाणी घाला. परत एकदा डावेने ढवळून घ्या व कूकरचे झाकण लावा. १ शिट्टी झाली की गॅस बंद करा.



एक चविष्ट व पौष्टीक पळीवाढी भाजी तयार होईल. ही पोळी भाताबरोबर छान लागते. शिवाय नुसती वाटीतून गरम गरम खायलाही छान लागते. ही भाजी तुरीच्या डाळीची जास्त छान लागते.



माहितीचा स्त्रोत : मैत्रिण सौ सुनिता येमुल
मूळ रेसिपीमध्ये मी थोडा बदल केला आहे.

Tuesday, April 07, 2009

पोळी प्रकरण

माझा आणि पोळीचा संबंध तसा अगदी लहानपणीच आला साधारण ४थी ५वीत असताना. आम्ही दोघी बहिणी व आमची एक मामेबहीण जी आमच्यापेक्षा दोन एक वर्षांनी मोठी होती. आम्ही तिघी नेहमी भातुकलीचा खेळ खेळायचो. या खेळामध्ये कच्चे पोहे, दाणे व गूळ हे ठरलेले असायचे. एकदा खेळता खेळता विचार केला की पोहे दाणे गूळ हे नेहमीचेच झाले, आपण खराखुरा स्वयंपाक करायचा का? पण काय करायचा? यावर एकमताने ठरले की पोळी व बटाट्याच्या काचऱ्या करायच्या. ठरले, जाड जाड बटाट्याच्या फोडी केल्या. मामेबहिणीला गॅस कसा पेटवायचा माहीत होता. खरीखुरी कणीक भिजवली. ती अर्थातच खूप सैल झाली! नक्की काय करायचे काहीच माहीत नव्हते. खूप तापलेल्या तव्यावर मोडकी तोडकी पोळी टाकली आणि उलटायला गेलो तर हातच भाजला. खूप धूर व्हायला लागला. घाबरलो. पटकन गॅस बंद करून कालथ्याने तव्याला चिकटलेली पोळी कशीबशी काढली. खूप वेळा खसाखसा घासून सुद्धा काळ्याकुट्ट झालेल्या तव्यात काहीच सुधारणा दिसली नाही म्हणून आम्ही एक युक्ती केली. ताटाळ्यात सगळ्यात मागे तवा ठेवून दिला! अर्थात लगेचच आईला झालेला प्रकार कळलाच!!

लग्न झाल्यावर सासरी माझी हालत झाली. घरात माणसे बरीच, शिवाय आला गेल्याचे घर. माझ्या सासरी अजुनही बऱ्याच पोळ्या करायला लागतात. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कणकेतच हात घालावा लागतो. लग्न झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात कणीक भिजवायची माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली. कणीक खूपच "घट्ट" भिजली गेली. सासुबाई म्हणाल्या एकटी लाटू नकोस गं पोळ्या. आपण दोघी मिळून लाटू. पोळ्या लाटताना म्हणाल्या, "अगं रोहिणी किती घट्ट भिजवली आहेस गं कणीक. मग त्यांनी त्यांच्या वाटणीची कणीक पाणी घालून घालून सैल केली व पोळ्या केल्या. मी मात्र तश्याच घट्ट कणकेच्या पोळ्या केल्या. नंतर चांगलेच जाणवले हात खूप दुखायला लागल्यावर!

आदल्या दिवशीचा अनुभव लक्षात घेता दुसऱ्या दिवशीची कणीक सैल भिजवली. ती इतकी काही सैल झाली की त्याच्या पोळ्याच लाटता येईनात. त्यात आणखी कणीक घालून घालून चौपट कणीक भिजली गेली. मग मात्र मी सासुबाईंना म्हणाले की तुम्हीच मला कणीक भिजवून द्या. मी सर्व पोळ्या करीन. मला म्हणाल्या की एकदा तू मला कणीक भिजवताना बघ म्हणजे तुला कणीक कशी भिजवतात ते कळेल.

काही दिवसांनी चुलत सासऱ्यांकडे गेलो. तिथल्या पोळ्या पाहून तर मी चाटच पडले. मी जिथे पाहुणी म्हणून जाते तिथे मी आपणहून पोळ्यांचे काम घेते कारण इतर तिखट मीठ कुठे ठेवले हे आपल्याला माहीत नसते, ते त्या घरातील बायकांनाच माहीत असते. त्यातून आपण सासुरवाशीण म्हणल्यावर कोणते तरी काम करणे आलेच. मी सरसावले पुढे पोळ्या करायला. तर चुलत सासुबाई म्हणाल्या अगं रोहिणी तू बाजुला बस. पोळ्यांच्या भानगडीत पडू नकोस. तू इतकी बारीक आहेस की पोळ्या लाटता लाटता चक्कर येऊन पडशील इतक्या पोळ्या लागतात आमच्या घरी. त्या म्हणाल्या आम्ही पण या पोळ्यांच्या भानगडीत पडत नाही. ते काम त्यांच्या सासुबाईंचे असते. दोन चुलींवर दोन तवे ठेऊन त्या पटापट पोळ्या लाटतात.

माझ्या आईच्या व सासुबाईंच्या पोळ्या किती छान होतात मग आपल्यालाच का नाही तशा जमत?! एकदा मी माझ्या मामेबहिणीला सांगितले की तू मला शिकव ना पोळ्या करायला मला अजून नीट नाही जमत. तर म्हणाली की अगं तू नवीनच आहेस अजून. मला तरी लग्नाच्या आधी कुठे येत होत्या? एकदा करायला घेतल्यास की आपोआपच जमतील. तु जितक्या जास्त पोळ्या लाटशील तितक्या तुला त्या जमतील. आपोआप कळत जाते त्यात काही अवघड नाही.

मग ठरवले की आपण विनायकलाच गुरू करायचे. त्याला सांगितले की पानात वाढले की प्रत्येक पदार्थ कसा झाला आहे ते सांग. पूर्णपणे बिघडला आहे असे सांगितलेस तरी चालेल. मला वाईट वाटणार नाही. पोळ्या पण कशा होत आहेत ते सांग. शिवाय हेही ठरवले की कुणाकणे गेले की आपणहून पोळ्यांचे काम करायला घ्यायचे नाही की जे मी आधी करत होते. याउलट बहिणी, आई, सासुबाई, मैत्रिणी यांच्याकडे गेले की गप्पा मारता मारता त्या पोळ्या करायला लागल्या की त्यांच्या शेजारी जाऊन निरिक्षण करायचे.

पहिल्याप्रथम सासुबाई. त्या काय करतात की कणकेचा छोटा गोळा घेऊन लाटतात, त्याची तेल लावून त्रिकोणी घडी करतात आणि पीठ लावून एकदा का लाटणे पोळीला लावले की काही सेकंदातच त्याची गोल पोळी तयार होते. त्यांची पोळी गोल गोल फिरते. वाव! किती सोपे ना! ठरले, पोळी करायला घेतले पण पोळी गोलगोल न फिरता मीच गोल गोल फिरायला लागले. ओम फस!! सासुबाई पोळी भाजताना आच तीव्र करतात. दोन तीन वेळा उलटतात. छान टम्म फुगलेली पोळी तय्यार! पोळी लाटायच्या वेळेला मात्र त्या आठवणीने गॅस एकदम मंद करतात. असे तंत्र वापरायला गेले पण जमले नाही. एक तर दुसरी पोळी करताना गॅस बारीक करायला विसरायचे, बरं गॅस बारीक केला तर प्रत्यक्ष पोळी करताना आच तीव्र करायलाही विसरायचे. सासुबाईंचे कणीक भिजवण्याचे तंत्र मात्र एकदम छान जमले.

आता आई! आईपण तिकोणी घडीचीच पोळी लाटते. लाटताना एकदा डावीकडून व एकदा उजवीकडून लाटणे फिरवते. अशी पोळी मी लाटून पाहिली पण हे तंत्र मला खास पटले नाही. पोळ्या भाजताना आई आच ठेवते ती मध्यम आचेच्या थोडी वर. हे तंत्र मात्र मला मनापासून पटले. याचा फायदा असा की तवा एकाच तापमानाला व सतत तापत राहतो आणि दुसरे म्हणजे एक पोळी लाटता लाटता अगदी त्याच वेळेला तव्यावरची पोळी पण भाजली जाते. म्हणजे लाटण्यामध्ये व भाजण्यामध्ये अजिबात खंड नाही. एकाचवेळी दोन कामे. वेळेची बचत! सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तव्यावरून पोळी काढल्यावर ती तव्यावर मोडायची म्हणजे पोळीतली वाफ निघून जाते व पोळी कधीही कडक होत नाही.

पोळीचे दोन धडे तर मिळाले. आता लाटायचे नीट जमत नव्हते. त्रिकोणी घडीची काही सेकंदात होणारी गोल गोल पोळी नीट जमत नव्हती. एकदा तर त्रिकोणाचा चोकोन व पंचकोनही झाला. आणि एकदा अचानक लाटण्याचे तंत्र बघायला मिळाले. माझी एक मैत्रिण स्वरदा तिला पण माझ्यासारखीच पोळी प्रिय. रोजच्या रोज पोळी भाजी झालीच पाहिजे. ती गोल घडीची पोळी करते. व पोळी लाटता लाटता सतत उलटी पालटी करते. हे तंत्र मला आवडलेही आणि जमलेही. या तंत्राचा फायदा असा झाला की त्रिकोणी घडीची पोळी अगदी छान जमायला लागली.

अशा रितीने पोळी प्रकरणातून माझ्या पोळ्या खूपच छान व्हायला लागल्या! त्रिकोणी घडीची, ३-४ पदर सुटलेली, गोल व मऊसूत पोळी जमायला लागल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला.


निरिक्षण व अनुभवातून शिकलेल्या गोष्टी :

कणीक भिजवणे : कणीक भिजवताना अगदी थोडे थोडे पाणी घेऊन भिजवावी. कणीक ओली होण्याइतपतच पाणी घालावे व ओल्या कणकेचे गोळे करून नंतर सर्व कणीक जोर लावून मळावी. आपल्या हाताला कणीक मऊ झाली की कडक झाली ते कळते. त्यानुसारच पाणी घालावे. १५ मिनिटे मूरू द्यावी. मुरल्यावर परत तेलाचा हात घेऊन मळावी व छोटे छोटे गोळे करून पोळ्या लाटाव्या.


पोळी लाटणे : पोळी लाटताना लाटण्याचा दाब कणकेच्या गोळ्याला सर्व बाजुंनी सारखा असला पाहिजे. पोळी खूप पातळ झाली की ती कडक होण्याचा संभव असतो. पोळी कडेकडेने नीट लाटली गेली पाहिजे नाही तर कडा जाड राहून कच्या राहतात. लाटताना पीठ थोडे जास्त वापरा.


भाजणे : तव्याला सतत एकसारखी आच लागायला हवी. तापलेल्या तव्यावर पोळी जास्त वेळ राहता कामा नये. ३ते ४ वेळेला उलटली की पोळी भाजली गेली पाहिजे. पोळी भाजताना वाफ बाहेर येत असेल तर त्यावर वाटीने दाब द्या म्हणजे वाफ पोळीच्या इतर बाजुला जाऊन पोळी फुगेल.

अमेरिकेत मी चांगल्या पोळ्यांना मिस करत आहे. कारण की इथे मिळणारी कणीक अजिबात चांगली नाही. त्यात मैदा जास्त प्रमाणात असतो. भारतात गिरणीमधून बारीक दळून होणारी कणीक ही केव्हाही चांगली. त्यात कोंडा असतो. शिवाय भारतात आपल्याला चांगल्या प्रतीचा गहू पण वापरता येतो. इथे अमेरिकेत all nature best व स्वाद या दोन कंपन्याची कणीक मला त्यातल्या त्यात चांगली वाटते. याच्या पोळ्या बऱ्यापैकी चांगल्या होतात.

पोळी प्रकरण समाप्त!!!

Friday, April 03, 2009

सजावट (६)

किसलेले गाजर, किसलेले चीझ, स्ट्रॉबेरी

Monday, March 30, 2009

सजावट (५)


टोमॅटो, काकडी, बीट, गाजर

Thursday, March 26, 2009

भरली कारली

आम्ही तिघी एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो. मी, माझी एक महाराष्ट्रीयन मैत्रिण दिप्ती व तमीळ मैत्रिण लक्ष्मी. सकाळी धावतपळत ९ च्या आत ऑफीसला यायचो. ऑफीसला आल्यावर एकमेकींना हसतमुखाने गुड मॉर्निंग करायचो. ब्रँच मॅनेजर आम्हाला कामे देऊन कंपनी व्हिजीटकरता बाहेर पडायचे. ते बाहेर पडले रे पडले की आमचा पहिला प्रश्न एकमेकींना तो म्हणजे आज डब्यात काय आहे?


एकदा दिप्तीने भरली कारली आणली होती. मी तिला म्हणाले अय्या! भरली कारली? ती कशी करायची? मी तर काचऱ्या करते. ती म्हणाली हो मी पण काचऱ्याच करते, पण जेव्हा बाजारात बुटकी कारली मिळाली तर त्याची मी हमखास भरली कारलीच करते. मला तर कारली म्हणजे जीव की प्राण! लगेचच तिच्याकडून सविस्तर रेसिपी विचारून घेतली. तिला विचारले कुठे मिळतात ही बुटकी कारली? म्हणाली आपण एकदा बाजारात जाऊ तेव्हा मी माझ्या भाजीवालीशी ओळखच करून देते तुझी. तिच्याकडे ही कारली असतात. तिच्या शेतातून ताजी आणते. मग तिची आणि माझी ओळख झाली आणि लगेचच भरली कारली केली. आहाहा!!! इतकी काही मस्त लागतात. मी तर नुसती खाते वाटीतून घेऊन. भरली कारली म्हणजे माझ्याकरता मेजवानीच असते!


मी जेव्हा बाजारात जायचे तेव्हा ही भाजीवाली मला हाका मारायची ताई, कारली आली आहेत ताजी. तुम्हाला पाहिजे तशी आहेत. मी पण लगेच तिच्याकडे असतील तेवढी सगळी कारली घ्यायचे. तिच्याकडच्या असलेल्या कारल्यांचा लगेच खप होत असे, म्हणून ती माझ्या वाटणीची आधीच बाजूला काढून ठेवायची. या भाजीवाल्या बायका पण आपल्याला किती जीव लावतात ना! ती भाजीवाली पण मला खूप आवडायची. चुणचुणीत, नीटनेटकी!


भरल्या कारल्याची एक छान आठवण आहे. इथे अमेरिकेत आले तेव्हा एकदा मला एका थायी दुकानामध्ये चक्क छोटी बुटकी कारली दिसली. लगेच सगळी घेऊन टाकली आणि खास दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केली! त्यादिवशी आम्ही एका मराठी मुलाला जेवायला बोलावले होते आणि विशेष म्हणजे तोही कारलाप्रेमी निघाला! असा हा आगळावेगळा दसरा कायमचा आठवणीत राहिला!!

Tuesday, March 24, 2009

गाजर खीर

जिन्नस :

बारीक वाटलेले गाजर २ वाट्या
साखर ८ चमचे
२-३ चमचे काजूची पूड
साजुक तूप ३ चमचे
दूध २ वाट्या


क्रमवार मार्गदर्शन : २-३ गाजरे घ्या. त्यांची साले काढा. बारीक तुकडे करून फूड प्रोसेसर वर बारीक वाटून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की की त्यात साजुक तूप घालून त्यावर वाटलेले गाजर घालून कालथ्याने थोडे परतून घ्या. नंतर त्यात अगदी थोडे पाणी घालून त्यावर झाकण ठेवा. वाफेवर गाजर शिजेल. ५ मिनिटांनी झाकण काढा. नंतर त्यात दूध साखर घाला. आता आच थोडी वाढवा. हे मिश्रण आटेल. थोडे आटले की त्यात काजूची पूड घालून डावेने ढवळा. एकसंध दाट खीर झाली की गॅस बंद करा. गाजरामुळे या खीरीला छान शेंदरी रंग येतो. साखर आवडीप्रमाणे कमी जास्त घालावी.

Wednesday, March 18, 2009

सजावट (४)

लेट्युस, गाजर, टोमॅटो

Thursday, March 12, 2009

सजावट (३)



पेअर, सफरचंद, स्ट्रॉबेरी

काकडी लेट्युस कोशिंबीर

जिन्नस :

बारीक चिरलेली/चोचलेली काकडी
बारीक चिरलेला लेट्युस
दाण्याचे कूट
खवलेला ओला नारळ
कोथिंबीर
चुरडलेली हिरवी मिरची
मीठ व साखर


क्रमवार मार्गदर्शन : वरील सर्व जिन्नस एकत्र करा. एक पौष्टिक कोशिंबीर तयार होईल आणि थोडा चवीतही फरक!

Monday, March 09, 2009

बीट कोशिंबीर

जिन्नस :

बीट १
दही
लाल तिखट
मीठ
साखर
मिरपूड


क्रमवार मार्गदर्शन : बीट कूकरमध्ये उकडून घ्या. बीट गार झाले की त्याची साले काढून साधारण आयताकृती तुकडे कापून त्यात अगदी किंचीत लाल तिखट, मीरपूड, साखर घाला. चवीपुरते मीठ व थोडे दही घालून कोशिंबीर ढवळा. या कोशिंबीरीला रंग खूप छान येतो. शिवाय पौष्टीक.

Saturday, March 07, 2009

फोडणीची पोळी

जिन्नस :


शिळी पोळी २
पाव ते अर्धा कांदा बारीक चिरून
हिरव्या मिरच्यांचे तुकडे ४-५
लाल तिखट पाव चमचा
मोहरी, हिंग, हळद
भाजलेले दाणे मूठभर
मीठ, साखर
चिरलेली कोथिंबीर
खवलेला ओला नारळ
लिंबू
तेल


क्रमवार मार्गदर्शन : पहिल्याप्रथम शिळी पोळी खूप बारीक करून घ्या. हाताने बारीक करता आली नाही तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करा. नंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे , भाजलेले दाणे, चिरलेला कांदा घालून परता. त्यावर झाकण ठेऊन एक वाफ द्या. २-४ मिनिटांनी झाकण काढा व परत परता म्हणजे कांदा व मिरच्या नीट शिजेल. नंतर त्यात बारीक केलेला पोळीचा कुस्करा घाला. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व थोडी साखर घाला, चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण एकसारखे ढवळून घ्या म्हणजे सर्व पोळीला तिखट मीठ सारखे लागेल. खायला देताना त्यावर परत थोडी चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून द्या. सोबत लिंबू हवे हं. गरमागरम फोडणीची पोळी हां हां म्हणता संपेल.

Thursday, March 05, 2009

सॅलड सजावटीची प्रस्तावना

आपण रोज जेवतो, सणासुदीला गोडाचे जेवण करतो. उपवासाला पण वेगवेगळे पदार्थ करून खातो. आपल्या जेवणामध्ये पोळी भाजी बरोबर सॅलड यालाही खूप महत्त्व आहे. खरे तर सॅलड खाणे याला विशेष काहीच करायला लागत नाही. फक्त कापणे व खाणे. आपण नुसतेच म्हणतो की सॅलड खाल्ले गेले पाहिजे पण त्याकडे जास्त लक्ष देत नाही. लक्षात ठेवून सर्व केले की खाल्ले जाते. फळे व कच्या भाज्या एकेक करून खाण्यापेक्षा ते बारीक कापले व एका डीशमध्ये ठेवून त्यावर चॅट मसाला किंवा अगदी थोडी जरी साखर व मीठ पेरले की मग ते खायला मजा येते. खावेसे वाटते. कापून बशीत ठेवले डायनिंगवर की आपोआप खाणे होते.


पोळी भाजी किंवा आमटी भात यांच्याबरोबर अधून मधून सॅलड खाल्ले की ते पचनासाठी पण उपयुक्त ठरते. कोशिंबीर केली तर उत्तमच पण ती करायचा कंटाळा आला तर कमीत कमी काकडी, टोमॅटो, गाजर वगैरे यांचे काप तरी खाल्ले पाहिजेत. तसेच फळांचेही आहे. सॅलड मध्ये एखादे फळ कापून ठेवा किंवा ऑफीसमधून आलात तर फळे कापून खा. फळे किंवा कच्या भाज्या खाण्यासाठी त्याची सजावट करून ठेवलीत तर त्याकडे बघून भूक वाढेल व आपोआप जेवणात सॅलड खाल्ले जाईल. सजावटीसाठी तुमच्या कल्पनाशक्तीला वाव द्या आणि भरपूर सॅलड खा. सतत उत्साही व निरोगी रहा.

सजावट (२)


लाल मुळा, गाजर, काकडी, कोथिंबीर

सजावट (1)


लाल मुळा, गाजर, काकडी, कोथिंबीर

Tuesday, March 03, 2009

कुड्या

कुड्या म्हणले की मला नेहमी पुण्यातील गणपती विसर्जनाची आठवण होते. कुड्या हा खाण्याचा प्रकार खूप प्रचलित नाही. हा एक कोकणातला प्रकार आहे. कुड्या पिठलं भाताबरोबर जास्त छान लागतात.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यामध्ये गणपती विसर्जनाची एक मोठी मिरवणूक निघते. त्यात पुण्यातील सर्व गणपती विसर्जनासाठी एकत्र येतात आणि ओळीने वाजत गाजत लक्ष्मी रोडवरून जातात. त्यात पहिले पाच मानाचे गणपती असतात आणि सगळ्यात शेवटी श्रीमंत दगडुशेट हलवाई व मंडईतला गणपती असतो. पुण्यात राहत असताना आम्ही दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व आत्ये मामे व मावस भावंड एकत्र जमायचो व मिरवणूक पहायचो. त्यावेळी विद्युत रोषणाई केलेले गणपती पण असायचे. सजावटीबरोबर एखाद्या गाण्याच्या तालावर नाचणारी विद्युत रोषणाई म्हणजे पुण्यातील गणपतींचे एक आकर्षण होते. मध्यरात्रीनंतर विद्युत रोषणाईच्या गणपती विसर्जनाला सुरवात व्हायची व पहाटे उजाडायच्या आत मिरवणूक संपायची!


आमचे सर्व मामे भाऊ, मामे बहीणी, मावस भाऊ बहीणी, त्यांचे मित्र मैत्रिणी असे सर्वजण नारायण पेठेत राहणाऱ्या मामाकडे जमायचो. रात्रीचे जेवण करून यायचे सर्वजण. रात्रभर मिरवणूकीत लक्ष्मीरोडभर फिरायचो. मजा करायचो. पाणीपुरी, भेळपुरी, सुजाताचा बटाटेवडा, अमृततुल्यचा चहा. रात्रभर हाच उद्योग! अल्का टॉकीजपासून चालत चालत जायचे ते मंडईपर्यंत. मध्येच कुणाच्या घरी जायचे, मग त्याला घेऊन परत मिरवणुकीत सामील व्हायचे. माझे मामेभाऊ व त्यांचे मित्र काही वेळेला मिरवणूकीत त्यांच्या मित्रांबरोबर ढोल ताशे वाजवण्यात सामील व्हायचे. गुलालाने माखलेले असायचे. त्या ढोल ताश्यांचा एक विशिष्ट प्रकारचा रिदम कानात साठून रहायचा. माम्या, मावश्या व माझी आई थोडा वेळ फिरून परत घरी जायच्या आणि आम्हाला बजावून जायच्या की मंडई व दगडुशेटचा गणपती निघाला की कळवा आम्हाला. मग पहाटे त्यांना घरी जाऊन सांगायचे कोणीतरी की चला उठा, दगडुशेट व मंडईचा गणपती निघाला आहे मंडईतून.

मिरवणूक संपली की थोडे उजाडायला लागायचे. सर्वजण अमृततुल्यचा चहा घ्यायचो. अमृततुल्यच्या टपरीवर आम्ही १५-२० जण! चांगले दोन तीन कप आले घातलेला व चहाचा मसाला घातलेला चहा प्यायचो. चहा पिऊन तारवटलेल्या डोळ्यांना जरा तरतरी यायची. मिरवणूक संपल्यावर कोणीही परस्पर घरी जायचे नाही, कारण मामीने सगळ्यांना बजावून सांगितलेले असायचे की घरी या, अंघोळी करा, पिठलं भात खा, मग घरी जाऊन झोपा हवे तितके.


चहा झाला की परत रमतगमत, हसत, गप्पा मारत मामाच्या घरी परतायचो. त्या दिवशी जेवायला पिठलं भात ठरलेला असायचा. त्याबरोबर कोणतीतरी चटणी लसणाची किंवा ओल्या नारळाची! एकदा आम्ही सर्व पोरांनी सुचवले की हे काय? त्याच त्याच चटण्या काय? जरा कोणतीतरी वेगळी चटणी करा की! कोणती चटणी करणार? ह्याच दोन चटण्या छान लागतात पिठलं भाताबरोबर. पण त्यादिवशी आम्ही आमचा हेका सोडलाच नाही. शेवटी आईने पर्याय काढला. आई म्हणाली आपण कुड्या करायच्या का? माझी मामी म्हणाली काय गो, हा कोणता प्रकार? कधी ऐकला नाही तो! मग आईने सांगितले की तिची आई तिच्या लहानपणी हा प्रकार करायची. मग ठरले. सर्वजण लसूण सोलायला बसले. दोघीजणी नारळ खवायला बसल्या. लसूण खोबरे व हिरव्यागार मिरच्या फोडणीमध्ये परतल्या गेल्या. कढई भरून केल्या. जेवताना पिठलं भातापेक्षा कुड्याच जास्त संपल्या!


त्या दिवसापासून प्रत्येक अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण मिरवणूक दुसऱ्या दिवशी संपते!, हा मेनू कायमचा ठरून गेला. "कुड्या" ची अजून एक आठवण म्हणजे ही माझी पहिली पाककृती मी मनोगत संकेतस्थळावर लिहिली २००५ च्या सुरवातीला तेव्हापासून माझ्या पाककृती लिखाणाला सुरवात झाली. तुम्ही पण करून बघा कुड्या, नक्कीच आवडतील! पण त्याबरोबर पिठलं भात हवा बरं का!

Friday, February 27, 2009

काजू वडी

जिन्नस:

काजूची पूड २ वाट्या
साखर दीड वाटी
रिकोटा चीझ २ चमचे
साजुक तूप पातळ करून ४ चमचे



क्रमवार मार्गदर्शनः मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. त्यात दीड वाटी साखर व साखर पूर्णपणे बुडून थोडे वर पाणी घाला. थोडी आच वाढवा. मिश्रण चांगले उकळू दे. अधुनमधून कालथ्याने ढवळत रहा. आणि एकीकडे त्यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कितपत घट्ट होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक झाला की त्यात साजुक तूप, रिकोटा चीझ व काजूची पूड घालून ढवळा. हे मिश्रण सारखे ढवळत रहा. काही वेळाने हे सर्व मिश्रण एकत्रित होऊन एकसंध होते. थोडे घट्ट लागायला लागते. तरीसुद्धा खूप घट्ट होत नाही. पूर्ण गंधासारखे एकजीव झाले की गॅस बंद करा. नंतर काही वेळ कालथ्याने हे मिश्रण ढवळा.

ताटलीला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. ओतले की हे मिश्रण पसरायला लागेल. थोडे जास्त पसरण्यासाठी ताटली हाताने थोडी सर्व बाजूने वाकडी करा म्हणजे मिश्रण ताटलीभर पसरून त्याची पातळी एकसारखी होईल. हे मिश्रण ओतल्यावर लगेचच कोरडे पडायला लागते, त्यामुळे कोमट असतानाच वड्या पाडा. हे मिश्रण लगेच गारही होते. वड्या काढताना अलगद हाताने काढाव्या लागतात नाहीतर लगेच तुटतात इतके मिश्रण कोरडे पडते.



या वड्या पटकन होतात. मी या वड्यामध्ये रोस्टेड काजू वापरले आहेत त्यामुळे रंग पांढरा आला नाही. वॉलमार्टमध्ये खारट नसलेले काजू मिळतात ते वापरले आहेत. जिथे इंडियन स्टोअर्स नाही तिथे हा पर्याय आहे. कारण अमेरिकेत सर्व ठिकाणी रोस्टेड व सॉल्टेड काजू मिळतात. या वड्या मी पहिल्यांदाच केल्या आहेत. मला वाटते की अजून थोडे तूप घातले तर जास्त नितळ होतील.

Tuesday, February 24, 2009

टोमॅटो कांदा कोशिंबीर



जिन्नसः


लाल टोमॅटो २ लहान आकाराचे
कांदा अर्धा
हिरव्या मिरच्यांचे तुकडे २-३
चिरलेली हिरवीगार कोथिंबीर
दाण्याचे कूट १ चमचा
मीठ
साखर पाव चमचा



क्रमवार मार्गदर्शन : टोमॅटो व कांदा खूप बारीक चिरा. त्यात दाण्याचे कूट, चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर व थोडी कोथिंबीर घाला. मिरच्यांचे तुकडे हाताने चुरडून घाला. सर्व मिश्रण एकसारखे ढवळा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल. बटाट्याच्या काचऱ्या व पोळीबरोबर ही कोशिंबीर जास्त छान लागते.




Saturday, February 21, 2009

सँडविच



जिन्नस:


स्लाइस ब्रेड
बटर/साजुक तूप
बटाटावड्याचे सारण

बटाटावड्याचे सारण : बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घाला. ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत.


क्रमवार मार्गदर्शन: ब्रेडच्या कडा काढा. एका स्लाइसवर बटर/साजुक तूप लावा. एका स्लाइसवर बटाटावड्याचे सारण पसरवून लावा. थर पातळ/जाड आवडेल तसा. नंतर हे स्लाइस एकमेकांवर ठेवून सँडविच टोस्टर मध्ये भाजून घ्या. गरमागरम टोमॅटो केच अप अथवा सालसा बरोबर खा.

Tuesday, February 17, 2009

कोबी लेट्युस कोशिंबीर

वाढणी: ज्या प्रमाणात खाल त्याप्रमाणात
पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस: गुलबक्षी रंगाचा कोबी, लेट्यूस दही, मीठ, साखर


क्रमवार मार्गदर्शन: गुलबक्षी रंगाचा कोबी किसून घेणे. लेट्युस खूप बारीक चिरणे. यात दही मिसळणे. चविप्रमाणे मीठ व साखर घालून ढवळणे. कोबीचा गुलबक्षी रंग, लेट्युसचा हिरवा रंग आणि दह्याचा पांढरा रंग अशी ही रंगीबेरंगी दिसणारी कोशिंबीर चवीला चांगली लागते आणि करायलाही सोपी.

Friday, February 13, 2009

मसालेभात

जिन्नसः

बासमती तांदुळ १ वाटी
३ वाट्या पाणी
जाड चिरलेला कांदा पाव
मोठी फ्लॉवरची फुले ५-६
जाड चिरलेला बटाटा पाव
मटार पाव वाटी
२-३ मिरच्यांचे जाड तुकडे
लाल तिखट अर्धा चमचा
धनेजीरे पूड अर्धा चमचा
मिरपूड अर्धा चमचा
फोडणी साठी तेल मोहरी, जीरे, हिंग, हळद
मीठ


क्रमवार मार्गदर्शन:


प्रथम तांदुळ धूउन घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी चाळणीत तांदुळ घालून ठेवा. मध्यम आचेवर कूकर तापत ठेवा. तो तापला की त्यात जरूरीपुरते थोडे तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, जीरे, हिंग हळद घालून त्यात आधी मिरच्यांचे तुकडे व कांदा घाला. थोडे परता. मग त्यात बटाटा, फ्लॉवर, मटार घाला. नंतर तांदुळ घालून परत एकदा नीट ढवळून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड, मीरपूड व चवीपुरते मीठ घालून परत एकदा नीट ढवळून घ्या. नंतर त्यात पाणी घालून कुकरचे झाकण लावा. एक शिट्टी झाली की गॅस बंद करा.


हा मसालेभात गरम गरम खायला चांगला लागतो. सोबत कांदा, काकडी व टोमॅटोचे काप घ्या. थंडगार दही, लसूण चटणी, उडदाचा भाजलेला/तळलेला पापड घ्या.

गाजर वडी



जिन्नस:


किसलेले गाजर अडीच वाट्या (गाजराची साले काढून घ्या. )
साखर २ वाट्या
रिकोटा चीझ अथवा खवा पाऊण वाटी
साजूक तूप पाव वाटी



क्रमवार मार्गदर्शन:



मध्यम आचेवर एका कढईत साजूक तूप व किसलेले गाजर घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफेवर गाजर शिजेल. झाकण काढून परत एकदा कालथ्याने परता. असे २-४ वेळा करा म्हणजे गाजर व्यवस्थित शिजेल. गाजर शिजण्याकरता पाण्याचा वापर करू नका.



आता हे शिजलेले गाजर एका भांड्यात काढून ठेवा. त्याच कढईत २ वाट्या साखर घाला. साखर पूर्णपणे बुडून अगदी थोडे वर राहील इतके पाणी घाला. आच मध्यम असू देत. साखर विरघळायला लागेल. एकीकडे चमच्याने हलवत रहा. व अधुनमधून यातले काही थेंब एका वाटीत काढून पाक कसा होत आहे त्याचा अंदाज घ्या. एकतारी पाक करा. एकतारी पाक झाला की २-३ मिनिटांनी त्यात शिजवून घेतलेले गाजर व रिकोटा चीझ घाला. रिकोटा चीझ घट्ट असते ते कालथ्याने पूर्णपणे मोडून घ्या. कालथ्याने हे मिश्रण ढवळत रहा. या मिश्रण काही वेळाने खूप उकळायला लागेल.



आता थोडी आच वाढवा. आता हे मिश्रण एकत्र होऊ लागेल व आटायला लागेल. हे मिश्रण खूप आटवायला लागते. त्याकरता कालथ्याने सतत ढवळावे लागते. काही वेळाने हे मिश्रण कोरडे पडायला लागेल. आता गॅस बंद करा व बाजूच्या शेगडीवर कढई ठेवून सतत हे मिश्रण ढवळ रहा. काही वेळाने या मिश्रणाचा कोरडा गोळा तयार होईल. आता हा गोळा एका तूप लावलेल्या ताटलीत काढून तो लगेच एकसारखा थापा. थापण्याकरता एक पातळ प्लॅस्टिकचा कागद तूपाचा हात लावून घ्या. मिश्रण कोमट झाले की वड्या पाडा. खूप गार झाल्यावर वड्या डब्यामध्ये काढून ठेवा.




वड्या पहिल्यांदाच करत आहे. प्रयोग चालू आहेत त्यामुळे सफाई थोडी कमी आलेली आहे. पण या वड्या खायला खुसखुशीत लागतात. व गाजराच्या असल्याने रंगही छान येतो.

Wednesday, February 11, 2009

मसाला चिप्स (१)



जिन्नस:


टॉरटिला चिप्स (tostitos)
बटाटावड्याचे सारण
बारीक चिरलेला लेट्युस
बारीक चिरलेली काकडी
सालसा
किसलेले चीझ
मीठ व साखर चवीपुरते
शेंदरी रंगाच्या गाजराचे बारीक गोल काप साले काढून(सजावटीसाठी)
पालकाची छोटी पाने (सजावटीसाठी)



बटाटावड्याचे सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरून घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहू देत.



क्रमवार मार्गदर्शन : सर्वात आधी एका डीशमध्ये गाजराचे गोल व बारीक काप ठेवा. मध्यावर पालकाची पाने लावून घ्या. मग त्यावर एकेक टॉरटिला चिप्स ठेवा. नंतर प्रत्येक चिप्स मध्ये सर्वात आधी बटाट्याचे सारण घाला. नंतर चिरलेला लेट्युस व काकडी घाला. नंतर सालसा व सर्वात शेवटी किसलेले चीझ घाला. चवीसाठी थोडे मीठ व साखर पेरा.अशी ही एक छान सजलेली चमचमीत डीश तयार होईल.


Tuesday, February 03, 2009

काकडी टोमॅटो कोशिंबीर

1 लहान लाल टोमॅटो व एक लहान काकडी बारीक चिरा. त्यात एक चमचा दाण्याचे कूट, चिमुटभर लाल तिखट, पाव चमचा साखर, २ चमचे दही व चवीपुरते मीठ घाला. थोडी हिरवीगार कोथिंबीर चिरून घाला. सर्व मिश्रण चमच्याने एकत्रित करा. एक चविष्ट कोशिंबीर तयार होईल!