Monday, January 15, 2007

भाकरी

वाढणी:१ जण

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

ज्वारीचे पीठ ३-४ मुठी
चवीपुरते मीठ
कोमट पाणी

क्रमवार मार्गदर्शन: ज्वारीचे पीठ ३-४ मुठी एका परातीत घेऊन कोमट पाण्याने मळून घेणे. सैलसर गोळा होईल इतपत मळून घेणे. घट्ट नको. पीठ मळून झाल्यावर एका पातेल्यात ठेवून देणे. नंतर परातीत ज्वारीचे थोडे पीठ पूर्ण परातभर पसरून घेणे. नंतर भिजवलेल्या पीठाचा हवा तसा एक गोळा एकसारखा करून थोडा चपटा करून घेऊन परसलेल्या पीठावर ठेवून त्यावरून अजून थोडे ज्वारीचे पीठ पसरून घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे फिरतात त्याच्या विरूद्ध दिशेने थापणे. थापताना अधुन मधुन गोळा घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने सरकवणे. याप्रमाणे गोळा मोठा व गोल होतो. थापताना हाताचा भार कडेकडेने जास्त द्या. म्हणजे कडेने पातळ व मधे जाड होईल. थापताना आपण थापट्या मारतो त्याप्रमाणेच थापा. भाकरीचे पीठ मळून व एक भाकरी थापून होईपर्यंत मंद आचेवर तवा तापत ठेवणे.

नंतर ही भाकरी तव्यावर उपडी करून घालणे. तव्यावर भाकरी उपडी घातली रे घातली की लगेचच ओंजळीत थोडे पाणी घेऊन पूर्णपणे भाकरीवर पसरवणे. हे पाणी फक्त पसरवण्यापुरतेच घेणे. जास्त नको. ही क्रिया पटकन झाली पाहिजे. नंतर ५-६ सेकंदाने कालथ्याने भाकरी उलटी करणे. भाकरी उलटल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवणे. आता ही उलटी केलेली भाकरी दुसऱ्या बाजूने भाजुन निघेल. ही भाकरी भाजली आहे की नाही ते कालथ्याने भाकरी वर उचलून पहा. पूर्णपणे भाजली गेली की मग तवा दुसरीकडे ठेवून भाकरीचा न भाजलेला भाग गॅस मोठा करून त्यावर ठेवणे. भाकरी लगेचच फुगेल. फुगल्यावर लगेच गॅसवरून काढणे.


३-४ मुठी भाकरीच्या पीठात २ मोठ्या भाकऱ्या होतील. अशाच पद्धतीने बाजरीच्या व तांदुळाच्या पीठाच्या भाकऱ्या होतात.


रोहिणी

2 comments:

nishi said...

Hi Rohini,

mi kaal Jwarichi ek bhakari karun baghitali....pan kadak jhali ...any tips....hi bhakari latun karta yete ka....thapayala jamat nahi ajun....

Nishi

Anonymous said...

What is calorie count in 1 Bhakari?