Tuesday, January 16, 2007

निवगरी




वाढणी:जितकी माणसे तितक्या निवगऱ्या

पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस:

उकडीच्या मोदकांना करतो तशी उकड करणे
कोथिंबीर, मिरच्या, जिरे किंवा जिऱ्याची पावडर
मीठ
उकड मळण्यासाठी तेल,पाणी

क्रमवार मार्गदर्शन:

ही पाककृती सोपी आहे. ज्यांना उकडीचे मोदक करता येतात, त्यांना निवगरी करणे काही अवघड नाही. तांदुळाच्या पीठाची केलेली उकड तेल-पाण्यामधे मळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मिरच्या वाटून घालणे, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर व जिरे/जिरे पावडर घालुन परत मळून घेउन वड्याच्या गोल आकाराप्रमाणे पातळ थापणे. मोदक जसे वाफेवर उकडतो त्याचप्रमाणे केळीच्या पानावर ठेवून उकडणे. गोड मोदक खाताना मधुन मधुन तिखट निवगरी खायला छानच लागते.
मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.


रोहिणी

2 comments:

स्वाती मायदेव said...

नमस्कार रोहिणी,

तुझा ब्लॉग पाहिला.. खूपच मस्त माहिती दिली आहेस. मस्त निरनिराळे मराठी पाककृती अतिशय छान प्रकारे व आकर्षकपणे ब्लॉगवर दिलेल्या आहेस..

मला तुझा ब्लॉग खूप आवडला.

Anonymous said...

तुझ्या निवरग्या इतक्या सुंदर दिसताहेत, नक्कीच छान लागत असणार!